
नांदेड(प्रतिनिधी)-अनेक खंडणी प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल झालेल्या पवन जगदीश बोरा विरुध्द काल रात्री पुन्हा एक चोरी आणि खंडणीचा गुन्हा वजिराबाद पोलीसांनी दाखल केला असून पवन (शर्मा)बोराला पोलीस कोठडीचे वारे दाखवले आहे.
नांदेडच्या वजिराबाद भागात अभिजित अशोक सोमय्या यांची विजय टेलीकॉम नावाची मोबाईल दुरूस्ती आणि इतर साहित्य विक्रीची दुकान आहे. ही दुकान त्यांच्या आईच्या मालकीची आहे. 25 ऑक्टोबर 2021 रोजी त्यांच्या आईने पोलीस अधिक्षक कार्यालय, वजिराबाद पोलीस ठाणे आणि बॅंक ऑफ बडोदा शाखा वजिराबाद या बॅंकेचे धनादेश क्रमांक 000537, 000538 आणि 000539 हरवल्याची तक्रार दिली होती. त्यानंतर जवळपास 10 महिन्यांनी 19 ऑगस्ट 2022 रोजी ऍड. मोहम्मद अझरोद्दीन यांच्यावतीने त्यांना एक परक्राम्य संकीर्ण अभिलेख या कायद्यानुसार नोटीस प्राप्त झाली. ज्यामध्ये पवन जगदीश बोराने दिलेल्या अधिकारानुसार ती नोटीस दिली आहे असे लिहिलेले आहे. त्यामध्ये अभिजित सोमय्याने पवन बोराकडून 80 हजार रुपये घेतले होते आणि त्यातील 10 हजार रुपये रोख दिले आणि 70 हजार रुपये देणे शिल्लक आहे अशा स्वरुपाचा मजकुर लिहिलेला आहे.
ही नोटीस प्राप्त झाल्यानंतर अभिजित सोमय्या यांना लक्षात आले की, ऑक्टोबर 2021 मध्ये आपल्या आईच्या बॅंक खात्यातील हरवलेले धनादेश पवन जगदीश बोरानेच चोरलेले आहेत आणि त्याचा दुरुपयोग करून त्याने खंडणीला कायद्याचे स्वरुप देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर अभिजित सोमय्या यांनी भिती पोटी पवन बोराला दहा हजार रुपये दिले आणि 70 हजार रुपयांची खंडणी धनादेशाच्या माध्यमाने वसुल करण्यासाठी पवन बोराने हा खेळ केला तेंव्हा अभिजित सोमय्याने याबाबतची तक्रार पोलीस ठाणे वजिराबाद येथे दिली. या तक्रारीवरुन वजिराबाद पोलीसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 386 आणि 379 नुसार गुन्हा क्रमांक 305/2022 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास गुन्हेगारांचे कर्दनकाळ, कर्तव्यदक्ष पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार साहेब यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरिक्षक दत्तात्रय मंठाळे यांच्याकडे देण्यात आला आहे.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार या तक्रारीमध्ये माझ्याविरुध्द अनेक गुन्हे दाखल आहेत अजून एक झाला तर काय फरक पडत नाही असे सुध्दा लिहिलेले आहे. वजिराबाद पोलीसांनी अत्यंत जलदगतीने पवन जगदीश शर्मा (बोरा) ला अटक केली असून सध्या ते वजिराबाद पोलीस कोठडीत आनंद घेत आहेत. या अगोदरच्या गुन्ह्यांमध्ये पवन जगदीश बोराला अटक झाली होती तेंव्हा पोलीसांनी जनतेला आवाहन केले होते की, अशा प्रकारे खंडणीचे प्रकार घडले असतील आणि जनतेने तक्रार दिली नसेल तर याबाबत तक्रार द्यावी प्रत्येक तक्रारदाराला सुरक्षा देण्यात येईल.