नांदेड(प्रतिनिधी)- येथील पाटबंधारे नगर येथे सन 2006 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात तब्बल 16 वर्षानंतर एका 49 वर्षीय व्यक्तीने मला या खटल्यातील साक्षीदार करावे आणि तीन जणांना आरोपी करावे असा अर्ज नांदेड येथील अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश आणि सत्र न्यायाधीश यांच्या न्यायालयात दिल्याने 16 वर्षानंतर पुन्हा एकदा पाटबंधारे नगर बॉम्बस्फोट चर्चेला आला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 22 सप्टेंबर 2022 रोजी होणार आहे. न्यायालयाने हा नवीन अर्ज निशानी क्रमांक 432 नुसार खटला क्रमांक 14/2007 मध्ये सामील केला आहे.
दि.29 ऑगस्ट 2022 रोजी सत्र खटला क्रमांक 14/2007 ची तारीख होती. या दिवशी ऍड. एस.आर.देलमांडे यांच्यावतीने यशवंत सहदेव शिंदे (49) रा.एन.एन.जोशी मार्ग मुंबई यांनी एक अर्ज सादर केला. या अर्जात एकूण 7 पाने आहेत. या 7 पानांमध्ये यशवंत शिंदे यांनी मी 1990 मध्ये 18 वर्षाचा होता आणि त्यावेळेस मी विश्र्व हिंदु परिषद, बजरंग दल आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघटनांमध्ये काम करत होतो. आपल्या या संघटनेतील कामांची सविस्तर माहिती या अर्जात लिहिली आहे. त्यामध्ये त्यांनी पश्चिम बंगाल, जम्मू काश्मीर येथे सुध्दा काम केल्याचे नमुद आहे. याकाळात या संघटनांमधील दर्जना आणि अनेक वेगवेळ्या विभागांची नावे लिहिलेली आहेत. कोणी मिथुन चक्रवर्ती नावाच्या व्यक्तीने आम्हाला बॉम्ब बनविण्याचे शिक्षण दिले होते असेही या अर्जात लिहिले आहे. या अर्जाप्रमाणे बॉम्बस्फोटांची मालिका घडविण्या मागे भारतीय जनता पार्टीचा निवडणुकीत विजय व्हावा असा उद्देश होता असे लिहिलेले आहे.
मी अनेकवेळा नांदेडला आलो होतो आणि त्या काळात नांदेड येथील हिमांशु पानसे आणि त्याचा मित्र कोंडावार यांची भेट झाली होती.मी हिमांशु पानसेला दक्ष केले होते. परंतू त्याने ऐकले नाही आणि नांदेडच्या पाटबंधारेनगरमध्ये बॉम्बस्फोट झाला आणि त्या बॉम्बस्फोटात हिमांशु पानसे आणि कोंडावार यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणात बरेच लोक जायबंदी झाले होते अशी हकीकत या अर्जात लिहिलेली आहे. या अर्जात सर्वात शेवटी विश्र्व हिंदु परिषदेचे केंद्रीय संघटक मिलिंद परांडे, मालेगाव बॉम्बस्फोटातील अटक झालेला आरोपी राकेश धावडे जो आज सध्या जामीनीवर आहे. रविदेव उर्फ मिथुन चक्रवर्ती रा.हरीद्वार या तिघांना आरोपी करावे तसेच मला या खटल्यात साक्षीदार करावे अशी मागणी केली आहे.
न्यायालयाने हा अर्ज निशानी क्रमांक 431 नुसार खटल्याच्या संचिकेत घेतला आहे. त्यावर आरोपीचे म्हणणे आणि सरकारी वकीलांचा से मागितला आहे. सोबतच या अर्जाचे एक शपथपत्र देण्याची सुचना अर्जदार यशवंत सहदेव शिंदे यांना केली आहे. या खटल्याची पुढील सुनावणीची तारीख 22 सप्टेंबर 2022 अशी आहे.
16 वर्षानंतर पाटबंधारे नगरच्या बॉम्बस्फोट प्रकरणात नव्याने झालेली ही घडामोड अत्यंत धक्कादायक आहे. या अर्जावर काय निर्णय येईल हे जेंव्हा येईल तेंव्हाच कळेल.
2006 च्या पाटबंधारेनगर बॉम्बस्फोट खटल्यात नवीन कलाटणी ;16 वर्षानंतर मला साक्षीदार करा अशी मागणी