जातीची बनावट वैधता मिळविण्यासाठी प्रस्ताव तयार करणारा पोलीस कोठडीत

नांदेड(प्रतिनिधी)-बनावट जात प्रमाणपत्र काढून त्या आधारावर सरपंच पद पटकावण्यात ठकबाजी करणाऱ्या एकाला विमानतळ पोलीसांनी पकडल्यानंतर न्यायालयाने त्यास दोन दिवसांसाठी पोलीस कोठडीत पाठविले आहे.
नांदेडच्या जात पडताळणी विभागातून सेवानिवृत्त झालेले पोलीस उपअधिक्षक नरसींग आकुसकर यांनी दिलेल्या एका तक्रारीनुसार बनावट नोटरी कागदपत्र तयार करून, बनावट शाळेचा निर्गम उतारा वापरून सरपंच पदाची निवडणूक लढवली आणि सरपंच पद प्राप्त केले मुळात ते जात प्रमाणपत्र बनावट होते. या तक्रारीवरुन विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 90/2022 दाखल झाला होता. यात भारतीय दंड संहितेची कलमे 420, 467, 468, 471 आणि 34 जोडण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास पोलीस निरिक्षक अनिरुध्द काकडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक जाधव हे करीत आहेत.
या प्रकरणात घडलेला प्रकार असा आहे की, शेषाबाई मारोतीराव मोरे रा.कुडली ता.देगलूर यांच्यावर खोट्या कागदपत्रांसाठी गुन्हा दाखल झाला होता. त्यांच्याकडून बनावट कागदपत्र जप्त केले. त्यात एक मुद्रांक कागद सापडला त्याबद्दल लक्ष्मीबाई अभंगे यांना त्या मुद्रांक कागदाची विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, जात वैधता प्रस्ताव तयार करण्यासाठी ब्रोकर कनिष्क शंकरराव सोनसळे यांना दिल्याची माहिती प्राप्त झाली. यावरुन कनिष्क शंकरराव सोनसळे (43) रा.लेबर कॉलनी नांदेड हा बनावट कागदपत्र तयार करतो ही बाब समोर आली.
30 ऑगस्ट 2022 रोजी कनिष्क सोनसळेला विमानतळच्या डी.बी.पथकाने अटक केली. त्याच्याकडून ऍड.एस.डी.शिंदे (बनावट नोटरी वकील) च्या नावाचे नोटरी कागदपत्र जप्त झाले. तसेच निर्गमउतारा, निर्गमउताऱ्यातील शाळेचे नाव व शिक्का एकच असलेले साहित्य जप्त करण्यात आले. बनावटपणे तयार केलेली वंशावळ, खोटे आधार कार्ड काढण्यासाठी वापरलेला फोटो जप्त करण्यात आला. 31 ऑगस्ट रोजी न्यायालयाने कनिष्क सोनसळेला दोन दिवस अर्थात 2 सप्टेंबर 2022 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
अत्यंत जलदगतीने या जातीच्या प्रमाणपत्राची बनावट वैधता मिळवणाऱ्या मुख्य गुन्हेगाराला अटक केल्याप्रकरणी पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी, पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, विजय कबाडे, पोलीस उपअधिक्षक चंद्रसेन देशमुख आदींनी विमानतळ पोलीसांचे कौतुक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *