पोलीस पुत्राने 30 हजारांची बॅग पोलिसांना आणून दिली;मालकाला परत मिळाली
नांदेड,(प्रतिनिधी)- पोलिसांचे पुत्र पोलीस झाले नाही तरी त्यांच्या अंगी पोलीस गुण जन्मजात असतातच असाच एक सुंदर प्रसंग आज घडला.आपल्या वडिलांच्या सेवा निवृत्ती कार्यक्रमातूनघरी परतणाऱ्या एका पोलीस पुत्राला सापडलेली 30 हजार 150 रुपयांची बॅग त्यांनी अत्यंत जलद गतीने वजिराबाद पोलिसांच्या स्वाधीन केली.काही वेळातच पोलिसांनी ती रोख रकमेची बॅग मालकाला परत केली.पोलीस असे अनेक प्रसंग अनुभवतात त्यांची तारीफ केली नाही तर आमच्या अंगी असलेल्या अलंकारीक भाषेचा खरा उपयोग आम्ही केला नाही असे होईल. तेव्हा अशी बेईमानी करण्याची आमची मुळीच इच्छा नाही.
आज पोलीस अधीक्षक कार्यालयात सेवानिवृत्त झालेल्या तीन पोलीस उप निरीक्षक आणि तीन पोलीस अंमलदारांना सेवा निवृत्ती नंतरचा निरोप समारंभ देण्यात आला. या समारंभात सर्वच पोलीस सहकुटूंब उपस्थित होते. दुपारी 2 वाजताच्या आसपास हा कार्यक्रम समाप्त झाला आणि सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार आप-आपल्या घराकडे रवाना झाले. यामध्ये इतवारा पोलीस ठाण्यातून सेवानिवृत्त झालेले पोलीस उपनिरिक्षक प्रकाश सुरतराम चौहाण हे आणि यांचे कुटूंबिय परत इतवाराकडे जात असतांना प्रकाश चौहाण यांचे सुपूत्र सचिन प्रकाश चौहाण यांना गुरूद्वारा चौकात एक बॅग पडलेली दिसली. त्यांचे वडील पोलीस सेवापुर्ण करून आजच सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्या सेवानिवृत्ती समारंभातून परत जाणाऱ्या सचिन प्रकाश चौहाणला ही दिसलेली बॅग त्यांनी दुर्लक्षीत केली नाही.त्यांनी दुर्लक्षीत केली असती तर पोलीसांना एक नवीन गुन्हा दाखल करावा लागला असता. पण पोलीसांनी केला असता की, नाही हे मात्र माहित नाही. कमीत कमी 30 हजार 150 रुपयांची बॅग हरवल्याची नोंद मात्र त्यांना घ्यावीच लागली असती.
याप्रकरणात झाले असे की, कौठा भागातील डावळे हॉस्पीटलमधील कर्मचारी प्रविण तातेराव नवघडे हे डॉक्टरच्या मुलाला घेवून त्याला शिकवणीला सोडण्यासाठी जात असतांना त्यांच्या दुचाकीवरील बॅग खाली पडली. ज्यामध्ये 30 हजार 150 रुपये होते. ही बॅग सचिन चौहाणच्या नजरेस पडली तेंव्हा आपल्या वडीलांकडून प्राप्त झालेल्या संस्कारांची जाणीव सचिन चव्हाणला झाली आणि त्यांनी ती बॅग आपल्या हातात घेतली. तपासणी केली तेंव्हा त्या बॅगमध्ये 30 हजार 150 रुपये रोख रक्कम होती.पण सचिन चव्हाणचे मन पोलीस पुत्र असून सुध्दा बदलले नाही. त्यांनी आपल्या वडीलांकडून मिळालेली कणखर शिक्षा लक्षात घेतली आणि जगण्यातील मौजेपेक्षा त्याहुन अधिक मौज फुलण्यात आहे हे आठवण करून ती बॅग त्वरीत या भागातील पोलीस अंमलदार प्रकाश राठोड, अंकुश पवार आणि अंगद राऊत यांच्या स्वाधीन केली. दात कोरल्याने पोटभरत नसते. त्यासाठी जेवणच करावे लागते. दातांना लागलेले जेवणाचे कण आपले पोटभरण्यासाठी पुरेस नसतात. म्हणून 30 हजार 150 रुपये याची किंमत ज्याचे ते पैसे आहेत त्याला किती असेल याची जाणीव ठेवून सचिन चौहाणने केलेल्या कामाची तारीफ आम्ही अलंकारीक भाषेत केली नाही तर आम्ही स्वत:सोबत बेईमानी केली असे होईल आणि असे करण्याची आमची मुळीच इच्छा नाही. अलंकारीक शब्दांमधील सौंदर्य खुप मोठे आहे आणि त्या शब्दांची जाणीव ज्यांना नसते त्यांना ते शब्द म्हणजे आपला अपमान वाटतो ही आमची चुक नसून त्यांच्या अज्ञानाची जाणीव आहे.
सचिन चौहाणने 30 हजार 150 रुपयांची बॅग पोलीसांना दिल्यानंतर पोलीस तर बिचारे गरीब. पोलीस विभागात, “तोंड दाबून बुक्यांचा मार’ या शब्दांना आठवण करून पोलीसांनी सचिन चौहाणने दिलेली बॅग वजिराबादचे पोलीस निरिक्षक श्रीमान जगदीश भंडरवार यांच्याकडे आणून दिली. पोलीसांनी त्वरीत प्रभावाने त्या बॅगचा मालक शोधला आणि ते मालक प्रविण तातेराव नवघडे यांना बोलावून घेतले. तसेच सचिन प्रकाश चौहाणलाही बोलावले. सन्माननिय जगदीश भंडरवार यांनी ही बॅग मालकाला परत केली.
पोलीस विभागातील व्यक्तींची मुले ही आपल्या वडीलांकडून जन्मापासूनच पोलीस काम हळूहळू शिकत असतात. आज अनेक पोलीसांची मुले मोठ्या उच्च पदांवर आहेत. त्यांना ही पदे त्यांच्या आई-वडीलांनी दिलेल्या संस्कारामुळेच प्राप्त झाली आहेत. प्रकाश चौहाण यांनी आपला पुत्र सचिनला दिलेल्या संस्कारांचा परिणाम आज उत्कृष्टरित्या पाहायला मिळाला.