नांदेड(प्रतिनिधी)-29 मार्च रोजी पोलीसांवर झालेल्या हल्ला प्रकरणात गुरुद्वारा बोर्डाचे सचिव रविंद्रसिंघ आशासिंघ बुंगई यांना उच्च न्यायालयात न्यायमुर्ती मंगेश पाटील यांनी अटकपुर्व जामीन देण्यास नकार दिला आहे. पोलीसांवर तपास करतांना आज कोणताही आक्षेप घेता येणार नाही अशी नोंद न्यायमुर्ती मंगेश पाटील यांनी अटकपुर्व जामीन अर्ज क्रमांक 503/2021 चा निकाल देतांना नमुद केली आहे.
29 मार्च रोजी सायंकाळी 5.30 वाजता पोलीसांवर झालेल्या हल्ला प्रकरणात गुरुद्वारा बोर्डाचे सचिव रविंद्रसिंघ आशासिंघ बुंगई यांचे नाव पोलीस प्राथमिकी क्रमांक 114/2021 मध्ये नमुद आहे. या गुन्ह्याची तक्रार सहाय्यक पोलीस निरिक्षक सोमनाथ शिंदे यांनी दिलेली आहे. या दिवशी पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांचे अंगरक्षक दिनेश पांडे यांच्यावर तलवारीने हल्ला झाला त्यांची जखम व्यवस्थीत करण्यासाठी 52 टाके लावण्यात आले होते. आजही ते पुर्णपणे बरे झालेले नाहीत. पोलीस उपअधिक्षक विक्रांत गायकवाड यांच्याही डाव्या हाताचे हाड फॅक्चर झाले होते. सोबतच पोलीस अंमलदार अजय यादव आणि इतर तीन पोलीस अंमलदारांना मार लागला होता.
या संदर्भाने आपले नाव एफआयआरमध्ये आहे म्हणून रविंद्रसिंघ आशासिंघ बुंगई यांनी नांदेडच्या जिल्हा न्यायालयात अटकपुर्व जामीन अर्ज सादर केला. मी घटना घडली त्या दिवशी मुंबईला होतो असा युक्तीवाद त्यांच्यावतीने करण्यात आला होता. नांदेडचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन.डी. खोसे यांनी मुंबईला असले तरी कटात सहभाग असू शकतो. या शक्यतेवर त्यांनी मागितलेला जामीन अर्ज फेटाळून लावला होता. या गुन्ह्याचे तपासीक अंमलदार वजिराबादचे पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार हे आहेत.
जिल्हा न्यायालयाच्या निकालाविरुध्द रविंद्रसिंघ बुंगई यांनी उच्च न्यायालयात अटकपुर्व जामीन अर्ज क्रमांक 503/2021 नुसार जामीन मिळण्यासाठी विनंती केली. रविंद्रसिंघ बुंगईच्यावतीने ऍड. आर.एस.देशमुख यांनी काम पाहिले तर शासनाच्यावतीने ऍड. व्ही.एम.कागणे यांनी काम केले. या अर्जाचा 9 पानी निकाल जाहीर करतांना न्यायमुर्ती मंगेश पाटील यांनी एफआयआरमध्ये नाव असतांना ते अर्थात रविंद्रसिंघ बुंगई नांदेडमध्ये हजर नव्हते या बाबीचा उल्लेख करतांना तपासाच्या प्रक्रियेत पोलीस अधिकाऱ्यांना रोखता येणार नाही अशी नोंद करत रविंद्रसिंघ बुंगई मुंबईमध्ये असतील तरीही ते कटात सहभागी असू शकतात अशी नोंद आपल्या निकालात केली आहे अशी सविस्तर चर्चा करून न्यायमुर्ती मंगेश पाटील यांनी गुरूद्वारा बोर्डाचे सचिव रविंद्रसिंघ आशासिंघ बुंगई यांचा अटकपुर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.
एफआयआरमधील आरोपी पोलीसांना सापडत नाहीत पण गुप्त पणे निष्पन झालेल्या आरोपीला पकडण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची घाई; बळी गेले दुसरेच दोन
न्यायालयात अटकपुर्व जामीन मागणारे गुन्हा क्रमांक 114 मधील आरोपी पोलीसांना सापडत नाहीत आणि 25 मे रोजी अचानकच रणदिपसिंघ उर्फ दिपू सरदार हा आरोपी पोलीसांच्या तपासात अत्यंत गुप्तपणे निष्पन झाला. हा रणदिपसिंघ 25 मे रोजी पोलीस ठाण्यात आला होता आणि त्याला सहाय्यक पोलीस निरिक्षक सोमनाथ शिंदे आणि पोलीस अंमलदार संजय जाधव यांनी पळवून लावल्याचा आरोप कोणी तरी दोन लोकांच्या बोलण्यावरून ते सुध्दा मोबाईलवर या दोन्ही पोलीसांची चौकशी लावण्यात आली. अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे सहाय्यक पोलीस निरिक्षक सोमनाथ शिंदे यांना नांदेड जिल्ह्याची जबाबदारी देत नियंत्रण कक्षात पाठविण्यात आल्याची माहिती होती. दुर्देवाने ती चुकीने लिहिण्यात आली होती. खरे तर सहाय्यक पोलीस निरिक्षक सोमनाथ शिंदे यांना परभणी जिल्ह्याची जबाबदारी सांभाळण्यासाठी तेथील नियंत्रण कक्षात जमा करण्यात आले आहे. हे आदेश पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी यांचे आहेत. या नंतर सोमनाथ शिंदे यांनी आपल्या शब्दात कांही वाक्य व्हायरल केले होते म्हणे.कांही तासात ते वाक्य त्यांनी पुन्हा डिलिट केले. यामध्ये त्यांनी अपर पोलीसांनी पोलीस उपमहानिरिक्षकांना चुकीची माहिती दिल्यामुळे माझ्यावर हा दुर्देवी प्रसंग ओढावल्याचे लिहिलेले आहे.
गुरूद्वारा बोर्डाचे सचिव रविंद्रसिंघ बुंगई यांना उच्च न्यायालयाने अटकपुर्व जामीन नाकारला