लोकमान्य मंगल कार्यालय हे लोकमान्य सेवा ट्रस्टचे ;दिवाणी न्यायालयाचा निकाल

नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील अण्णाभाऊ साठे चौकात असलेल्या लोकमान्य मंगल कार्यालयाबाबत न्यायालयात आणलेला वाद पाचव्या सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर बी.एम.एन.देशमुख यांनी हे मंगल कार्यालय लोकमान्य सेवा ट्रस्टचे आहे असा निकाल देतांना वादाचा खर्च सुध्दा प्रतिवादींना अर्थात नांदेड टाऊन मार्केटला लावला आहे.
नांदेड न्यायालयात नियमित दिवाणी खटला क्रमांक 457/2017 दाखल होता हा खटला लोकमान्य सेवा ट्रस्टचे अध्यक्ष विवेकानंद रामकृष्ण गुंडावार यांनी दाखल केला होता. प्रतिवादीमध्ये नांदेड टाऊन मार्केटचे अध्यक्ष ईश्र्वर लच्चीराम येमुल हे होते. या वादाची पार्श्र्वभूमी अशी आहे की, नांदेड टाऊन मार्केटने सन 1985 मध्ये जवळपास 14 हजार 232 चौरस फुट जागा लोकमान्य सेवा ट्रस्टला दिली होती. त्यावेळे या भागातील जमीनींची किंमत अत्यंत कमी होती. या जागेवर लोकमान्य सेवा ट्रस्टने 1990 मध्ये बांधकाम सुरू केले आणि त्याचे व्यवस्थापन सुध्दा लोकमान्य सेवा ट्रस्ट करत होते. लोकमान्य सेवा ट्रस्टने या ठिकाणी बांधकाम करून लोकमान्य मंगल कार्यालय बांधले. त्याकाळी सर्वात कमी पैशांमध्ये सर्व सामान्य माणसासाठी मंगल कार्यालयाची सुविधा तयार झाली. या मंगल कार्यालयात अनेक दुसरे कार्यक्रम पण होवू लागले आणि मंगल कार्यालयाचे नाव गाजले. वेळ जसा-जसा गेला, तसा -तसा या भागातील जमीनीची किंमत गगणाला गेली. लोकमान्य मंगल कार्यालयाचा मनपा क्रमांक 1-20-168 असा आहे. हा दावा दाखल करण्याअगोदर नांदेड टाऊन मार्केटने सन 2016 मध्ये आपल्या संस्थेची बैठक घेवून एक ठराव पारीत केला आणि ही जागा अर्थात लोकमान्य मंगल कार्यालय आमच्याच ताब्यात आहे आणि आम्हीच त्याचे व्यवस्थापन पाहतो अशी तयारी केली. त्याविरुध्द विवेकानंद गुंडावार यांनी लोकमान्य सेवा ट्रस्टच्यावतीने नियमित दावा क्रमांक 457/2017 दाखल केला.
दरम्यान सन 2016 मध्ये धर्मदाय आयुक्त कार्यालयात चौकशी क्रमांक 732/2016 दाखल करून फेरफार अर्ज दाखल करण्यात आला. हा फेरफार अर्ज लोकमान्य सेवा ट्रस्टचा होता. या विरुध्द नांदेड टाऊन मार्केटने सुध्दा त्यावर आक्षेप घेतला. परंतू धर्मदाय आयुक्त कार्यालयाने नांदेड टाऊन मार्केटचा आक्षेप रद्द केला आणि लोकमान्य सेवा ट्रस्टचा फेरफार मंजुर करून त्याची नोंद न्यासाच्या अभिलेखात 15 डिसेंबर 2018 रोजी घेतली. या विरुध्द टाऊन मार्केटच्यावतीने त्या आदेशाचे अपील करण्यात आले आहे. ते सध्या प्रलंबित आहे.
नांदेड येथे लोकमान्य सेवा ट्रस्टने दाखल केलेल्या खटला क्रमांक 457 मध्ये झालेले साक्षी पुरावे आणि उपलब्ध अभिलेख याआधारावर पाचव्या सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर बी.एम.एन.देशमुख यांनी या खटल्याचा निकाल 12 सप्टेंबर 2022 रोजी जाहीर केला. त्यानुसार लोकमान्य सेवा ट्रस्टच्यावतीने विवेकानंद रामकृष्ण गुंडावार यांनी दाखल केलेला दावा खर्चासह मंजुर केला. म्हणजे लोकमान्य मंगल कार्यालय हे लोकमान्य सेवा ट्रस्टचे आहे हे सिध्द झाले. या उलट नांदेड टाऊन मार्केटच्यावतीने प्रतिदावा करण्यात आला होता. त्यात लोकमान्य मंगल कार्यालय आमच्याच ताब्यात आहे आणि आम्हीच त्याची देखरेख करतो, त्याचे व्यवस्थापन चालवतो. म्हणून आम्हीच त्याचे मालक आहोत अशी मागणी करण्यात आली होती. परंतू न्यायालयाने तो प्रतिदावा रद्द ठरवला आहे आणि लोकमान्य मंगल कार्यालय हे लोकमान्य सेवा ट्रस्टचे आहे असा निकाल दिला आहे.
या खटल्यात लोकमान्य सेवा ट्रस्टच्यावतीने ऍड. यदुपत अर्धापूरकर यांनी बाजू मांडली होती. तर नांदेड टाऊन मार्केटच्यावतीने ऍड. व्ही.डी.पाटनूरकर आणि ऍड.मिलिंद एकताटे यांनी काम केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *