नांदेड(प्रतिनिधी)-25 ऑगस्ट रोजी अर्धापूर शिवारातील जांभरुन पाटीजवळ दरोडेखोरांनी पेट्रोलपंप चालकासह अडवून खंजीरच्या धाकावर त्याला मारहाण करून त्याच्याकडून लाखो रुपयांचा लुटला होता. या दरोडेखोरांना स्थानिक गुन्हा शाखेने जेरबंद करून 4 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अर्धापूर जवळील जांभरून पाटीजवळ असलेल्या पेट्रोलपंपाचे मालक 25 ऑगस्ट रोजी रात्री पेट्रोलपंपातील विक्रीची रोख रक्कम घेवून नांदेडकडे परत येत असतांना त्यांना काही दरोडेखोरांंनी अडवून त्यांची लुट केली होती.या प्रकरणाचा गुन्हा क्रमांक 250/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 394 प्रमाणे 25 ऑगस्ट 2022 रोजी दाखल झाला होता.
पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांना नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेतील पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी मिळालेली गुप्त माहिती दिली.त्यात अर्धापूर येथे पेट्रोलपंप चालकास लुटणाऱ्या दरोडेखोरांमधील एक आरोपी खटकपुरा येथील आहे. त्यानंतर त्यांनी स्थानिक गुन्हा शाखेचे सहाय्यक पोलीस निरिक्षक शिवसांब घेवारे यांना त्यास पकडण्याची जबाबदारी दिली.शिवसांब घेवारे यांच्यासोबत पोलीस उपनिरिक्षक गोविंदराव मुंडे, पोलीस अंमलदार सलीम बेग, रुपेश दासरवाड, पदमसिंह कांबळे, बालाजी तेलंग, संजीव जिंकलवाड, विठ्ठल शेळके, बालाजी यादगिरवाड, बजरंग बोडके, हेमंत बिचकेवार आणि हनुमानसिंह ठाकूर यांच्यासोबत सायबर विभागाचे पोलीस उपनिरिक्षक गंगाप्रसाद दळवी, पोलीस अंमलदार राजू सिटीकर, दिपक ओढणे या पथकाने शेख शाहरुख उर्फ घोलेवाला शेख इकबाल (22) यास ताब्यात घेवून विचारपुस केली असता त्याने शेख हैदर उर्फ हैद शेख शोखत (21) रा.खडकपूरा, अक्रमखान उर्फ अक्कु उर्फ मुशरू आयुब खान पठाण (20) रा.समीराबाग, शेख जावेद उर्फ सज्जू उर्फ मुशरू शेख चॉंद (26) रा.धनगरगल्ली अर्धापूर, अब्दुल जावेद अब्दुल सादुल्ला (30) रा.अशापुरागल्ली अर्धापूर आणि एक विधीसंघर्षग्रस्त बालक अशा सहा जणांना पकडले. त्यांच्याकडून रोख रक्कम 1 लाख रुपये गुन्हा करण्यासाठी वापरलेली दुचाकी गाडी, ऍटोरिक्षा आणि मोबाईल असा 4 लाख 20 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. पकडलेल्या दरोडेखोरांना पुढील तपासासाठी अर्धापूर पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
स्थानिक गुन्हा शाखेची उत्तम कामगिरी ; पेट्रोलपंप मालकाला लुटणारे जेरबंद