शिक्षण विभागातील पदोन्नतीने सर्व जागा भरा ;जिल्‍हा परिषद अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर यांच्या सूचना

नांदेड (प्रतिनिधी)- शिक्षण विभागातील पदोन्नतीने भरण्यात येणाऱ्या सर्व जागा तातडीने भरण्‍याच्‍या सूचना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर यांनी शिक्षण विभागाला दिल्या आहेत. जिल्ह्यातील विविध संघटनांनी पदोन्नतीने जागा  भरण्यासंदर्भात जिल्हा परिषदेला निवेदन दिले होते. त्या अनुषंगाने 18 जून रोजी जिल्हा परिषदेत जिल्हा परिषद अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. त्‍यावेळी त्यांनी विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. शिक्षक संघटनांनी केलेल्या मागण्या मान्य करण्यासाठी पुढाकार घेऊन सर्व प्रश्न लवकरच सोडण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. शिक्षण विभागातील कर्मचारी व शिक्षक यांना पदोन्नती देतांना सर्व जागा भरण्याच्या सूचना शिक्षण विभागाला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर यांनी दिल्या आहेत.

पदोन्नती देतांना शिक्षकांवर अन्याय होणार नाही याची दक्षता घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्हा परिषद अध्यक्षांच्या सूचनेची दखल घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर आणि विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक कारवाई बाबत सूचित केले. बैठक संपल्यानंतर कनिष्ठ विस्तार अधिकारी 10 आणि राजपत्रित मुख्याध्यापक पदावर 10 असे एकूण 20 पदोन्नतीचे आदेश दि.18 जून रोजी सायंकाळी निर्गमित केले.

शिक्षकांमधून उच्चश्रेणी मुख्याध्यापक यांना पदोन्नत करण्यात येणार असून यासाठी उद्या सोमवार दिनांक 21 जून रोजी जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात समुपदेशनाने शिक्षकांना आदेश देण्यात येणार आहेत, अशी माहितीही जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *