
नांदेड(प्रतिनिधी)- आज नवरात्र स्थापनेच्या प्रथम दिवशी काळाने एका युवतीवर घाला घातल्याचा प्रकार अर्धापूर जवळच्या पार्डी मक्ता येथे घडला आहे. या घटनेत एका ट्रक चालकाने काही दुचाकी स्वारांना धडक देवून एका घराला धडक दिली. धडक लागली ते ठिकाण स्नानगृह आहे. यात अंघोळ करणार्या एका युवतीचा मृत्यू झाला आहे.
आज नवरात्रच्या पहिल्या दिवशी ट्रक क्रमांक एम.एच.२६ बी.९१९३ हा पार्टी मक्ता गावाकडे येत असतांना रस्त्यावर चालणार्या कांही दुचाकी स्वारांन त्या ट्रकने धडक दिली. त्याबद्दल सविस्तर माहिती प्राप्त झाली नाही. पण या ट्रकने पुढे एका घराला जोरदार धडक दिली. धडक लागली ते ठिकाण घराचे स्नानगृह आहे. या स्नानगृहात त्याच क्षणी, अर्थात धडक झाली तेंव्हा वर्षा माणिक मदने (१९) ही युवत स्नान करत होती. ट्रकची धडक एवढी जोरदार होती की, त्या युवतीचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच अर्धापूरचे पोलीस निरिक्षक अशोक जाधव त्यांचे अनेक सहकारी अधिकारी आणि पोलीस अंमलदार घटनास्थळी पोहचले आहेत. पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. हा सर्व प्रकार आज दि.२६ सप्टेंबरच्या सकाळी ८ वाजता घडला आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार वर्षा मदने ही नवोदय विद्यालयाची विद्यार्थीनी आहे. तिने योग या विषयात सुवर्ण पदक प्राप्त केले आहे. पार्डी मक्ता गावात तिच्या मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे.
