▪️निर्यात प्रचलन, एक जिल्हा एक उत्पादन व व्यवसाय सुलभीकरण कार्यशाळा संपन्न
नांदेड (प्रतिनिधी) – जिल्ह्यात सद्यस्थितीचा विचार करता कृषीपूरक उद्योगांसह इतर सेवा क्षेत्रांमध्ये तरुणांसाठी मोठी संधी दडलेली आहे. युवकांनी पुढे येवून या क्षेत्रात आपले कर्तुत्व सिध्द केले पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी केले. जिल्हा उद्योग केंद्र येथे उद्योजकांसाठी निर्यात गुंतवणुक वृध्दी कार्यक्रम, निर्यात प्रचलन तसेच एक जिल्हा एक उत्पादन या विषयावर दोन दिवशीय आयोजित कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी उपविभागीय अधिकारी विकास माने, अधिक्षीय उद्योग अधिकारी नितीन कोळेकर, मैत्री कक्षाचे वि.के. बुआ, निर्यात सल्लागार सुरेश पारीख, एमआयडीसीचे विभागीय अधिकारी धनजंय इंगळे, जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी कर्मचारी व जिल्हातील उद्योजकांची उपस्थिती होती.
जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत सुरू असलेल्या उद्योगांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने सामूहिक प्रयत्न करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी केल्या. आपल्या जिल्ह्यातील नवीन पिढी जास्तीत जास्त प्रमाणात उद्योग व्यवसायाकडे वळली पाहिजे. जिल्हा उद्योग केंद्र युवा पिढीच्या मार्गदर्शनासाठी तत्पर असून विविध शासकीय योजनाही उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्ननशिल आहे. या संदर्भात समुपदेशनाची मोठी गरज असून आम्ही त्यावर विचार करीत आहोत. उद्योग उभारणीसाठी आवश्यक सर्व बाबी व तक्रार निवारण यासाठी एकल खिडकी योजना जिल्हाधिकारी कार्यालयात सुरु करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी परदेशी यांनी यावेळी स्पष्ट केले.