उस्मानाबाद येथील गीता कल्याण कदम या 21 वर्षीय विद्यार्थिनीने नांदेडमधील श्री गुरुगोविंद सिंघजी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वस्तीगृहात गळफास लावून आत्महत्या केली. अभियांत्रिकीच्या मेकॅनिकल ब्रांच मध्ये शिक्षण घेणारी गीता कदम ही हुशार मुलगी होती. नांदेडमध्ये तिच्याच वर्गातील व मूळचा वाशिम येथे राहणाऱ्या आदेश चौधरी याच्या त्रासाला कंटाळून व त्याच्या ब्लॅकमेलिंगला त्रासून तिने स्वतःचा जीव दिला .मृत्यूपूर्वी गीता कदम हिने तिची व्यथा तर मांडलीच तसेच या त्रासाला जबाबदार असणाऱ्या आदेश चौधरी याला फाशीची शिक्षा मिळावी अशी एक चिठ्ठी महिला आयोगाच्या नावाने देखील लिहून ठेवली. मयत गीता कदम ही इंजिनिअरिंगची हुशार विद्यार्थिनी होती. मृत्युपूर्वी तिने सुसाईड नोटमधून महिला आयोगाकडे न्याय मागितला, इथपर्यंत ती हुशार होती. परंतु तिला खरंच न्याय मिळेल का ? हे देखील समाजासाठी भविष्यात एक मोठे उदाहरण ठरणार आहे. पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये आजही महिला व मुली असुरक्षित आहेत.तिच्या आत्महत्येला कारणीभूत असणारा आदेश चौधरी याच्या मोबाईलमध्ये काही फोटो असल्याचे सांगून आदेश तिला नेहमी ब्लॅकमेल करत होता, असे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. गीता कदम हिला मानसिक त्रास होत असल्याबाबत औषधोपचार देखील घ्यावा लागला. मागच्या महिन्यात म्हणजेच ऑगस्टमध्ये ती स्वतःच्या गावी उस्मानाबाद येथे गेली होती. त्यावेळेस तिने घरातील पालकांना आदेश चौधरीकडून होत असलेला त्रास व मानसिक दडपण याबाबत कल्पना देखील दिली होती. तिच्या पालकांनी ऑगस्ट महिन्यातच या बाबीला गंभीरपणे घ्यायला हवे होते. परंतु पालकांचे दुर्लक्ष तसेच समाजाची अशा घटनांकडे लक्ष न देण्याची प्रवृत्ती हे देखील गीता कदमच्या मृत्यूचे कारण असू शकते.सोबत इंजीनियरिंगचे शिक्षण घेणारा आदेश चौधरी याच्या त्रासातून मुक्तता होत नसल्यामुळे गीता कदम हिने कंटाळून शेवटी टोकाचे पाऊल उचलले. अशा अनेक आत्महत्या यापूर्वीही मराठवाड्यात व महाराष्ट्रात झालेल्या आहेत परंतु शेवटी महिला व मुलींच्या या आत्महत्या कधी थांबणार हा एक मोठा प्रश्न आहे.
नांदेड शहर एज्युकेशनल हब बनले आहे. या ठिकाणी महाराष्ट्रातीलच नव्हे तर महाराष्ट्र बाहेरील हजारो विद्यार्थी शिक्षणासाठी दरवर्षी येत असतात. डॉक्टर किंवा इंजिनियर होण्याचे स्वप्न पाहून अनेक जण स्वतःचे घर सोडून शिक्षणासाठी नांदेडची वाट धरत आहेत. मोठमोठ्या कोचिंग क्लासेसमध्ये शिकवणी लावली तर आपला मुलगा भविष्यात नक्कीच मोठा डॉक्टर किंवा इंजिनियर होईल या आशेवर पालक देखील मुलांना शिकवणी लावण्यासाठी नांदेडमध्ये आणून सोडत आहेत. दहावीनंतर किंवा बारावीनंतर एकदा मुलगा किंवा मुलगी घरातून बाहेर पडल्यानंतर ते कशाप्रकारे शिक्षण शिकत आहेत किंवा त्यांनी शिक्षणाकडे कसे लक्ष दिले पाहिजे याची अनेकदा पालक फेर तपासणी देखील करत नाहीत. आपल्या मुलाला किंवा मुलीला शिक्षण शिकत असताना कोणाचा त्रास आहे का आपला मुलगा किंवा मुलगी प्रेम प्रकरणात पडले आहेत का? याचीही चौकशी पालक करत नसल्याने पुढे टोकाचे पाहून उचलून आत्महत्या,खुन, मारामारी असे प्रकार नित्याचेच झाले आहेत. नांदेडमध्ये सध्याला 15000 पेक्षा अधिक बाहेर गावचे विद्यार्थी-विद्यार्थींनी शिक्षण घेत आहेत. त्या विद्यार्थ्यांवर लक्ष देणारी कुठलीही यंत्रणा नांदेडमध्ये अस्तित्वात नाही. पोलिसांचा वचक व पोलिसांची गस्त देखील नावापुरतीच शिल्लक राहिली आहे. विद्यार्थी व विद्यार्थिनी नांदेडमध्ये सुरक्षित नाहीत याचेच हे उदाहरण आहे.देशभरात सध्या अंकिता भंडारी तिच्या मृत्यू वरून खूप मोठे वादळ उभे राहिले आहे. परंतु तशाच प्रकरणाशी संबंधित नांदेड मधील ही घटना संपूर्ण मराठवाड्याला लाजिरवाणी ठरविणारी आहे .तरी देखील याबाबत कुठेही निषेध किंवा निवेदन देऊन विरोध झालेला नाही. महिला व मुलींची सुरक्षितता याबाबत नांदेड शहर असुरक्षित असल्याचा अजून एक प्रकार त्याच दिवशी उघडकीस आला. जिम्नॅस्टिक क्लासला आलेल्या एका पंधरा वर्षीय युवतीला कपडे बदलत असताना तिची मोबाईल मध्ये फोटो काढून तिच्याशी लगट करणाऱ्या क्रीडा प्रशिक्षक जयपाल रेड्डी याला शिवाजीनगर पोलिसांनी अटक करून पोलीस कोठडीत पाठवले. समाजात बदनामी होईल म्हणून पंधरा वर्षीय युवती हा प्रकार गेल्या काही दिवसांपासून सहन करत होती. परंतु क्रीडा प्रशिक्षक जयपाल रेड्डी याने तिला अश्लील फोटो व व्हिडिओ पाठवून त्रास देण्याचा सपाटा लावला होता. मग शेवटी हा प्रकार सहन न झाल्याने तिने नातेवाईकांना कळविले .त्यानंतर शिवाजीनगर पोलीस स्थानकात क्रीडा प्रशिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. मागच्या आठवड्यात नांदेड मधील या दोन्ही घटना मराठवाड्याला हादरवून टाकणाऱ्या आहेत. शासन स्तरावर अशा घटना रोखण्यासाठी बऱ्याच उपाययोजना केल्या जातात. परंतु त्या उपाययोजना गीता कदम अशा पीडित मुलींपर्यंत का पोहोचत नाहीत, हा देखील एक मोठा प्रश्न आहे. ज्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये गीता कदम ही शिक्षण घेत होती, त्याच महाविद्यालयात तिच्या आत्महत्या होण्याच्या पंधरा दिवसांपूर्वीच जिल्हा सेवा विधी प्राधिकरणाने महिला व मुलींना जनजागृती करणारा कार्यक्रम आयोजित केला होता . परंतु त्या महाविद्यालयातून तसा योग्य प्रतिसाद न मिळाल्यामुळे जनजागृती पर कार्यक्रम होऊ शकला नाही, कदाचित तो कार्यक्रम झाला असता तर त्या विद्यार्थिनीची आत्महत्या टळली असती.
-अभयकुमार दांडगे, नांदेड
9422172552
बोलकी आत्महत्या अन् महिला आयोगाकडे तक्रार…