नांदेड(प्रतिनिधी)-सन 2018 मध्ये एका विवाहितेचा मृत्यू झाल्यानंतर काळ्या जादूचा कायदा आणि हुंडाबळी अशा प्रकरणात अडकलेल्या आठ जणांना सहाय्यक सत्र न्यायाधीश आर.आर.पटवारी यांनी सरकार पक्षाला गुन्ह्याची सिध्दता करता आली नाही अशी नोंद निकाल पत्रात करून त्यांची मुक्तता केली आहे.
तामसा ता.हदगाव येथे राहणारी महिला फरहानाबी नासेर खान पठाण (26) हिने आपल्या घरात 29 जून 2018 रोजी गळफास घेवून आत्महत्या केली. याबाबत तिचे बंधू सय्यद लतिफ सय्यद पीर रा.ढाणकी ता.उमरखेड जि.यवतमाळ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार फरहानाचे लग्न झाल्यानंतर 2012 मध्ये मुलीचा जन्म झाला. त्यामुळे तिच्या सासरची मंडळी तु मुलाला जन्म दिला नाहीस म्हणून तिच्यावर रागवले. ऍटोसाठी 30 हजार रुपये आणि सेंट्रींगच्या साहित्यासाठी 1 लाख रुपये अशी मागणी करण्यात आली. शाहेदाबीच्या अंगात भानामती येत होती म्हणून तिला त्रास होता असे एका बाबाने सांगितले आणि त्यामुळे तिला घरची मंडळी त्रास देत होती म्हणून तिने आत्महत्या केली. 3 जुलै 2018 मध्ये आलेल्या या तक्रारीनुसार तामसा पोलीसांनी भारतीय दंड संहितेचे कलम 306, 498 (अ), 323, 504, 506, 34 आणि जादुटोणाविरोधी कायदा 2013 च्या कलम 3 आणि 4 नुसार गुन्हा क्रमांक 56/2018 दाखल केला. तामसा येथील सहाय्यक पोलीस निरिक्षक सुनिल माने यांनी तपास पुर्ण करून मयत फरहानाबीचा नवरा नासेर खान वासल खान पठाण (33), जादुटोणा करणारा बाबा शेख मोहम्मद अली शेख वजीर(36), इतर नातलग शाहरुख महेमुदखान पठाण (34), महेमुद खान वासल खान पठाण(47), मुस्ताक खान वासल खान पठाण (40) आणि दोन महिला अशा आठ जणांविरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
नांदेड जिल्हा न्यायालयात हा सत्र खटला क्रमांक 121/2018 नुसार चालला.यात उपलब्ध करण्यात आलेल्या पुराव्यांमध्ये अगोदरच्या आकस्मात मृत्यूमधील तपास आणि गुन्ह्यातील तपासातील तफावत, पैशाच्या मागणीच्या तारखांची अनुपस्थिती, उशीरा करण्यात आलेला एफआयआर अशा अनेक तांत्रिक मुद्यांवरुन आरोपींचे वकील ऍड. अनुभव डोणगे(कोपरेकर) यांनी मांडलेली बाजू मान्य केली आणि सर्व 8 आरोपींची या खटल्यातून मुक्तता केली.
जादुटोणा कायदा आणि हुंडाबळी प्रकरणातून आठ जणांची मुक्तता