उमरी,(प्रतिनिधी)- एक ऑक्टोबर २०२२ सिंधी ता.उमरी येथे घडलेल्या दरोडा प्रकरणातील गुन्हेगाराला पकडून त्याच्या कडून दरोड्यातील ऐवज जप्त करणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे कौतुक करतांना पोलीस उप महानिरीक्षक निसार तांबोळी यांनी सर्वांना प्रमाणपत्र दिले.
१ ऑक्टोबर २०२२ रोजी नेते मारोती कावळे गुरुजी यांच्या बिगर शेती पत संस्थेवर सहा-सात दरोडेखोरांनी तलवारीच्या धाकावर लूट केली. दरोडेखोरांनी २ लाख ५ हजार ७५० रुपये लुटले. पळून जातांना सिंधी गावकऱ्यांनी एका दरोडेखोराला पकडले.पण इतराना मात्र पळून जाण्यात यश आले.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर हे आपल्या कौटुंबिक समस्येत असतांना सुद्धा आपले पोलिसिंग कर्तव्य विसरले नाहीत. दरोड्याची घटना कळताच परत आले. आपल्या सहकाऱ्यांना सूचना देत त्यांनी दरोडेखोरांना पकडण्याचे नियोजन केले.
स्थानिक गुन्हा शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग माने,पोलीस उप निरीक्षक सचिन सोनवणे,पोलीस अंमलदार संजीव जिंकलवाड,मोतीराम पवार,हेमंत बिचकेवार यांनी दरोडेखोरांचा शोध घेताना २४ तासाच्या आसपासच पुणेगाव-नांदेड रस्त्यावरील वांगी पाटी येथे दिनांक २ ऑक्टोबर २०२२ रोजी पहाटे ३.३५ वाजता गोळीबार करून बालाजी संभाजी महाशेट्टे (२१) रा.धनज ता.मुदखेड यास पकडले.त्यावेळी एक अमोल जाधव रा.मुदखेड हा पळून गेला.एक विधिसंघर्ष ग्रस्त बालक पकडला आणि त्याच्या कडून दरोड्यातील रोख रकमेसह एकूण २ लाख ३० हजार ७४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
आपण चांगले कर्तव्य पार पडले तर त्याची नक्कीच दखल घेतली जाते.सिंधी येथे घडलेल्या गंभीर दरोडा प्रकरणातील जलद कार्यवाही कार्यवाही करणाऱ्या पोलीस पथकाला पोलीस उप महानिरीक्षक निसार तांबोळी सन्मानित केले.या प्रसंगी पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे,अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे,बिलोलीचे सहायक पोलीस अधीक्षक अर्चित चांडक उपस्थित होते. सत्कार प्राप्त करणाऱ्यांमध्ये स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर,सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग माने,पोलीस उप निरीक्षक सचिन सोनवणे,पोलीस अंमलदार संजीव जिंकलवाड,मोतीराम पवार,हेमंत बिचकेवार यांचा समावेश होता.




