नांदेड(प्रतिनिधी)-संजय बियाणी हत्याकांडातील आरोपीविरुध्द दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर एका आरोपीने मागितलेला जामीन अतिरिक्त सत्र न्यायाधीश सी.व्ही.मराठे यांनी याप्रकरणातील आरोपीविरुध्द मकोका कायदा रद्द केला गेला नाही अशी नोंद आपल्या निकालपत्रात करत त्या आरोपीचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.
दि.5 एप्रिल 2022 रोजी शहरातील प्रसिध्द बांधकाम व्यवसायीक संजय बालाप्रसाद बियाणी यांची दोन मारेकऱ्यांनी हत्या केली होती. त्या प्रकरणातील कटामध्ये एकूण 15 आरोपींना पोलीसांनी अटक केली. दोन मुख्य मारेकरी दिल्ली पोलीसांनी अटक केले आहेत. एका आरोपी भारत देशा बाहेर आहे. अशा एकूण 16 जणांविरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. हे दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर गुरुप्रितसिंघ गुलजारसिंघ खैराने फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 439 प्रमाणे जामीन मिळावा असा अर्ज क्रमांक 834/2022 दाखल केला.
या प्रकरणात आरोपीच्यावतीने ऍड.शिवराज पाटील यांनी बाजू मांडतांना गुरूप्रितसिंघला चुकीचे गोवण्यात आले आहे. तसेच 90 दिवसांत दोषारोपपत्र दाखल झालेले नाही, या गुन्ह्यातील मकोका कायदा रद्द करण्यात आला आहे म्हणून या गुन्ह्याचे दोषारोपपत्र 90 दिवसांत दाखल होणे आवश्यक होते, असे मुद्दे मांडले. सरकार पक्षातर्फे ऍड. यादव तळेगावकर यांनी या गुन्ह्यातील मुख्य आरोपी अद्याप अटक नाही. या आरोपीने गुन्हा करण्यात आपली भुमिका वठवलेली आहे. म्हणून त्याचा जामीन अर्ज नाकारावा. या प्रकरणात मकोका कायदा जोडण्यात आलेला आहे. न्यायालयाने आपला निकाल देतांना या खटल्यातील मकोका कायदा गुरुप्रितसिंघ खैराविरुध्द रद्द झालेला नाही तर इतर दोन आरोपींविरुध्द रद्द झालेला आहे. याप्रकरणाचे गांभीर्य आणि पुराव्यातील योग्यता पुर्णपणे पाहिल्याशिवाय या आरोपीला जामीन देणे योग्य नाही असे लिहुन आरोपी गुरूप्रितसिंघ गुलजारसिंघ खैरा यास जामीन नाकारला आहे, त्याचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे.
संजय बियाणी हत्याकांडातील एका आरोपीला न्यायालयाने जामीन नाकारला