21 लाख 80 हजार रुपयांच्या 30 चोरीच्या दुचाकी पकडल्या

नांदेड(प्रतिनिधी)-वजिराबाद पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने पोलीस उपअधिक्षक चंद्रसेन देशमुख यांच्या मार्गदर्शनात नांदेड शहरातून आणि जिल्ह्यातून चोरी झालेल्या तसेच इतर जिल्ह्यातून चोरी झालेल्या 30 दुचाकी गाड्या पकडून तीन जणांना गजाआड केले आहे. या 30 गाड्यांची किंमत 21 लाख 80 हजार रुपये असल्याची माहिती पोलीस जनसंपर्क विभागाने दिली आहे. पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांनी ही कामगिरी करणाऱ्या पोलीस पथकाचे कौतुक केले आहे.
नांदेड जिल्ह्यातून आणि शहरातून दुचाकी गाड्या चोऱ्या होण्याचे प्रमाण कायमच आहे. यावर उपचार करण्यासाठी वजिराबादच्या गुन्हे शोध पथकाने एक सुंदर व्युहरचना केली आणि या रचनेत त्यांना परभणीचे सहाय्यक पोलीस अधिक्षक अभिनाश कुमार, पोलीस उपनिरिक्षक शेख करीम आणि पोलीस अंमलदार निलेश कांबळे यांची मदत घेवून त्यांनी परभणी येथील शेख अरबाज उर्फ कोबरा शेख चॉंद (24) रा.दर्गाह रोड, पारवा गेट परभणी, आरेज खान उर्फ आमेर आयुब खान (28) रा. मोठा मारोती देशमुख गल्ली परभणी आणि मोहम्मद मुक्तदिर उर्फ मुक्का मोहम्मद अथर (31) रा. स्टेडीयम रोड परभणी यांना ताब्यात घेवून विचारणा केली असता त्यांनी वजिराबाद-6, नांदेड ग्रामीण-1, शिवाजीनगर-3, भाग्यनगर-1, इतवारा-2, गंगाखेड-5, कदीम जालना-2, परतूर-1, आंबेजोगाई शहर-1 अशा 30 गाड्या चोरल्याची माहिती उघड झाली.
वजिराबाद गुन्हे शोध पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरिक्षक संजय निलपत्रेवार त्यांचे सहकारी पोलीस अंमलदार गजानन किडे, विजयकुमार नंदे, शरदचंद्र चावरे, संतोष बेल्लूरोड, व्यंकट गंगुलवार, रमेश सुर्यवंशी, अंकुश पवार यांनी या तिन चोरट्यांना जेरबंद करून 30 गाड्या जप्त केल्या आहेत. आज दि.19 ऑक्टोबर रोजी पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे यांनी स्वत: वजिराबाद येथे येवून गुन्हे शोध पथकाने केलेल्या कामगिरीची माहिती घेवून सर्वांचे कौतुक केले आहे.
या बातमीसोबत वास्तव न्युज लाईव्ह पोलीसांनी चोरीच्या पकडलेल्या 30 गाड्यांचे चेसीस नंबर आणि इंजिन नंबर प्रसारीत करीत आहोत. वाचकांनी आपल्या किंवा आपल्या नातलगांपैकी कोणाच्या या गाड्या असतील तर त्याबाबत चेसीस नंबर व आणि इंजिन नंबरची खात्री करून वजिराबाद पोलीसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस उपअधिक्षक चंद्रसेन देशमुख यांनी केले आहे. पकडलेल्या तीन चोरट्यांना वजिराबाद येथील दुचाकी चोरी प्रकरणात अटक करण्यात आली आहे. त्या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार बापूराव डवरे आणि त्यांचे सहकारी अंकुश पवार हे करीत आहेत.
