नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 55 हजार रूपयांची चोरी झाली आहे, भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरट्यांनी 65 हजारांचा ऐवज लांबविला आहे, धर्माबाद येथे घर फोडून चोरट्यांनी 2 लाख 24 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. देगलूर येथून 40 हजार रूपये किंमतीची गाय चोरीला गेली आहे.
आनंद कन्हैयालाल राठी यांनी दिलेल्या तक्ररीनुसार 16 ऑक्टोबरच्या सकाळी 8 ते 17 ऑक्टोबरच्या सकाळी 7 वाजेदरम्यान एमआयडीसी भागातील त्यांच्या कृपा हर्बल कंपनीत पत्र्याच्या शेडला लावलेले कुलूप तोडून चोरट्यांनी त्यातून एक विद्युत मोटार, एक 15 एचपी विद्युत मोटार, बांधकामाचे लोखंडी प्लेट असा एकूण 55 हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला आहे. नांदेड ग्रामीण पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार संभाजी व्यवहारे अधिक तपास करीत आहेत.
तिरूमला वाडी बु. येथे राहणाऱ्या सुप्रिया राम पावडे या 17 मार्च 2022 रोजी रात्री 8.30 वाजता आपल्या घराला कुलूप लाऊन आपल्या आईच्या घरी गेल्या होत्या. त्या 18 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 7.30 वाजता परत आल्या तेव्हा त्यांच्या घराचा कुलूप कोंडा तुटलेला होता. तपासणी केली असता कपाट फोडून चोरट्यांनी त्यातील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 65 हजार 95 रूपयांचा ऐवज चोरून नेला आहे. भाग्यनगर पोलिसांनीया संदर्भाने गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार जाधव अधिक तपास करीत आहेत.
अभियंता असलेले सुधारक मोहनराव पाटील हे धर्माबाद येथे दिगंबर पवार यांच्या घरात भाडेकरू आहेत. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 18 ऑक्टोबरच्या रात्री 2 वाजेपासून ते 4.30 वाजेदरम्यान त्यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी कुलूप नसलेल्या कपाटातून रोख रक्कम 1 लाख आणि सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण 2 लाख 24 हजार रूपयांचा चोरून नेला आहे. या प्रकरणी धर्माबाद पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक माधव वाडेकर अधिक तपास करीत आहेत.
रविंद्र दिगंबरराव चिंचाळकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 16 ऑक्टोबर रोजी रात्री 11 ते 17 ऑक्टोबर सकाळी 5 वाजेदरम्यान भक्तापूर रोडवरील त्यांच्या गोठ्यात बांधलेली गाय 40 रूपये किंमतीची कोणीतरी चोरून नेली आहे. देगलूर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक कांबळे अधिक तपास करीत आहेत.