नांदेड (प्रतिनिधी)-पवित्र गुरूद्वारा प्रभाग क्रमांक 17 मधील सर्व दारु विक्री दुकाने हटविण्यासाठी दारु बंदी अभियान राबविण्यासाठी मार्गदर्शन करावे अशा आशयाचे निवेदन राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक अतुल कानडे यांना दारु बंदी अभियान महिला महासंघ नांदेड जिल्हाच्या अभियान प्रमुख शितल भवरे यांनी दिले आहे.
नांदेडमधील प्रभाग क्रमांक 17 मध्ये गुरूद्वारा परिसराचा भाग येतो. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा, प.पु.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा, भगवान महाविरांचे मंदिर, हनुमान मंदिर, शितलादेवी मंदिर, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची प्रतिमा, महाकाली मातेचे मंदिर, पोचमा मातेचे मंदिर, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद परिसर, जिल्हा व सत्र न्यायालय, पोलीस अधिक्षक कार्यालय, पोलीस अधिक्षकांचे निवासस्थान, शासकीय दवाखाना, खाजगी डॉक्टरांची वसाहत, धर्मदाय आयुक्त कार्यालय, जीएसटी भवन, भगवान महाविर स्तंभ, जिल्हा परिषदेचे मल्टीपर्पज हायस्कुल, के.आर.एम.महिला महाविद्यालय, आंध्र समिती शाळा, गुजराती हायस्कुल, जिल्हा परिषद गर्ल्स हायस्कुल, पोस्ट ऑफिस, वजिराबाद पोलीस ठाणे आदी महत्वपुर्ण प्रतिष्ठाणे आहेत.
त्यामुळेच या भागातून संपुर्ण प्रभाग दारुमुक्त करण्यासाठी दारु बंदी महिला अभियान महासंघ नांदेडची स्थापना करण्यात आली आहे. या संस्थेच्या माध्यमातून महानगरपालिका प्रभाग क्रमांक 17 मध्ये दारु बंदी अभियान राबविण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या मदतीने उभी बाटली- आडवी बाटलीची निवडणुक घेण्यासाठी पुढाकार घेणार आहे. यासाठी मला या प्रभागत राहणाऱ्या 11610 महिला मतदारांच्या 50 टक्के महिला मतदार अर्थात 5805 महिलांच्या स्वाक्षऱ्या लागणार आहेत. हे काम अतिशय किचकट आणि अवघड आहे. त्यासाठी मी प्रत्येक 100 महिला मतदारांच्या मागे एक महिला प्रवर्तक भगिनीची निवड करून त्यांच्यावतीने ही स्वाक्षरी मोहिम राबविणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र शासनाच्यावतीने दारु बंदी अभियान राबविण्याच्या शासननिर्णयाप्रमाणे मला आपल्या कार्यालयाच्या माध्यमातून योग्य मदत करावी असे या निवेदनात लिहिले आहे.
आडवी बाटली -उभी बाटली मतदान घेण्यासाठी मदतीची मागणी करणारे शितल भवरे यांचे निवेदन