आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये बदल ; नागरी हक्क संरक्षण नांदेड येथे मिणा

नांदेड(प्रतिनिधी)-राज्य शासनाने 20 ऑक्टोबर रोजी केलेल्या काही बदल्यांमध्ये बदल करून हिंगोलीच्या पोलीस अधिक्षक पदावर संदीपसिंघ गिल ऐवजी जी.श्रीधर यांना पाठवले आहे. तसेच सिंधदुर्गचे पोलीस अधिक्षक पवन बनसोड यांना पोलीस अधिक्षक यवतमाळ पदावर पाठवले आहे. यासोबत आणखी काही बदल्या राज्य शासनाने केल्या आहेत.
20 ऑक्टोबर रोजी गृह विभागाने जारी केलेल्या बदल्यांच्या आदेशात हिंगोलीच्या पोलीस अधिक्षक पदावर संदीपसिंघ गिल यांची नियुक्ती दाखवली होती पण ती रद्द करून आता पदस्थापनेच्या प्रतिक्षेत असलेले जी.श्रीधर यांना हिंगोलीचे पोलीस अधिक्षक करण्यात आले आहे. यवतमाळ जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक दिलीप भुजबळ पाटील यांना तेथेच पुढील आदेशापर्यंत थांबण्यास सांगण्यात आले होते. परंतू 21 ऑक्टोबरच्या आदेशात सिंधदुर्गचे पोलीस अधिक्षक पवन बनसोड(यांची फक्त नियुक्ती झाली ते सिंधदुर्गला गेलेच नाहीत) यांना यवतमाळचे पोलीस अधिक्षक करण्यात आले आहे.
नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेले आयपीएस अधिकारी जयंत मिणा यांना नागरीक हक्क संरक्षण नांदेड येथे पोलीस अधिक्षक पदावर पाठविण्यात आले आहे. सोबतच राज्यपालाचे सहाय्यक आयपीएस अधिकारी श्रेणीक दिलीप लोढा यांना सहाय्यक पोलीस अधिक्षक गंगाखेड जिल्हा परभणी येथे पाठविण्यात आले आहे. तसेच पोलीस उपआयुक्त मोटार परिवहन विभाग मुंबई येथे निंबा खंडू पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मोटार परिवहन विभाग पुणे येथे मुख्यालयातील पोलीस अधिक्षक पदावर गायत्री विठ्ठल पवार यांना नियुक्ती देण्यात आली आहे. अशा प्रकारे राज्य शासनाने आपणच केलेल्या आदेशांमध्ये 24 तासात नवीन बदल करत नवीन नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *