शासकीय नोकरी करणाऱ्या व्यक्तींमध्ये बदली हा त्यांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. याच पध्दतीने गेली 703 दिवस नांदेड जिल्ह्याच्या पोलीस अधिक्षक पदावर कार्यरत असलेले प्रमोद शेवाळे यांच्या बदलीचे आदेश 20 ऑक्टोबर रोजी जारी झाले आणि 22 ऑक्टोबर रोजी आदेशाप्रमाणे आपला कार्यभार नुतन पोलीस अधिक्षक श्रीकृृष्ण कोकाटे यांच्या स्वाधीन केला आणि अब तुम्हारे हवाले नांदेड साथीयों असे म्हणत एका निरोप समारंभातून नांदेड जिल्ह्याचा निरोप घेतला. आपल्या 703 दिवसांच्या कालखंडात त्यांच्याकडून काही घ्यायचे असेल तर त्यांच्यातला संयमी पणा हा महत्वाचा गुण प्रत्येकाने घेतला पाहिजे. एखाद्या व्यक्तीमुळे त्यांना व्यक्तीगतरित्या आलेल्या अडचणी, पोलीस अधिक्षकाचे काम करतांना त्या कामात आलेल्या अडचणी या सर्वांना त्यांनी काही घटनांना, काही बाबींना, काही कृतींना उत्तर देण्यापेक्षा मुके राहणे बरे. हे धोरण त्यांच्या संयमी पणाचा कळस आहे. अशा या धैर्यवान, प्रत्येक समस्येला आपल्या जीवनाचा भाग समजून नांदेड जिल्ह्याची सेवा करणाऱ्या प्रमोद शेवाळे यांच्यासाठी शब्दांमधून मांडलेल्या या आदराच्या भावना.
20 नोव्हेंबर 2020 रोजी प्रमोद शेवाळे यांनी नांदेड जिल्हा पोलीस अधिक्षक पदाचा कार्यभार सांभाळला.जिल्ह्यात पोलीस उपमहानिरिक्षक कार्यालयाचे मुख्यालय असल्याने परिक्षेत्रातील इतर तीन पोलीस अधिक्षकांच्या तुलनेत नांदेड पोलीस अधिक्षक म्हणून प्रमोद शेवाळे यांची जबाबदारी जास्त होती. ही जबाबदारी पार पाडतांना हसणारा चेहरा आणि हासणारे मन जागृत ठेवून या जीवनाच्या संपत्तीच्या आधारावर त्यांनी हे सिध्द करून दाखवले की, नेतृत्व आणि कतृत्व कोणाकडून उसने मिळत नाही ते स्वत:लाच तयार करावे लागते. ऐतिहासीक प्रसिध्द व्यक्ती सुर्याजी पिसाळाच्या वृत्तीचे काही जण नांदेड जिल्ह्यात आले आणि आम्हीच आता पोलीस अधिक्षक पद चालवायचे आहे असा प्रचार केला. हळूहळू ही बाब प्रमोद शेवाळे यांच्यापर्यंत पोहचली आणि मग त्यांनी या बाबीवर कोणतीही प्रतिक्रिया न देता अश्रुंना लपवून ओठांना हसवायला लावले आणि त्यातून सुर्याजी पिसाळ प्रवृत्तीवर समर्थपणे मात केली. एखाद्या व्यक्तीसमोर आपली मान कापून जरी ठेवली तरी तो म्हणेल की, एवढीच का कापली, बरोबर नाही कापली, थोडी खाली कापली असती तरीही काही बिघडल असता का? पण अशा दगडांसोबत राहुन सुध्दा आपल्या 703 दिवसांचा ईतिहास सुवर्ण अक्षरात लिहुन प्रमोद शेवाळे यांनी हे दाखवून दिले की, वेळ कोणाची वाट पाहत नाही तो सर्वांना वाट पाहायला लावतो आणि स्वत: कधी कोणासाठी थांबत नाही. अशाच पध्दतीने काम करत आपल्या मागील जीवनाच्या अनुभवातून धडे घेत अंदाज चुकीचा असू शकतो पण अनुभव कधीच चुकत नाही कारण अंदाज ही आपल्या कामाची कल्पना आहे आणि अनुभव हे आपल्या जीवनातील सत्य आहे हे प्रमोद शेवाळे यांनी दाखवून दिले.
प्रमोद शेवाळे यांनी नांदेड जिल्ह्याचा पदभार घेतल्यानंतर अनेक गुन्हेगारांना गुन्हा घडल्यानंतर अत्यंत कमी वेळेत गजाआड करण्याच्या अनेक शानदार प्रक्रिया पुर्ण झाल्या. या प्रक्रियांमध्ये त्यांच्या सहकारी अधिकारी आणि पोलीस अंमलदारांनी त्यांच्या हाकेला दिलेला ओ सुध्दा तेवढाच महत्वपूर्ण होता आणि त्या आधारावर त्यांनी सर्वसामान्य माणसाच्या मनातील भिती कशी दुर करता येईल यासाठी प्रयत्न केले. काही जणांनी अशा पण भुमिका घेतल्या मला काही माहित नाही. या भुमिकांना सुध्दा अत्यंत सकारात्मकपणे स्विकारून त्यांनी आपल्या काही निवडक साथीदारांच्या मदतीने प्रत्येक समस्येचे निराकरण केले. आपले विचार इतरांना पटत नाहीत असे होतच असते. पण त्यामुळे आपण आपले विचार मांडायचे नाहीत काय? अशा परिस्थितीत आपले काही विचार कोणाला पटत नाहीत हे सत्य असले तरी ते विचार सर्वांना विचार करायला लावतात. या शब्दांप्रमाणे प्रमोद शेवाळे यांनी आपले काम काज चालवले. आपल्यावर होणाऱ्या टिकांना अत्यंत धैर्यवानपणे त्यांनी ऐकले कारण याच टिका आपल्या जीवनातील कचरा बाजूला सारण्यासाठी साबणाचे काम करतात. म्हणूनच प्रमोद शेवाळे हे ताकतवान व्यक्ती असतांना सुध्दा त्यांनी आपली ताकत दाखवली नाही आणि त्यांनी दाखवलेला संयम त्यांच्यातील ताकत दाखवतो.
कधी-कधी आपल्याला भुत व्हायला हवे त्यातून आकर्षण विसरले जाते आणि आपली वाढ एकांतात आणि खाजगीत होते. भविष्यातील जीवनात आपल्या संयमी विचारांना थोडासा बदलण्यासाठी पण विचार करावा असेच या शब्दांमधून आम्हाला सांगायचे आहे.आपण कधीच काही करू शकत नाही तेंव्हा एक बाब आवश्य करू शकतो ते म्हणजे प्रयत्न.हे प्रयत्न करतांना अनेक अडचणी येतील पण त्या अडचणींवर मात करतांना अभंग राहण्याची गरज आहे. कारण आपल्यावर घाव घालणारे आपल्या कर्मामुळे स्वत:च तुटतात आणि जे घावांना सहन करतात ते नेहमीच अभंग राहतात.703 दिवसांमध्ये आपल्या आयुष्याची खरी संपत्ती दिसली ते म्हणजे आपले विचार. कारण धन आणि बळ माणसाला वाईट मार्गावर नेऊ शकतात. परंतू चांगले विचार माणसाला सदैव उत्तम कार्यासाठी प्रेरीत करत असतात. नांदेडच्या 703 दिवसांच्या कालखंडातील ज्यांनी तुम्हाला संधी दिली त्यांना कधीच धोका देऊ नका आणि ज्यांनी धोका दिला त्यांना यापुढे तरी कधीच संधी देऊ नका. कारण त्याचा परिणाम आपल्याच जीवनावर होणार आहे. आजच्या युगात आपल्याकडे असलेल्या पदाप्रमाणे आपल्यासमोर हात जोडून नम्रपणा दाखवणाऱ्यांमध्ये दोन प्रकारच्या व्यक्ती आहेत एक अशा व्यक्ती आहेत ज्यांना आपल्याकडून काही तरी हवे आहे आणि दुसरे असे व्यक्ती आहेत ते आपल्यासमोर नम्रपणे वागले. त्यातून त्यांच्या स्वभावातील श्रीमंती ओळखता आली पाहिजे. आजच्या या धावत्या युगात आम्ही सुई धागा विसरलो आहोत कुणाला त्याची आठवण येत नाही. कारण आज काल फाटलेली नाती शिवायची गरज कोणालाच वाटत नाही. पण आपल्या पोलीस सेवा काळात सुरूवातीपासून नांदेडपर्यंत जी मंडळी आपल्या आजही संपर्कात आहे ती मंडळी खऱ्या अर्थाने तुमच्या गळ्यातील मोती आहेत. त्यांना नक्कीच सांभाळून ठेवा.
आपल्या जीवनातील प्रवासाला अत्यंत लयबध्द पध्दतीत आणि सुमधुर ध्वनीत चालविण्यासाठी या जगाला चालवणाऱ्या त्या शक्तीने सौ.सारीकाजी पाठवल्या आहेत. त्यांच्या सहवासात तुमच्या बागेत दोन फुले उमलली आहेत. त्या फुलांना सांभाळत आपल्या आनंदाला अर्थात प्रमोदला सुव्यवस्थीत स्थितीत जीवनाचा प्रवास करायला लावणाऱ्या सौ.सारीकाजींचा वाटा सुध्दा एक महत्वपूर्ण स्थान प्राप्त करते. सारीका या शब्दांचा अर्थात बासरी आणि दुर्गापण आहे. वेळप्रसंगी त्या दुर्गेच्या रुपात सुध्दा तुमच्या सोबत उभ्या राहव्यात आणि आपल्या या जीवन प्रवासात त्यांची साथ तुम्हाला सदैव मिळावी या शुभकामनासह, “सायोनारा’ म्हणत आहोत.पण प्रश्न श्रावणी निवास मधील त्या पाखरांचा आम्हाला जास्त आहे.आपण कुटुंबासोबत नांदेड येथून रवाना झालात कि त्यांची किलबिल गोठणार आहे. त्यांचा आवाज निघणार नाही. तेव्हा नांदेडला आहात तेव्हा पर्यंत त्यांना सवय लागेल असे काहीतरी नक्कीच करा,कारण दुसऱ्या सोबतीला जुळवून घेण्यासाठी नक्कीच वेळ लागतो.
आपल्या संयमाने अनेकांना सरळ करणारे व्यक्तीमत्व प्रमोद शेवाळे