नांदेड(प्रतिनिधी)-ज्या-ज्या ठिकाणी अवैध धंदे चालतात त्या अवैध धंद्यांमध्ये स्थानिक पोलीस, सामाजिक कार्यकर्ते यांचे संगनमत असू शकते. अशा ठिकाणी एकदा छापा टाकल्यावर दुसऱ्यांदा छापा टाकण्याची गरज पडू नये अशा पध्दतीने मी काम करणार असल्याचे नुतन पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सांगितले.
22 ऑक्टोबर रोजी नांदेड जिल्ह्याच्या पोलीस अधिक्षक पदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर आज एका चोरीच्या गुन्ह्याची माहिती देण्यासाठी बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत श्रीकृष्ण कोकाटे बोलत होते. नांदेड जिल्ह्याचा भुगोल हा मोठा आहे. येथील सामाजिक स्थिती सुध्दा मोठी आहे. या सर्वांचा माझा थोडा अभ्यास पण आहे. कारण मी सन 2013 मध्ये 15 दिवस नांदेडच्या पोलीस अधिक्षक पदाचा कार्यभार सांभाळलेला आहे. तो माझा अनुभव आणि माझ्यातील कुशलता वापरून मी अवैध धंद्यांवर जरब आणण्यासाठी पुर्णपणे प्रयत्न करणार आहे असे श्रीकृष्ण कोकाटे म्हणाले.
ज्या ठिकाणी अवैध धंदे चालतात त्या ठिकाणी वारंवार छापे टाकावे लागतात याबद्दल आपले मत विषद करतांना श्रीकृष्ण कोकाटे म्हणाले की, वारंवार एकाच ठिकाणी अवैध धंदे चालतात म्हणजे त्यामध्ये स्थानिक पोलीस, सामाजिक कार्यकर्ते यांचे संगनमत असू शकते. त्यासाठी पुर्णपणे, बारकाईने अभ्यास करून एकदा छापा टाकल्यावर तेथे पुन्हा अवैध धंदा होणार नाही याची दक्षता घेवून तो अवैध धंदा कायम बंद व्हावा यासाठी माझ्यातील सर्व कुशलता मी वापरणार आहे असे श्रीकृष्ण कोकाटे म्हणाले.


नांदेड शहरात असंख्य लोकांकडे अवैध बंदुका सापडल्या. यावर सविस्तर बोलतांना श्रीकृष्ण कोकाटे म्हणाले की, अशा प्रकारे अवैध पिस्तुल अनेक ठिकाणी तयार होतात. ते थेट येतात आणि थेट त्याची डिलेव्हरी होते या सर्व बाबींवर बारकाईने मी लक्ष ठेवणार आहे. ज्या युवकांना या अवैध बंदुकांचा ध्यास लागला आहे त्यांना एकत्रितपणे समोपदेशनाद्वारे त्यापासून दुर करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे.
आजच्या युगात घडणारा सायबर क्राईम हा एक मोठा विषय आहे. त्यासाठी शाळा, महाविद्यालये यांच्यासोबत संपर्क साधून त्यांना सायबर क्राईमपासून वाचण्यासाठी योग्य प्रशिक्षण देण्याची योजना मी आखत असल्याचे श्रीकृष्ण कोकाटे म्हणाले. काल रात्री एक बॅग चोरी झाली आहे त्यातील गुन्ह्याची तक्रार आल्यानंतर त्यात किती रक्कम लुटली गेली याबाबत सत्यता कळेल असे श्रीकृष्ण कोकाटे म्हणाले. तात्पुर्त्या अधिकाऱ्यांच्या नियुक्तीबदल विचारलेल्या प्रश्नावर श्रीकृष्ण कोकाटे यांनी गप्प राहणे पसंत केले.
नांदेड जिल्ह्यातून जाणारी भारत जोडो यात्रा हा समारोह नांदेड जिल्हा पोलीस दलासाठी एक अत्यंत आव्हानात्मक कार्य आहे. त्यासाठी जवळपास 3 हजार पोलीस अंमलदार आणि 400 अधिकारी यांच्या नियोजनात त्या यात्रेचा समारोप योग्यरितीने व्हावा यासाठी संपुर्ण नांदेड जिल्हा पोलीस दल प्रयत्न करत असल्याचे श्रीकृष्ण कोकाटे यांनी सांगितले.