नांदेड(प्रतिनिधी)-मटका जुगार अड्डे बंद असतांना सुध्दा त्यातील टेबल खुर्च्यांची मोडतोडू करून आपला जरब दाखवणाऱ्या शिवाजीनगर पोलीसंाना गोकुळनगर भागात सुरू असलेला जुगार अड्डा कसा दिसत नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मटका हा जुगार आमच्या हद्दीत चालत नाही हे दाखवण्याची एक स्पर्धा पोलीसांमध्ये लागलेली असते. पण मटका हा जुगार सर्वच पोलीस ठाण्यांच्या हद्दीत चालतो. प्रसंगी त्या ठिकाणी छापे टाकले जातात. सापडलेल्या रक्कमेमधील बरीच मोठी रक्कम जप्त दाखवली जाते. इतर रक्कमेचे काय होते हे माहित नाही. लगेच त्या मटका बुक्कीवरील कांही लोकांविरुध्द महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल होतो आणि हा गुन्हा तीन वर्षापेक्षा कमी शिक्षेचा असल्याने पोलीसांनाच त्या गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींना जामीन द्यावाच लागतो.जामीन देण्यासाठी फिस आकारली जाते आणि मग सर्व कांही आलबेल होते आणि मटक्याची बुक्की कांही तासातच पुन्हा सुरू होते. अशा प्रकारे या मटक्याचा उत्कृष्ट, बेकायदेशीर पण कायदेशीर असा व्यवसाय सुरू असतो.
कांही ठिकाणी शिवाजीनगर पोलीसांनी मटक्याची बुक्की बंद असतांना सुध्दा त्या दुकानात जावून तेथील टेबल, खुर्च्यांची मोडतोड केली यामागचे काय गणित असते. हे लिहुन आम्ही सर्वच बाबी उघड करण्याच्या मनस्थितीत नाहीत.तरीपण अत्यंत राजरोसपणे मटका व्यवसाय सध्या सुरू असल्याचे दिसते आहे.
गोकुळनगर भागात एक उर्दु शाळा आहे या शाळेच्या शेजारीच एक मटक्याची बुक्की आहे. काल मटक्याचे कांही आकडे लावून या बाबतचे फोटो आम्ही प्राप्त केले. प्राप्त केलेल्या फोटोमध्ये मटका घेणाऱ्या त्या रोजंदारीवरील माणसाला कोणाचीही भिती नाही हे स्पष्टपणे जाणवले. पध्दतशिरपणे खुर्ची-टेबलवर बसून मटक्याचे आकडे लिहिण्यासाठी त्या समोर मोठे पुस्तक ठेवलेले दिसते आणि अत्यंत आरामशिर, अत्यंत कायदेशीर, सक्षम अधिकाऱ्याची परवानगी घेवून आपण मटका घेत असल्याच्या अर्विभात तो व्यक्ती मटक्याचे आकडे लिहुन घेत आहे.कोणी तरी यावर कार्यवाही करेल काय असा प्रश्न तयार होत आहे.
गोकुळनगरमध्ये सुरू आहे मटका हा घ्या पुरावा