नांदेड(प्रतिनिधी)-देशातील खाजगीकरण नरसिंहाराव आणि मनमोहनसिंघ यांनी सुरू केले होते. त्यामुळे आज सुरू असलेला देशातील सरकारचा खेळखंडोबा कॉंग्रेस कधीच मांडू शकणार नाही अशा शब्दात वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी आपला आवाज बुलंद केला.


काल दि.5 नोव्हेंबर रोजी धम्म मेळाव्याच्या व्यासपिठावरून ऍड. बाळासाहेब आंबेडकर बोलत होते. याप्रसंगी बोलतांना ऍड. आंबेडकर म्हणाले आज राहुल गांधी भारत जोडोच्या नावाखाली देशभर यात्रा करीत आहेत. प्रश्न असा आहे की, भारत तुटलाच कधीच होता. देशभर फिरून काय मिळणार त्या पेक्षा मोदीच्या समोर उभे राहुन त्यांना प्रश्न विचारले पाहिजे आणि उत्तरे शोधली पाहिजेत. पण हे राहुल गांधी करू शकत नाहीत.राहुल गांधीने काढलेल्या या भारत जोडो यात्रेने लोकांचा विश्र्वास प्राप्त केला. पण हा पाण्याचा बुडबुडा आहे. मार्च संपला की हा विश्र्वास संपेल. दोन वेगवेगळ्या लोकांमध्ये भांडणे लावून आपले ध्येय साधण्यासाठी सरकारने केलेले कट कारस्थान एवढे मोठे आहेत की, कोणताही नेता त्याला मिटवू शकणार नाही. आम्ही आजही त्याच रस्त्यावर चालत आहोत. आम्हाला त्यातून स्वत:ला वेगळे करता आले पाहिजे. आज परिस्थिती भारतात देशाचा नेता कोणी नाही तर कोणी समाजाचा नेता आहे, एका जातीचा नेता आहे, कोणी एका गटाचा नेता आहे अशी परिस्थिती आहे.
आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळे आम्हाला जे मिळाले ते आम्हाला टिकवून ठेवण्यासाठी मेहनत करावी लागत आहे. त्यांनी सुध्दा सांगितले होते की, मी हा गाडा इथपर्यंत आणला आहे आता हा सांभाळण्याची जबाबदारी तुमची आहे आणि हीच जबाबदारी आपण सर्वांनी पार पाडली काय? हा मोठा प्रश्न आहे. ही जबाबदारी पुर्णपणे पार पाडली नसेल तर पुढील आपली पिढी कशी सुरक्षीत राहिल असा प्रश्न ऍड. आंबेडकरांनी उपस्थित केला. आजच्या परिस्थितीत निवडणूकीवर होणारा खर्च आणि त्याला लागणारा सर्व भौतिक सुविधांचा भंडारा हा आम्ही उभा करू शकत नाही. आजच्या परिस्थितीत शेतकऱ्यांची आवस्था अत्यंत वाईट असून त्याला आपल्या मेहनतीची फळे मिळत नाहीत. शेतकऱ्याला त्याचा उसाचा दर योग्य मिळत नाही तर ऊसाच्या मळीपासून तयार होणाऱ्या इथेनॉलचा दर जास्त आहे. ही विडंबना असल्याचे ऍड. बाळासाहेब आंबेडकर म्हणाले. अशा प्रसंगता शेतकऱ्याने जातीने महत्व न देता माझ्या ऊसाला जास्त भाव कोण देईल त्या माणसाबद्दनल शेतकऱ्याने जास्त प्रेम भाव बाळगला पाहिजे, त्याच व्यक्तीला सत्तेत बसवायला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. पण शेतकरी असे करत नाही आणि जातीसाठी माती खातो आणि मग आत्महत्या करतो ही दुर्देवी घटना असल्याचा उल्लेख ऍड. बाळासाहेब आंबेडकरांनी केला.आपली आपल्याशी नितीमत्ता बांधील असली पाहिजे आणि ती नितीमत्ता टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला अहोरात्र मेहनत केली पाहिजे असा सल्ला ऍड. बाळासाहेब आंबेडकरांनी दिला.
नवा मोंढा मैदानावर झालेल्या या धम्म मेळाव्यात मोठी गर्दी जमली होती. इतर गावांवरुन सुध्दा बरेच व्यक्ती आले होते. त्यांची वाहने सुध्दा विविध वाहनतळात लावलेली होती. पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनात असंख्य पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार या धम्म मेळाव्यात उपस्थित होते.
