नांदेड(प्रतिनिधी)-लिंगायत समाजाचे भक्तीस्थळ असलेल्या राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या समाधीची विटंबना करतांना काही समाज कंटकांनी ती समाधी खोदून काढली आणि त्यातून महाराजांच्या अस्थींसह अष्टधातूची पेटी लंपास करण्यात आली आहे. याबाबत अहमदपूर पोलीस ठाण्यात तक्रारही देण्यात आली आहे.
प्राप्त झालेल्या एका निवेदनानुसार पोलीस निरिक्षक अहमदपुर, तहसीलदार अहमदपूर, पोलीस अधिक्षक लातूर, जिल्हाधिकारी लातूर, गृहमंत्री महाराष्ट्र राज्य, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आणि गृहमंत्री भारत सरकार यांना हे निवेदन पाठविण्यात आले आहे. लिंगायत समाजाचे सदगुरू डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज यांची शासकीय इतमामात अंत्यविधी करून त्यांची समाधी अहमदपूर येथे बनविण्यात आली होती. त्यामध्ये एका अष्ट धातूच्या पेटीमध्ये महाराजांच्या अस्थी ठेवण्यात आल्या होत्या. सोबतच समाधीवर देवाधी देव महादेवाची पिंड सुध्दा समाजकंटकांनी पळवली आहे.
घडलेला प्रकार असा आहे की, 8 नोव्हेंबर रोजी या भक्तीस्थळाचे बाहेरगावी राहणारे विश्र्वस्त यांना ही माहिती मिळाली. समाधीची विटंबना करतांना समाजकंटकांनी तीन फुट रुंद आणि तीन फुट लांब अशी अष्टधातूची पेटी ज्यामध्ये महाराजांच्या अस्थी ठेवण्यात आल्या होत्या ती पेटी पळवली आहे. तसेच समाधीवर असलेली भगवान महादेवाची पिंड सुध्दा पळवून अधर्म झाला आहे. ही अपवित्र कृती करणाऱ्यांवर कायदेशीर कार्यवाही करावी असे या निवेदनात लिहिले आहे.
या निवेदनावर विश्र्वस्त मंडळातील माधव अण्णाराव बरगे, सुभाष वैजनाथ सराफ, बब्रुवान देवराव हैबतपूरे, व्यंकटराव गंगाधरराव मुद्दे, शिवशंकर बळीराम मोरगे, संदीप लक्ष्मणअप्पा डाकुलगे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
संत महात्म्यांची समाधी उकरुन केलेले हे कृत्य काय केेले असेल याचा शोध होणे अत्यंत आवश्यक आहे. यामागे ही कृती करण्याची काय मनशा असेल हे शोधने सुध्दा तेवढेच आवश्यक आहे. शांतताप्रिय समाजात अशी अधर्मी कृती करून असे का करण्यात आले याचा शोध घेवून गुन्हेगारांना शिक्षेपर्यंत पोहचविण्यात यावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
सदगुरू डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराजांची समाधी उकरून समाजकंटकांनी अधर्म केला