शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाय पॉईंटजवळ सुरू आहे अवैध गॅस पंप

नांदेड(प्रतिनिधी)-घरगुती गॅसचा वापर वाहनांमध्ये इंधन म्हणून करण्याचा धंदा शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाय पॉईंटजवळ अत्यंत जोरदारपणे सुरू आहे. यावर का प्रशासन कारवाई करत नाही हा एक लपलेला प्रश्न आहे.
घरगुती गॅसचा वापर इंधन म्हणून वाहनात करण्याचा एक नवीन कमी मेहनतीचा आणि लवकर पैसे कमावण्याचा धंदा सुरू झाला आहे. एका घरगुती गॅस सिलेंडरमध्ये फक्त 14 किलो गॅस असतो. घरगुती गॅस सिलेंडरमधील दबाव हा कमी शक्तीचा असतो. त्यामुळे त्या सिलेंडरमधील संपुर्ण गॅस बाहेर काढण्यासाठी पाणी गरम करून ते सिलेंडर त्या गरम पाण्यात ठेवावे लागते. एका घरगुती गॅस सिलेंडरचा पुर्ण गॅस निघाला नाही तर ते नुकसान होते म्हणून अशा प्रकारे हा प्रकार सुध्दा सुरूच असतो.
तीन चाकी वाहनांमध्ये गॅस भरण्यासाठी नांदेड शहरापासून बरेच दुर जावे लागते. म्हणून तीन चाकी वाहनांचे चालक आणि मालक अशा बेकायदेशीर गॅस पंपावरून गॅस भरून घेतात. या अवैध गॅस पंप चालकांनी सुध्दा आपला प्रचार करण्यासाठी संकेतस्थळांचा वापर करून उत्कृष्ट जाहिरात चालवलेली असते.जाहिरातीमुळे अवैध गॅस भरून घेण्यासाठी ग्राहकांची गर्दी सुध्दा वाढते. म्हणून या अवैध गॅस पंप चालकांचा व्यवसाय हा बिनदिक्कत सुरू आहे.
गॅस वापर, त्याचे वाटप, यावर महसुल प्रशासन यंत्रणेतील जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचे नियंत्रण असते. सोबतच पोलीस यंत्रणा त्यांच्या मदतीसाठी तयारच आहे. मग अशा या परिस्थितीत महसुल किंवा पोलीस या दोन्ही यंत्रणा वायपॉईंटवर सुरू असलेल्या गॅस पंपची दखल का घेत नाहीत याचे उत्तर शोधण्यासाठी एखाद्या उच्चस्तरीय समितीचे गठण करावे लागेल अशी परिस्थिती आज आहे. अवैधपणे घरगुती गॅस सिलेंडरचा गॅस इंधन म्हणून वाहनात भरणे सुध्दा एक मोठा धोकादायक प्रकार आहे. त्यामुळे अनेकदा स्फोट झालेले आहेत. तरीपण हा व्यवसाय अत्यंत जोमात कसा सुरू आहे हे लिहिणेच अवघड आहे.

काही दिवसांपुर्वी पोलीस ठाणे शिवाजीनगरच्या पाठीमागे घडलेला एक जबरी चोरीचा प्रकार शिवाजीनगर पोलीसांच्या अत्यंत कर्तव्यदक्ष गुन्हे शोध पथकाने 24 तासांच्या आत उघडकीस आणून जबरदस्तीने चोरलेला ऐवज 100 टक्के जप्त केला होता. पण त्यांच्या हद्दीत सुरू असलेला हा अवैध गॅस पंप त्यांना का दिसत नाही हा ही एक प्रश्न अनुत्तरीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *