राम गगराणीसह तिघांना 12 दिवसानंतर मिळाला जामीन

नांदेड(प्रतिनिधी)-4 नोव्हेंबर रोजी अटक झालेल्या रामनारायण गगराणी, त्यांच्या पत्नी जयश्री गगराणी आणि पुत्र प्रथमेश गगराणी या तिघांना जिल्हा न्यायालयाने जामीन दिल्याची माहिती ज्येष्ठ विधीज्ञ ऍड.आर.जी.परळकर यांनी दिली.
4 नोव्हेंबर रोजी सकाळी 6 वाजता वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा क्रमांक 387/2022 असा होता. या गुन्ह्यात आपल्या संपत्तीच्या ज्ञात स्त्रोंच्या व्यतिरिक्त गगराणी कुटूंबियांकडे 45 टक्के संपत्ती जादा होती. त्यांच्याकडे 28 लाख 72 हजार 660 रुपयांची अपसंपदा आहे असा आरोप या गुन्ह्याच्या फिर्यादीत आहे. 4 नोव्हेंबर रोजी प्रथमेश गगराणीला 7 नोव्हेंबरपर्यंतची पोलीस कोठडी मिळाली. त्यानंतर त्यांचे वडील सेवानिवृत्त मनपाचे अपर आयुक्त तथा अपर जिल्हाधिकारी रामनारायण लक्ष्मीनारायण गगराणी आणि त्यांच्या पत्नी जयश्री गगराणीला 5 नोव्हेंबर ते 9 नोव्हेंबर अशी पोलीस कोठडी न्यायालयाने दिली. 7 तारखेला प्रथमेश गगराणीची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांची पोलीस कोठडी न्यायालयाने दोन दिवस वाढवली.
9 नोव्हेंबर रोजी रामनारायण गगराणी, जयश्री गगराणी आणि प्रथमेश गगराणी या तिघांना न्यायालयात हजर करून न्यायालयाने त्यांची पोलीस कोठडी वाढवून द्यावी अशी विनंती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली. त्याचवेळी तिघांच्यावतीने जामीन अर्ज सुध्दा देण्यात आला. पण न्यायालयाने तिघांना न्यायालयीन कोठडीत अर्थात तुरूंगातच पाठविले.
आज ऍड.आर.जी.परळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार न्यायालयाने त्यांच्या सादरीकरणानंतर तिघांना प्रत्येकी 50 हजार रुपयांची सालवन्सी घेवून जामीन दिला आहे. सोबतच दर मंगळवारी आणि दर शनिवारी तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात दोन तास हजेरी द्यायची आहे असा आदेश न्यायालयाने दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *