जामीन मिळाला म्हणून खूश होवू नकोस;तुझा एन्काऊंटर मीच करणार इती श्री अशोकरावजी घोरबांड उवाच

नांदेड(प्रतिनिधी)-एका गुन्ह्यातील आरोपीची जामीन झाल्यानंतर पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या प्रांगणात त्याची भेट नांदेड ग्रामीणचे कर्दनकाळ पोलीस निरिक्षक श्री.अशोकरावजी घोरबांड सोबत झाली. जामीन झाली तर खुश होवू नकोस तुझा लवकरच एन्काऊंटर करतो आणि तुझ्या कपाळावर गोळी मारता असे अभंग वाणीतील वचन सांगितले आहे. याबाबत त्या युवकाने आजच या घटनेची तक्रार पोलीस अधिक्षक नांदेड साहेबांकडे केली आहे.

बलप्रितसिंघ उर्फ आशिष नानकसिंघ सपुरे यांनी पोलीस अधिक्षक कार्यालयात दिलेल्या तक्रारीनुसार तो नंदीग्राम सोसायटी येथील राहणारा आहे. याच्याविरुध्द नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 665/2021 दाखल झालेला आहे. या गुन्ह्यात पोलीस कोठडी दरम्यान पोलीस निरिक्षक अशोक घोरबांड व इतर पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मला बेदम मारहाण केली होती. त्या संदर्भाची तक्रार मी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी नांदेड यांच्याकडे केली होती.

गुन्हा क्रमांक 665 मध्ये मला जामीन मिळाली. दि.15 नोव्हेंबर रोजी मी तुरूंगातून बाहेर आलो. माझ्यावर प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्याकरीता स्थानिक गुन्हा शाखा कार्यालय, पोलीस अधिक्षक कार्यालय येथे घेवून गेले होते. स्थानिक गुन्हा शाखेने मला पुन्हा दि.16 नोव्हेंबर रोजी बोलावले. त्यानुसार मी आज दि.16 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजेच्यासुमारास स्थानिक गुन्हा शाखा कार्यालयात गेलो होतो. तिकडे जातांना नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक अशोक घोरबांड यांनी मला जातांना थांबवले आणि विचारले तुझी जामीन कधी झाली, तु न्यायालयात माझी तक्रार करतोस काय?, माझे काही वाकडे होणार नाही, कोणाकडे तक्रार करायची ते कर, तुझा लवकरच एन्काऊंटर करतो, तुझ्या कपाळावर गोळी मारतो असे सदवचन बोलले. आशिष सपुरेने लिहिल्याप्रमाणे ती जिवे मारण्याची धमकी आहे. पुढे अशोक घोरबांड साहेब असेही म्हणाले की, तुझी जामीन झाली म्हणून जास्त खुश होवू नकोस, तुला कोणत्याही खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवून तुझा बंदोबस्त करतो, एक 399 ची केस तर तयारच आहे. त्याच्यामध्ये तुझे नाव टाकतो अशी धमकी देऊन तेथून निघून गेले आहेत. ही सर्व घटना पोलीस अधिक्षक कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहे असेही अर्जात लिहिले आहे.

गुन्हा क्रमांक 665/2021 मध्ये न्यायालयाने मला दर रविवारी सकाळी 10 ते 11 या वेळेदरम्यान पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण येथे हजेरी लावण्याचे आदेश दिलेले आहेत. पोलीस निरिक्षक अशोक घोरबांड यांच्याकडून माझ्या जिवीतास धोका आहे. सत्र न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून मी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात हजेरी लावण्यासाठी गेलो तर पोलीस निरिक्षक अशोक घोरबांड मला कोणत्याही खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवू शकतात याची मला भिती आहे. तरी साहेबांनी मला एन्काऊंटर करण्याची धमकी देणाऱ्या, खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देणाऱ्या नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक अशोक घोरंबाड यांच्याविरुध्द तात्काळ कार्यवाही करावी अशी विनंती आशिष सपुरेने केली आहे.

आशिष सपुरे हा युवक कालच तुरूंगातून बाहेर आलेला आहे. त्यामुळे त्याला बहुदा हे माहित नसेल की, श्री.अशोकरावजी घोरबांड साहेब हे नांदेड ग्रामीण पोलीस ठाणे सोडण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी त्यांनी फिल्डींगपण लावलेली आहे म्हणे.काय असते फिल्डींग कशी लावली जाते ती फिल्डींग आणि श्री.अशोकरावजी घोरबांड साहेब यांना स्थानिक गुन्हा शाखेतच जायचे आहे ही माहिती बहुधा आशिष सपुरेला नसेल म्हणूनच त्यानेआज अर्ज दिला असेल असे वाटते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *