हरविंदरसिंघ उर्फ रिंदाचा मृत्यू युवकांचे डोळे उघडणारी घटना ; ओळख न मिळता मृत्यू मिळाला

नांदेड(प्रतिनिधी)-शनिवार दि.19 नोव्हेंबरच्या सुर्यास्तानंतर देशभर गाजत असलेली बातमी म्हणजे हरविंदरसिंघ उर्फ रिंधा संधु याचा पाकिस्तानच्या लाहोरमध्ये झालेला मृत्यू. ही घटना आजच्या परिस्थितीत युवकांचे डोळे उघडणारी घटना आहे. ज्या पाकिस्तानच्या विश्र्वासावर आतंकवादी त्यांच्याकडून जावून शरण घेतात. तेच आयएसआय एजंट त्यांची जीवनयात्रा सुध्दा समाप्त करतात असे या घटनेवरुन दिसते. हिंसाचार, बंदुक आणि त्यातील गोळ्या हा जीवनाचा आधार नसून सुधारणेचे अनेक मार्ग युवकांसाठी मोकळे आहेत. युवकांनी त्यावर नक्कीच भर द्यावा असे सांगणारी ही घटना आहे. अत्यंत कमी वेळेत भारतात आणि भारताबाहेर सुध्दा रिंदाने आतंकवादाच्या भितीचे असंख्य ढग तयार केले. पण अखेर ते ढग फोडले गेले आणि त्या ढगातून पाऊस येण्याऐवजी रक्तच बाहेर आले. रिंदाच्या मृत्यूमुळे अनेक रहस्य रहस्यच राहणार आहेत. असो पण या घटनेचा अभ्यास करून या पुढे तरी चुकीच्या मार्गाने जाणाऱ्या युवकांनी आपल्यामध्ये बदल घडविण्याची नक्कीच गरज आहे. दिवा कितीही छोटा असला तरी तो एखाद्या उंच पर्वतावरुन आपण असल्याची साक्ष देतो. त्यामुळे प्रकाश आहे ही बाब सिध्द होते. या प्रकाशाच्या आधारावर खुप उजेड मिळणार नाही पण उजेडाची दिशा नक्कीच मिळते.
मागील आठवड्यामध्ये रिंदाला किडणी आजारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली. अनेक प्रसार माध्यमांनी याचा शोध घेण्यास सुरूवात केली. पुढे या प्रकरणात कोणी सांगतात की, रिंदाला लोहारच्या सैन्य दवाखान्यात उपचार देण्यात आले. पण त्याच्या उपचारात औषधांचा दिलेला डोस जास्त झाला आणि त्यातून तो परत येवू शकला नाही. शनिवार दि.19 नोव्हेंबर रोजी त्याच्या मृत्यूच्या घटनेला अनेक प्रसार माध्यमांनी दुजोरा देत आप-आपले सोर्स वापरून माहिती काढली आणि रिंदाच्या मृत्यूची घटना घडली आहे हे सांगितले. मृत्यूनंतर आपली ओळख सुध्दा रिंदाला मिळणार नाही हे यातील सर्वात मोठे दुर्देव आहे. कारण रिंदा पाकिस्तानच्या आयएसआय संरक्षणात तेथे राणा या नावाने राहत होता.त्यामुळे रिंदा मेला या बाबीला आयएसआय किंवा पाकिस्तान कधीच दुजोरा देणार नाही. पाकिस्तानने आणि आयएसआयने रिंदाचा वापर त्याने ज्यागतीने भारतात आतंकवाढविला त्यासाठी केला होता.रिंदाची सर्वात मोठी कामगिरी आयएसआयला काही आवडली असेल तर धार्मिक मुद्यांचा आधार घेवून त्याने वाढविलेला आतंक खुप जोरदारपणे पुढे आला. रिंदाने एक नवीन पध्दत आणली होती. त्या पध्दतीतून त्याने छोट्या-छोट्या गुन्हेगारांना आपल्या आपसातील वैर विसरुन एकत्र करण्याची मोहिम राबवली होती. त्यात त्याला यशही आले होते आणि याच बाबींचा फायदा पाकिस्तान घेवू इच्छीत होता. त्यानुसार त्यांनी रिंदाला आपलेसे केले. त्याला कुटूंबाची सुरक्षा देण्याचा भरवसा दिला आणि त्यातूनच रिंदा आयएसआयच्या गळाला लागला.
नांदेड, नाशिक, तरणतारण पंजाब येथून आपल्या जीवनाची सुरूवात करणाऱ्या हरविंदरसिंघ उर्फ रिंदाने नांदेडसह देशभरात असंख्य गुन्हे केले. त्यात खून, खंडणी, रॉकेट हल्ले असे अनंत प्रकार आहेत. त्याच्या या हल्यांमध्ये नांदेडमध्ये सुध्दा संजय बियाणीचा जीव गेला. माजी नगरसेवक गोविंद कोकुलवार आजही दुर्धर अवस्थेत आपले जीवन जगत आहेत. काय मिळाले पण या आतंकवादाने याचे काहीच उत्तर सापडत नाही. रिंदाने आपल्यासाठी सुरक्षीत जागा पाकिस्तान समजली. 1980 पासून सुरू असलेल्या एका मोहिमेला रिंदाच्या गळ्यात उतरवून पाकिस्तानने त्याचा उपयोग करण्याचा प्रयत्न केला पण आजच्या परिस्थितीत 1980 च्या दशकात त्या चुकीच्या मोहिमेला सुरू करणाऱ्या मंडळीला सुध्दा याबद्दल इर्षा वाटली असेल आणि त्यातूनच रिंदाचा मृत्यू हा साधा आजारपणाचा मृत्यू नसून तो खून असेल? असे वाटते. आपल्या कानापेक्षा मोठा कोणी होवू नये अशी वृत्ती मानवी प्रवृत्तीत आहे आणि याच मानवी प्रवृत्तीतून रिंदासोबत त्याच्या आजाराचा फायदा घेवून कटरचला गेला असेल. पण या कटाचे कारण काय याचा शोध घेतला असता आमच्यापेक्षा याचे नाव मोठे झाले या शिवाय दुसरे कारण दिसत नाही. 1980 च्या कालखंडात सुध्दा आयएसआयच्या मदतीने पाकिस्तानमध्ये गेलेले अनेक आतंकवादी आज तेथे डंम्प झाले आहेत. त्यांना सुध्दा ही इर्षा बळावली असेल आणि या इर्षेतून त्यांनीच हा डाव केला असेल. कारण आजपर्यंत 1980 च्या कार्यक्रमासाठी त्यांचीच नावे घेतली जात होती. पण रिंदा पुढे आल्यानंतर त्यांची नावे मागे पडली आणि हे दु:ख त्यांना सहन झाले नसेल.
रिंदा पाकिस्तानमध्ये राणा या नावाने राहत होता. तो नेपाळमार्गे पाकिस्तानमध्ये गेला होता. याचे भरपुर पुरावे आहेत. आयएसआय नेपाळचा उपयोग तेथे खोटे कागदपत्र तयार करण्यासाठी नेहमीच करत आलेला आहे आणि त्यातूनच रिंदाचा मार्ग पाकिस्तानकडे वळला. आयएसआयने रिंदाने तयार केलेले आतंकवादाचे नवीन उदाहरण वापरण्याची इच्छा ठेवली आणि ते उदाहरण भारतातील युवकांसाठी घातक ठरले. त्यात नांदेडचे सुध्दा अनेक युवक भ्रमीत झाले. आंतरराष्ट्रीय दबाव, भारताचा दबाव हा सुध्दा रिंदाच्या मृत्यूचे कारण असू शकते. पाकिस्तान आंतरराष्ट्रीय दबाव आणि भारताचा दबाव सहन करण्याची ताकत कधीच गमावलेला आहे. त्यामुळे चुकीचे काम करण्याची मानसिकता असतांना सुध्दा पाकिस्तानची भिती पाकिस्तानला कधी-कधी अडचणीत आणते आणि त्यातूनच आयएसआयनेच रिंदाचा खात्मा केला नसेल काय? या प्रश्नाचे उत्तर शोधणे आता खुप अवघड आहे. कारण आयएसआय किंवा पाकिस्तान हे कधीच मान्य करणार नाही की रिंदा पाकिस्तानमध्ये मेला. पाकिस्तानने कसाब सुध्दा आमचा नव्हता असेच आंतरराष्ट्रीय स्तरावर सांगिेतले होते. पण अखेर उपलब्ध पुराव्याच्या आधारावर पाकिस्तान माघार घ्यावी लागली आणि अजमल कसाब त्यांचाच होता हे मान्य करावे लागले.
रिंदाच्या मृत्यूमुळे आता अनेक रहस्य रहस्य राहणार आहेत. नांदेड जिल्ह्यात सुध्दा जवळपास 20 गुन्हयांमध्ये रिंदा हा फरार आरोपीच्या सदरात दाखवण्यात आलेला आहे. त्याने नांदेडमध्ये अनेक युवकांचा वापर करून अनेक लोकांकडून कोट्यावधीच्या खंडण्या घेतल्या. काही खंडणी देणारे पुढे त्याचे हस्तक बनले त्यांच्या मार्फतीने प्रशासनाला त्रास आणत होता. काही जणांनी रिंदाच्या भितीने नांदेड सोडण्याची तयारी केली होती. मागील तीन वर्षामध्ये पोलीस विभागाने रिंदाच्या नावावर जिंदा असणाऱ्या अनेकांना तुरूंगाची वाट दाखवली. पण फक्त त्यांना तुरूंगात पाठवून रिंदा सपणार आहे काय? त्या युवकांच्या घरची आजची परिस्थितीय काय? , त्यांना कोण तुरूंगा बाहेर आणणार हे असे अनेक प्रश्न आता त्या युवकांच्या समोर उभे राहतील. पोलीसांच्या अभिलेखाप्रमाणे आपण असे मान्य करू की रिंदाच्या सांगण्यावरून अनेक युवकांनी खंडणी वसुली केली, अनेकांविरुध्द मकोका कायद्याअंतर्गत कार्यवाही झाली. त्याचे निर्णय येतील तेंव्हा येतील परंतू त्या युवकांचा आजचा कार्यकाळ, आजचा आनंदाचा क्षण तुरूंगात गेला याला काहीच पर्याय नाही आणि त्याची भरपाई कोणीच करू शकणार नाही.
रिंदाचा मृत्यू युवकांसाठी डोळे उघडणारी घटना नक्कीच आहे. त्याच्या सांगण्यामुळे त्यांनी काही दिवस भितीचे वातावरण तयार केले, त्यांच्यासोबत बोलायला लोकांना भिती वाटत होती. अनेक अवैध कारभार करणारी मंडळी सुध्दा रिंदाचे नाव घेवून आम्हाला त्याचे पाठबळ आहे असे म्हणत होती पण आता काय? एक रिंदा मरण पावला म्हणजे रिंदा प्रवृत्ती संपली काय? मुळात रिंदा प्रवृत्ती संपणे आवश्यक आहे. रिंदाचा ईतिहास पाहिला तर तो सुध्दा एक साधा युवक होता. पण जीवनात घडणाऱ्या काही घटनांनी त्याच्या हातात हत्यारे दिले आणि त्या हत्याराचा उपयोग त्याने देशाला वेठीस धरण्यासाठी केला. कोण दिली होती ती हत्यारे, काय दिली होती, त्यांनी रिंदाचा का उपयोग केला याचा शोध आता अवघड आहे. कारण रिंदाच राहिला नाही तर या रहस्यांना तो आपल्यासोबत रहस्य बनवूनच घेवून गेला. आजही अनेक समाज माध्यमांमध्ये हातात तलवार, हातात बंदुक घेवून वेगवेगळे चित्र प्रदर्शित होता. त्यातून त्या युवकांना आम्ही सुध्दा दादा, भाई आहोत हे दाखविण्याची ती इच्छा किती चुकीची आहे हे रिंदाच्या मृत्यूची घटना सांगते. अखेर बंदुक, गोळी आणि आतंकवाद याला युवकांनी आपल्या जीवनातून वगळण्याची गरज आहे. जगात सुधारणेचे अनेक मार्ग मोकळे आहेत आणि त्या मार्गांवर चालून युवकांनी प्रकाशाकडे वाटचाल करण्याची गरज आहे. रिंदाने शोधलेला मार्ग त्याला ओळख न देता मृत्यू देवून गेला अशी मृत्यू इतर कोणाला मिळू नये या विचाराचे प्रसारण जास्तीत जास्त व्हायला हवे तरच आपण, आपले गाव, आपले राज्य आणि आपला देश प्रगतीपथावर जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *