मरणारा अनोळखी मारणारा अज्ञात पण शोध लावला मयताचा आणि मारेकऱ्याचा स्थानिक गुन्हा शाखेने

नांदेड(प्रतिनिधी)-तेलंगणातील माणुस महाराष्ट्रात आणून त्याच्या खून करणाऱ्या अनोळखी मारेकऱ्याला पकडण्याची दमदार कामगिरी नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने केली आहे. या प्रकरणात मरणारा माणुस कोण आहे हे सुध्दा माहित नव्हते. पोलीसांच्या भाषेतील आव्हानात्मक तपास असे या प्रकरणाबद्दल म्हणता येईल.
दि.8 नोव्हेंबर रोजी बिलोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अनुसयानगरजवळच्या जंगलात एका व्यक्तीचा अर्धवट जळालेला मृत्यदेह सापडला. त्यामुळे खळबळ माजली होती. कारण त्याच्या आदल्या रात्री राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा देगलूर तालुक्यातून नांदेड जिल्ह्यात आली होती. मरणारा कोण आहे हे माहित नव्हते. मारणारा कोण आहे हेही माहित नव्हते असे आव्हानात्मक काम पोलीसांसमोर होते. पोलीसांनी या संदर्भाने अनेक सीसीटीव्ही फुटेज तपासले, ज्या दुचाकी गाडीवरून या दोन व्यक्तीचा माग लागत होता. त्या गाडीवर असलेला फक्त ए.पी.हे अक्षर दिसत होते. त्यामुळे गाडी तेलंगणा राज्यातील आहे असा अंदाज लावला गेला. बिलोली पोलीस ठाण्याच्या आसपास असलेल्या तेलंगणा राज्यातील सिमेजवळ असलेल्या पेालीसांशी संपर्क साधून याबद्दल कोणी हरवलेल्या व्यक्तीची नोंद आहे काय? याचाही शोध घेतला. परंतू यश नव्हते. स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात अनेक बाबींचे तांत्रिक विश्लेषण करून त्यांची जुळवा-जुळव केली आणि त्यातून तयार झाली एक पुराव्याची माळ. आपल्याकडील सर्व माहिती जमा करून तयार केलेली ती पुराव्यांची माह नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखा पोलीसांनी मिर्झापुर जि.कामारेड्डी (तेलंगणा) येथील महेंदर नारायणा बोब्बासानी (36) रा.झेंडागल्ली मिर्झापुर यास ताब्यात घेतले. त्याच्यासोबत पोलीसांनी केलेल्या मेहनतीनंतर त्याच्याकडून ही माहिती प्राप्त झाली की, त्याने गणेश व्यंकय्या चुंचू रा.नसरुल्लाबाद जि.कामारेड्‌डी यास महाराष्ट्रात आणून मारले होते. गणेश चुंचूचा खूर करण्याचे कारण मोठे अजब आहे. गणेश चुंचू आपली दुचाकी गाडी महेंदर बोब्बासानीला देत नव्हता याचा राग मनात धरुन महेंदर बोब्बासानीने त्याचा महाराष्ट्रात आणून खून केला आणि त्याच्या प्रेतावर रॉकेल टाकून अर्धवट जाळून टाकले.
मरणारा अनोळखी आणि मारणारा अज्ञात हा आव्हानात्मक प्रकार पोलीसांसमोर आला होता. यासंदर्भाने स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी खुप मेहनत घेतली. त्यांना अशा आव्हानात्मक गुन्ह्यांच्या तपासासाठी यापुर्वी सुध्दा अनेक बक्षीसे प्राप्त आहेत. पोलीस महासंचालक कार्यालयाने सुध्दा अशाच एका आव्हानात्मक गुन्ह्याच्या तपासासाठी त्यांचा सन्मान केलेला आहे. त्यांनी आपले सर्व कसब पणाला लावून तेलंगणा राज्यातील हा आरोपी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात आणि सहकाऱ्यांच्या मदतीने अखेर जेरबंद केला. पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, भोकरचे अपर पोलीस अधिक्षक खंडेराव धरणे यांनी द्वारकादास चिखलीकर, सहाय्यक पोलीस निरिक्षक पांडूरंग माने, पोलीस उपनिरिक्षक सचिन सोनवणे, गोविंदराव मुंडे, पोलीस अंमलदार गुंडेराव कर्ले, संजय केंद्रे, शंकर म्हैसनवाड, देवा चव्हाण, महेश बडगू, मोतीराम पवार, बजरंग बोडके, रवि बाबर, राजू सीटकर, दिपक ओढणे, अच्युत मोरे, हेमंत बिचकेवार, दादाराम श्रीरामे आदींचे कौतुक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *