नांदेड(प्रतिनिधी)- नांदेड जिल्ह्यात काही पोलीस अधिकाऱ्यांनी पोलीस निरीक्षक खाजगी कार्यालय लॉजमध्ये सुरू केले आहे. या लॉजमध्ये त्या कार्यालयाला सांभाळण्यासाठी पोलीस कार्यरत नाहीत, तर खाजगी व्यक्ती ते कार्यालय सांभाळतात, अशी एक खळबळजनक प्रक्रिया सुरू आहे.
पोलीस अधिकाऱ्यांना कधी-कधी कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन समाजाच्या भल्यासाठी काम करावे लागते. हे काम करत असताना पोलीस अधिकारी कायद्याची चौकट एवढी मोठी करतात की, ते काम चौकटीच्या बाहेर जाऊन केले आहे, असे दिसत नाही. या प्रकाराला समर्थन द्यावे लागते. वाटीतील तुप भाकरीत टाकताना घरची माय त्या भाकरीला चार खड्डे करते आणि खड्ड्यांमधून किती तुप भाकरीत गेले हे दिसत नाही. असाच हा प्रकार हा प्रकार आहे. लॉजमधील या खाजगी कार्यालयांमध्ये एफआयआर दाखल होत नाही, अर्ज चौकशी होत नाही, पण काही पोलीस मदत जरूर करतात. त्यांचा त्या कामात वाटा असतोच.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार खाजगी कार्यालयांमध्ये काही मंडळी संचिका घेऊन येतात. त्या खाजगी कार्यालयातील पोलीस निरीक्षकांचे खाजगी सेवक त्या संचिकेची तपासणी करतात. त्यानंतर ते खाजगी सेवक सर्व काही सादरीकरण पोलीस निरीक्षकाकडे करतात. त्यानंतर पोलीस निरीक्षक त्यावर निर्णय घेतात. त्या निर्णयात माईच्या भाकरीतील तुपाप्रमाणे तुप टाकले जाते आणि भाकरीचा आनंद कुटका कुटका सर्वांना मिळतो आणि भाकरीचा सर्वात जास्त भाग पोलीस निरीक्षकांकडे जातो.
या खाजगी कामांसाठी कोणता अर्ज करायचा नाही, कोणतीही फिस भरायची नाही आणि काम पण होते. किती छान प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या प्रक्रियेचे संशोधन करून त्या प्रक्रियेला आंमलात आणणाऱ्या व्यक्तीचा खऱ्या अर्थाने भारत सरकारने सन्मान केला पाहिजे. पण समस्या अशी आहे की, भारत सरकार, संविधान, भारतीय दंड संहिता, फौजदारी प्रक्रिया संहित यांच्या आधारावर चालते. पोलीस निरीक्षकाने या खाजगी कार्यालयात यापैंकी कोणत्या कायदेशीर बाबीचा अवलंब केला आहे, याचे संशोधन होण्याची गरज आहे.
पोलीस निरीक्षकाने लॉजमध्ये सुरू केले खाजगी कार्यालय