नांदेड(प्रतिनिधी)-औरंगाबाद जिल्ह्याच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात जांब गावी एक सापळा रचून 60 हजार रुपये रोख रक्कम लाच म्हणून घेणाऱ्या दोघांना पकडले. हा घटनाक्रम अत्यंत रहस्यमय राहिला. बहुदा तो लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नांदेडशी जोडलेला असल्यामुळे त्यातील रहस्य कायम ठेवण्यात आले. 20 नोव्हेंबर रोजी पकडलेल्या दोन जणांना आज दि.23 नोव्हेंबरपर्यंतची पोलीस कोठडी आहे.
मुखेड तालुक्यातील एका तक्रारदाराने औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली की, त्यांच्या भावाविरुध्द लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड यांच्याकडे एक अर्ज चौकशी आहे. त्यात ही अर्ज चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कोणत्या अधिकाऱ्याकडे आहे याचा खुलासा आज वृत्तलिहिपर्यंत झालेला नाही.
औरंगाबाद येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख पोलीस अधिक्षक राहुल गाडे, अपर पोलीस अधिक्षक विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधिक्षक गोरखनाथ गांगुर्डे, पोलीस निरिक्षक रेषमा सौदागर आणि त्यांच्या सहकारी पोलीस अंमलदारांनी जांब येथे दि.20 नोव्हेेंबर रोजी सापळा रचला. उदगीर गावातील सय्यद इस्माईल सय्यद अजीम, सय्यद शकील सय्यद अजीम या दोघांनी औरंगाबादकडे तक्रार देणाऱ्या तक्रारदाराला सांगितले की, लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नांदेडकडे असलेला चौकशीचा प्रकार आम्हाला 1 लाख रुपये लाच दिल्यानंतर आम्ही मिटवून टाकतो. या संदर्भाने लाच मागणीची पडताळणी झाली. त्यात तडजोडही झाली आणि तडजोडीनंतर 70 हजार रुपये लाचेवर हा अर्ज चौकशीचा प्रकार मिटविण्याची बाब निश्चित झाली. त्यातील 60 हजार रुपये तक्रारदाराने देतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागा औरंगाबाद यांनी सय्यद ईस्माईल आणि सय्यद शकीला जेरबंद केले. यासंदर्भाने मुखेड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 355/2022 दाखल करण्यात आला. मुखेड येथील विशेष न्यायालयाने सय्यद ईस्माईल आणि सय्यद शकीलला आज दि.23 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
या प्रकरणात रहस्य यासाठी ठेवण्यात आले असेल की, हा प्रकार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशीच जोडलेला आहे. तक्रारदाराच्या भावाविरुध्दची अर्ज चौकशी नांदेड जिल्ह्यातील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या कोणत्या अधिकाऱ्याकडे प्रलंबित होती याची माहिती मिळविण्यात यश आले नाही. पत्रकारांमध्ये मी सर्वात पहिला अशी स्पर्धा आहे. आज या दोन जणांची पोलीस कोठडी संपत आहे पण कोणत्याही पत्रकाराला याचा थांग पत्ता लागेला नाही.
