स्वप्नील नागेश्र्वरच्या सात मारेकऱ्यांना 9 दिवस पोलीस कोठडी

नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील गोदावरी काठी, उर्वशी मंदिराजवळ, डंकीन शेजारी, दर्गाह परिसराच्यासमोर एका महिलेची बेअब्रु करून तिच्या प्रियकराचा खून करणाऱ्या सात जणांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सोनाली बिरहारी-जगताप यांनी 9 दिवस अर्थात 3 डिसेंबर 2022 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
डंकीनजवळ खून करणाऱ्या शहबाज खान एजाज खान (24), मोहम्मद सद्दाम मोहम्मद साजीद कुरेशी(20), मोहम्मद उसामा मोहम्मद साजीद कुरेशी (20), शेख एयान शेख इमाम(20), सोहेल खान साहेब खान (19), सय्यद फरहान साहील सय्यद मुमताज (19) आणि उबेद खान युनूसखान पठाण (23) अशा सात मारेकऱ्यांना ज्यांनी स्वप्नील नागेश्र्वरचा खून केला. या मारेकऱ्यांनी स्वप्नीलला एवढे मारले की, त्याच्या नाकातून, त्याच्या कंबरेपासून रक्त निघत होते. आपल्याच गल्लीतील एका महिलेसोबत बोलत असतांना दहा अनोळखी पोरांनी बळजबरीने त्याला आणि त्या महिलेला ऍटो रिक्षात कोंबुन डंकीनजवळ आणले. त्याला लाथाबुक्यांनी, काठीने, लाठीने, रॉडने अनेक ठिकाणी मारहाण केली. ही हकीकत मरण्यापुर्वी स्वप्नील नागेश्र्वरने आपले वडील शेषराव नागेश्र्वरला सांगितली.
न्यायालयात सादरीकरण करतांना सरकारी वकील ऍड.उमाकांत वाडीकर आणि पोलीस उपअधिक्षक चंद्रसेन देशमुख यांनी सादरीकरण केले की, या आरोपींना कोणी माहिती सांगितली की, महिलेला घेवून स्वप्नील लॉजमध्ये गेला होता याची माहिती काढायची आहे. आरोपींनी तीन वेगवेगळ्या घटनास्थळांवर गुन्हे केले आहेत. त्याची ओळख पटवायची आहे. त्यांनी वापरलेल्या वाहनांची जप्ती करायची आहे. आरोपींचे फौजदारी प्रक्रिया संहितेतील कलम 165 प्रमाणे जबाब नोंदवून घ्यायचे आहेत. या अशा कारणांसह एकूण जोरदार सादरीकरण केले. युक्तीवाद ऐकून न्यायाधीश सोनाली बिरहारी-जगताप यांनी आदेश करतांना त्या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज होते, दहा पेक्षा जास्त लोक होते, सात आरोपी अटक आहेत, आरोपींचे मोबाईल जप्त करणे आहे या सर्व कारणांचा उहापोह करून स्वप्नील नागेश्र्वरच्या सात मारेकऱ्यांना 9 दिवस अर्थात 3 डिसेंबर 2022 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
आजच्या प्रकरणातील काही आरोपींबद्दल अशी ख्याती आहे की, त्यांनी यापुर्वी सुध्दा असे अनेक व्हिडीओ बनवले आहेत, आपल्याच समाजातील महिलांची बेअब्रु केली आहे आणि त्यानंतर त्या महिलांचा दुरुपयोग पण केला, सोबतच त्या महिलांच्या कुटूंबियांकडून लाखो रुपयांची खंडणी सुध्दा वसुल केलेली आहे. स्वप्नील नागेश्र्वरच्या मृत्यूनंतर हे गुन्हेगार एकत्रितपणे सापडले आहेत त्याबद्दल सविस्तर, सखोल तपास करून यापुर्वी झालेल्या घटनेंना सुध्दा पोलीस उपअधिक्षक चंद्रसेन देशमुख यांनी कायद्यापुढे आणावे आणि समाजाची यांची ठेकेदारी नेस्तनाबुत करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

पकडलेल्या सर्व आरोपींचे मोबाईल सी डी आर आणि एसडीआर तपासले तर त्यांनी स्वप्निल नागेश्वर चा खून केल्यानंतर कोणा कोणाशी संपर्क साधला ही माहिती पोलिसांनी मिळवली तर त्यातून नक्कीच अनेक पोलीस अंमलदारांची नावे पुढे येतील. आरोपींना सहकार्य करणाऱ्या पोलीस अंमलदारांवर योग्य कायदेशीर कार्यवाही व्हावी या अपेक्षेतूनच हे शब्द लिहिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *