नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्याच्या मुखेड तालुक्यातील जांब गावात 20 नोव्हेंबर रोजी दोन खाजगी इसमांना औरंगाबाद येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागातील अधिकारी आणि पोलीस अंमलदारांनी 60 हजार रुपयांची लाच घेतांना पकडले होते. ही लाच नांदेड लाच लुचपत प्रतिबंधक विभागात चौकशी सुरू असलेल्या एका प्रकरणासाठी होती.
काल दि.27 नोव्हेंबर रोजी नांदेड येथील येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागात कार्यरत एका महिला पोलीस निरिक्षकासह त्यांच्या पतीदेवांना सुध्दा त्या 60 हजार रुपये लाच प्रकरणात अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने पोलीस निरिक्षक पत्नी आणि त्यांच्या पतीला 30 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
एका तक्रारदाराने औरंगाबाद लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती की, त्यांच्या भावाबद्दल एक चौकशी नंादेडच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागात प्रलंबित आहे. त्यासाठी सय्यद ईस्माईल आणि सय्यद शकील हे दोन भाऊ रा.उदगीर हे एक लाख रुपयांची लाच मागत आहेत. त्यांचा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे प्रलंबित असलेली चौकशी समाप्त करण्यासाठी ही लाच होती. लाच 1 लाख रुपयांची मागणी झाली. तडजोड होवून लाच देण्याचा आकडा 70 हजार रुपये ठरला. त्यातील 60 हजार रुपये 20 नोव्हेंबर रोजी सय्यद शकील आणि सय्यद ईस्माईल या दोन्ही बंधूंनी जांब ता.मुखेड या गावात स्विकारली आणि औरंगाबाद येथील पोलीस उपअधिक्षक गोरखनाथ गांगुरडे आणि पोलीस निरिक्षक रेषमा सौदागर यांच्यासह त्यांच्या पथकाने दोघांना जेरबंद केले. या प्रकरणी मुखेड न्यायालयाने सय्यद ईस्माईल आणि सय्यद शकीलला 23 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले होते. त्यानंतर हा गुन्हा नंादेडच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे पुढील तपासासाठी वर्ग झाला. सध्या हा तपास पेालीस निरिक्षक वांद्रे यांच्याकडे आहे. या प्रकरणातील तपासाच्या प्रगतीनुसार काल दि.27 नोव्हेंबर रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्याच कार्यालयात कार्यरत महिला पोलीस निरिक्षक मिना बकाल आणि त्यांचे पतीदेव कुलभुषण बावस्कर या दोघांना अटक केली. न्यायालयाने या दोघांना 30 नोव्हेंबर 2022 अर्थात चार दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
जनतेला लाचेपासून संरक्षण मिळावे म्हणून शासनाने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची निर्मिती केली. त्या विभागाने अनेक लाच खोरांना गजाआड केले. त्यांच्या मेहनतीने लाचखोरांना न्यायालयात शिक्षा मिळाल्या. पण पोलीस निरिक्षक मिना बकाल आणि त्यांच्या पतीदेवांना लाच प्रकरणात अटक झाली. हे पाहिल्यानंतर रक्षकच भक्षक झाला तर या लोकशाहीची अवस्था काय होईल हा प्रश्न उपस्थित झाला. दुसऱ्या एका शब्दात कुंपनानेच शेत खाले असे म्हणावे लागेल. नांदेडच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागावर आलेला हा दुर्देवी प्रसंग नक्कीच चिंतेचा विषय आहे.
संबंधित बातमी…
https://vastavnewslive.com/2022/11/23/मुखेड-तालुक्यातील-जांब-ग/