नांदेड(प्रतिनिधी)-प्रेसनोट आली तर बातमी लिहिण्याची एक नवीन कला रुढ झाली आहे. खरे तर पत्रकारांनी आपल्या माहितीच्या आधारावर बातम्या लिहिणे आणि बातम्यांना न्याय देणे अपेक्षीत आहे. आम्हाला माहिती दिली नाही असा आरोप इतरांवर करण्यापेक्षा आपल्यामधील दम कोठे गेला याचा शोध पत्रकारांनी घ्यायला हवा. काल वास्तव न्युज लाईव्हने लिहिलेल्या एका बातमी संदर्भाने व्हाटसऍप संकेतस्थळावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची चौकशी व्हावी असे शेरे मारण्यात आले. पण लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने यास न घाबरता आपल्यावर होणारी शेरेबाजी ही आपला मार्ग बरोबर असल्याचे सांगते असे समजावे.
दि.22 नोव्हेंबर रोजी वास्तव न्युज लाईव्हने लाच लुचपत प्रतिबंधक विभाग औरंगाबाद यांनी नांदेड जिल्ह्यातील जांब गावात दोन लाचखोर पकडल्याची बातमी लिहिली. मुळात हा सापळा 20 तारखेला झाला होता. वास्तव न्युज लाईव्हलाच ही माहिती मिळवायला 48 तास लागले. त्यानंतर या प्रकरणात नांदेड लाच लुचपत प्रतिबंधक विभागातील महिला पोलीस निरिक्षक मिना बकाल आणि त्यांचे पतीदेव कुलभुषण बावस्कर यांना अटक झाल्याची बातमी काल दि.28 नोव्हेंबर रोजी लिहिली. यात सुध्दा वास्तव न्युज लाईव्हला 24 तासाचा उशीर लागलेला आहे.
ही बातमी वास्तव न्युज लाईव्हने नेहमीप्रमाणे व्हाटऍपसंकेतस्थळांवर प्रसिध्द केल्यानंतर पत्रकारांनी त्या बातमीवर आप-आपल्या बुध्यांकानुसार शेरे मारले. त्यामध्ये एक शेरा असा आहे की, 200 रुपयांची लाच घेतली भली मोठी प्रेसनोट, एक हजारांची लाच घेतली तर दोन पान प्रेसनोट, आपला तो बाब्या, दुसऱ्याचे ते …. एसीबीच्या काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चौकशी व्हायला हवी. हा शेरा अखील भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे सचिव श्रीमान विजयजी जोशी यांनी लिहिलेला आहे. या शेऱ्याला कांही जणांनी बरोबर, व्हायलाच पाहिजे असा प्रतिसाद दिलेला आहे.
पत्रकारीता करतांना जी बाब सत्ताधाऱ्यांना छापावीशी वाटत नाही ती छापनेच खरे पत्रकारीता आहे असे जॉर्ज ऑर्वेल या पत्रकारांनी सांगितलेले आहे. आपण जर प्रेसनोटच्याच माध्यमातून पत्रकारीता करणार असु तर हे ऑर्वेल यांचे शब्द कसे पुर्ण होतील ? ज्या विजय जोशीजींनी हा शेरा मारुन एसीबी अधिकाऱ्यांची वाणवा करण्याचा प्रयत्न केला.त्यांनी एकदा स्वत:ला हा प्रश्न विचारावा की, पत्रकारांविरुध्द दाखल झालेले गुन्हे, त्यांनी केलेले गैरकृत्य त्यांनी कधी छापले आहेत. मग त्या प्रसंगी विजय जोशीजींनी लिहिलेला आपला तो….हे वाक्य पत्रकारांसाठी सुध्दा तेवढेच महत्व ठेवते. मग आपण केले ते एसीबीने केले. आपल्या घरातील लेकरु कितीही घाणेरडे असेल तरी ते आपलेच लेकरू असते. एसीबी विभागापर्यंत श्री विजयजी जोशी यांचा शेरा पोहचला की नाही हे माहित नाही परंतू एसीबी अधिकाऱ्यांना दिलासा देणारे व्हाटसऍप स्टेटस आज 12 तासानंतरच विजय जोशी यांनी आपल्या व्हाटसऍपवर ठेवलेले आहे. त्यातील शब्द असे आहेत की, स्वामी विवेकानंदजी म्हणायचे ज्यांच्या जीवनात संघर्ष आहे, दररोज काही तरी अडचणी आहेत, दररोज कोणी तरी निंदक आहे, दररोज कोणाचा तरी विरोध आहे, त्यांनी समजाव आपला रस्ता योग्य आहे. पण ज्याच्या जीवनात विरोध नाही, निंदा नाही आणि संघर्ष नाही त्यांना लवकरच रस्ता बदलायला हवा आणि आपण चुकीच्या मार्गाने जात आहोत हे समजून घ्यायला हवे. आपल्याच शब्दांना चुकीचे ठरवणारा हे स्टेटस आहे. तेंव्हा एसीबीच्या अधिकाऱ्यांनी याबद्दल काही चिंता न करता त्यांच्यावर शासनाने दिलेल्या जबाबदारीला योग्यरितीने वहन करत त्यांनी आपल्याच कार्यालयातील लेकराला अटक केलेली आहे. त्यामुळे शेऱ्यांवर विचार न करता आपल्या कर्तव्यावर त्यांनी विचार करावा असे वास्तव न्युज लाईव्हला सांगायचे आहे.
विजय जोशीजी पत्रकारीता करता-करता दोन खंडीवर्ष आपल्याला लवकरच होणार आहेत. तेंव्हा प्रेसनोटपेक्षा माहिती कशी मिळते यावर आपले लक्ष केंद्रीत करून प्रेसनोटला महत्व देवू नका.कारण ज्यांनी प्रेसनोट दिली नाही ते सत्ताधीश आहेत. त्यांना कसे वाटेल की, आपल्याच अधिकाऱ्यांची बातमी प्रसारमाध्यमांमध्ये यावी असो यापुढे आम्ही अर्थात सर्व पत्रकार समाजाच्या भल्यासाठी आणि लपलेल्या बाबी सामाजिकरित्या खुल्या करण्यासाठी बांधील आहोत याचा विचार करावा अशी विनंती आहे. नाहीतर चपटी, मटनाची प्लेट आणि 500 रुपये घेवून पत्रकार बातम्या छापतात हे वाक्य आता जनतेत रुढ झाले आहे. या वाक्याला बदलण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे म्हणूनच वास्तव न्युज लाईव्हचा हा शब्द प्रपंच..
प्रेसनोटच्या भरवस्यावर बातम्या छापण्यापेक्षा बातम्या शोधत जा जोशी साहेब