संविधानातील समान न्यायाचे तत्व तळागाळापर्यंत पोहचावे- न्यायाधीश दलजित कौर

▪️जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे ग्रामपंचायत पातळीवर संविधानाचा जागर

नांदेड (प्रतिनिधी) – भारतीय राज्यघटनेने प्रत्येक घटकांच्या विकासासाठी व्यापक दृष्टिकोन बाळगला आहे. समान न्यायाचे तत्व हे त्यात सामावलेले आहे. जे विकासापासून वर्षोनुवर्षे दूर राहिले त्या घटकांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी कायद्याचे बळ योजनांना दिले आहे. याची व्याप्ती लक्षात घेता संविधान दिन व समता पर्वाच्या कालावधीत संविधानाप्रती अधिक जनजागृती करण्यावर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे भर देण्यात आल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव दलजित कौर यांनी दिली. ग्रामीण तंत्रनिकेतन महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

 

दिनांक 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. याचबरोबर 6 डिसेंबर 2022 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरीनिर्वाण दिन पर्यंतचा कालावधी हा सामाजिक समता पर्व म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने ग्रामीण तंत्रनिकेतन नांदेड येथे हा उपक्रम घेण्यात आला.

 

एक नागरिक म्हणून संविधानामुळे प्रत्येकाला अधिकार मिळालेले आहेत. त्या अधिकाराबाबत व नागरिक म्हणून असलेल्या कर्तव्याबाबत ग्रामपातळीपर्यंत जनजागृती व्हावी या उद्देशाने जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत विशेष उपक्रम राबविण्यात आले. यात प्रामुख्याने प्रथमच जिल्ह्यातील 11 ग्रामपंचायतींमध्ये विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने संविधानाचा जागर करण्यात आला.

 

संविधानाचा जागर ग्रामपातळीपर्यंत व्हावा, यासाठी जिल्ह्यातील प्रातिनिधिक स्वरूपात ग्रामपंचायतीची निवड करण्यात आली. यात लिंबगाव, सायाळ, वाडी (बु), नेरली, विष्णुपुरी, धनगरवाडी, वाजेगाव, आणेगाव, बळीरामपूर, बाभुळगाव, डोणगाव अशी 11 गावे निवडण्यात आली. या ग्रामपंचायतींमध्ये ॲड. नय्युमखान पठाण, ॲड. मंगेश वाघमारे, ॲड. वृषाली जोशी, ॲड. विजयमाला मनवर, ॲड. दत्ता कदम, ॲड. दिपाली डोनगावकर, ॲड. नविद पठाण यांनी त्या-त्या गावात जाऊन भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले. याचबरोबर प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये उद्देशिका ग्रामपंचायत कार्यालयात लावण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *