नांदेड, (प्रतिनिधी) – शहरातील टिळक नगर भागात एका व्यक्तीला सापडलेला दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल त्या व्यक्तीने पोलीस ठाणे विमानतळ येथे आणून दिल्यानंतर पोलिसांनी तो मोबाईल मालकाला परत केला आहे.
1 डिसेंबर रोजी सकाळी 7.30 वाजता सागर लाडके हे व्यक्ती टिळक नगर भागातून जात असताना त्यांना एक मोबाईल सापडला. त्यांनी तो मोबाईल पोलीस ठाणे विमानतळ येथे आणून दिला. विमानतळचे पोलीस निरीक्षक अनिरुद्ध काकडे यांनी मोबाईल मालकाचा शोध लावला तेव्हा हा मोबाईल प्राध्यापक जयंत चेरेकर यांचा असल्याची माहिती प्राप्त झाली. तेव्हा पोलीस निरीक्षक काकडे यांनी प्रा. जयंत चेरेकर यांना बोलावून सागर लाडके समक्ष चेरेकर यांचा मोबाईल त्यांना परत केला. प्रा. चेरेकर यांनी पोलीस आणि सागर लाडके यांचे धन्यवाद व्यक्त केले आहेत.