नांदेड(प्रतिनिधी)- मध्यरात्री जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन शेजारी असणाऱ्या गुंठेवारी विभागाला आग लागून बऱ्याच संचिका जळाल्या आहेत. 6 तासानंतर आजचा सुर्येदय होताच जिल्हा माहिती कार्यालयाने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्यावतीने या संदर्भाचा खुलासा काढला. त्यात गुंठेवारी विभागातील संचिका जळाल्या असल्या तरी अनेक विभागाकडून वेगवेगळ्या कागदांची जमाजमव झाल्यानंतर गुंठेवारी संचिका बनत असते. त्या सर्व विभागांकडून त्या संचिकांमध्ये असलेली कागदपत्रे जमा करून नवीन गुंठेवारी संचिका तयार होतील. इतर विभागांच्या संचिकांमध्ये आगीचा काही परिणाम झाला नाही असे खुलाशात म्हटले आहे.
मध्यरात्री 12 वाजता लागलेल्या या आगीला अग्नीशमन दलाच्या जवानांनी कांही तासातच अटोक्यात आणले. आग कशी लागली याबद्दल मात्र खुलाशात काही लिहिलेले नाही. सध्याच्या परिस्थितीत गुंठेवारी हा विषय ऐरणीवर आहे. त्या संचिका आणि त्यातून केलेले घोटाळे गाजत आहेत. काही दिवसांपुर्वीच गुंठेवारी संचिकांवर अधिकाऱ्यांच्या खोट्या स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या म्हणून वजिराबाद पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी काढलेल्या खुलाशात आग लावण्यासाठी कोणी दोषी असेल तर त्या विरुध्द अत्यंत काडक कायदेशीर पाऊले उचलली जातील असे खुलाशात सांगितले आहे. गुंठेवारी प्रकरणे किती प्रलंबित आहेत. त्यावर कोणत्या अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्यांनी ते गुंठेवारी प्रकरण तयार करण्यात आले ही सुध्दा महत्वपुर्ण बाब आहे. अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या कशा पध्दतीने बोगस करण्यात आल्या याचाही शोध आवश्यक आहे. गुंठेवारीच्या संचिका नवीन तयार होतील पण त्या स्वाक्षऱ्यांचे झालेले घोटाळे कसे शोधले जातील. पण खोट्या स्वाक्षऱ्या असलेली कागदपत्रे तर जळून गेली आहेत. आता त्या स्वाक्षऱ्या ज्या मुळ कार्यालयातून आल्या. त्यांच्या स्थळप्रती असतील काय? असतील तर आजपर्यंत त्या गायब झाल्या नसतील काय ? अशी अनेक प्रश्ने गुंठेवारी विभागाला लागलेल्या आगीमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहेत. शासकीय संचिका सुरक्षीत ठेवलेल्या कक्षांना आग लागण्याची ही पहिलीच घटना नाही. राज्यात, नांदेड जिल्ह्यात सुध्दा अशा अनेक आगीच्या घटना घडलेल्या आहेत. पण त्यातून काही एक निष्पन्न त्याही वेळेस झाले नाही. पण आताचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत या आगीच्या कारणांचा मुळ शोध घेतील अनेक गुन्हेगारांना गजाआड करण्यापासून वेळ लावणार नाहीत अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. भारतीय लोकशाहीचा केंद्रबिंदु हा सर्वसामान्य माणुस आहे. पण भारतीय कायद्यामध्ये एखाद्या व्यक्तीला या प्रकरणाशी तुमचा काय संबंध असा एक छोटासा प्रश्न विचारून त्याच्या तक्रारीचा निकाल लावाण्याची प्रथा पण आहे. आणि त्यातून अनेक गुन्हे आपोआप दाबले जातात. पाहु या प्रकरणात काय होईल?
जळालेल्या गुंठेवारी संचिका नवीन तयार होतील हो…पण त्या संचिकांमधील मुळ गुन्हेगार कोण शोधेल?