नांदेड(प्रतिनिधी)-दोन व्यक्ती आपसात भांडण करत असतांना ते भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या दोन नातलगांना मारहाण करून त्यांना जखमी केल्यानंतर जखमी पैकी एकाचा मृत्यू झाला. सन 2013 मध्ये घडलेल्या या प्रकरणाचा निकाल अत्यंत कठोर शब्दात देत अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.ई.बांगर यांनी 23 वर्ष 6 महिने आणि 1 लाख 15 हजार रुपये रोख दंडाची शिक्षा ठोठावत कायद्यातील प्रतिबंधात्मक निर्णय जाहीर केला आहे. या प्रकरणातील गुन्हेगार एकदा न्यायालयातून सुध्दा गुपचूप निघून गेला होता. या प्रकरणातील एका वैद्यकीय अधिकाऱ्याचा खून झाला होता. त्यामुळे या प्रकरणाची सिध्दता करतांना सरकार पक्षाला भरपूर मेहनत घ्यावी लागली.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, दि.13 ऑगस्ट 2013 रोजी शेख जावेद शेख कदीर यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली की, रात्री 10.50 वाजता राजू पाटील हा व्यक्ती माझ्या घरी आला आणि मला म्हणाला तुझ्या वडीलांना माळटेकडीजवळ चाकूने मारले आहे. मी तेथे गेलो असता गणेश कोंडला यांच्या घरासमोर वडील शेख खदीर शेख वहिद हे खाली पडले होते. त्यांच्या शरिरातून रक्त बाहेर येत होते. भांडणाचे कारण इतरांना विचारले असता मला माहिती सांगण्यात आली की, भिमराव अशोकराव पोहरे (27) रा.पिंपरी महिपाल ह.मु.माळटेकडी, म्हाळजा नांदेड यांचे आणि गणेश कोंडला आपसात भांडण होत होते. भांडणाचे कारण भिमराव पोहरेची विद्युत गणेश कोंडलाने बंद केली होती असे होते. त्यावेळी माझे वडील शेख खदीर शेख वहिद (55) हे भांडण करू नका म्हणून तेथे आले होते. या भांडणाच्यावेळी त्या ठिकाणी अली शाह उमर शाह हा 22 वर्षीय युवक पण होता. तो रा.मिलत्तनगर, देगलूर नाका नांदेड येथील आहे. त्या युवकाच्या छातीवर चाकुचे अनेक वार होते आणि त्यात त्याच्या शरिरातून अतिरक्तस्त्राव झाला होता म्हणून तो जागीच मरण पावला होता. भिमराव पोहरेनेच त्याला मारुन काटेरी झुडूपात फेकून दिले होते. विमानतळ पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा क्रमांक 763/2013 भारतीय दंड संहितेच्या कलम 302, 307, 201, 504 प्रमाणे दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहाय्यक पोलीस निरिक्षक संजय पिसे यांनी केला. आरोपी भिमराव अशोकराव पोहरे (27) यास अटक केली. संपूर्ण तपास करून त्याच्याविरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.
न्यायालयात हे प्रकरण सत्र खटला क्रमांक 230/2013 प्रमाणे चालले. आज या घटनेचा निकाल जवळपास 9 वर्षांनी आला. न्यायालयीन प्रकरणात एक मोठे ट्विस्ट आले. त्यात या प्रकरणातील मयत आणि जखमींना उपचार देणोर वैद्यकीय अधिकारी डॉ.एच.एस.धर्मकारे यांचा सरतपासणी झाल्यानंतर खून झाला होता. ते प्रकरण सुध्दा विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतच घडले होते. त्यानंतर डॉ.आशिष मोतेवार, डॉ.हरीष उम्रजकर यांनी या प्रकरणात सरकार पक्षाला मदत करून वैद्यकीय पुरावे न्यायालयासमक्ष आणले. या प्रकरणात एकूण 13 साक्षीदारांनी आपले जबाब नोंदवले. त्यात घटनेच्यावेळी जखमी झालेले शेख खदीर शेख वहिद यांचा जबाबही महत्वपुर्ण ठरला.
या प्रकरणात युक्तीवाद संपल्यानंतर न्यायालयाने आज 16 डिसेंबर 2022 रोजी या प्रकरणाचा निकाल दिला. त्यानुसार भिमराव पोहरेला भारतीय दंडसंहितेच्या कलम 304 भाग 2 प्रमाणे दहा वर्ष सक्तमजुरी आणि 50 हजार रुपये रोख दंड, कलम 307 प्रमाणे दहा वर्ष सक्त मजुरी आणि 50 हजार रुपये दंड, कलम 201 प्रमाणे 3 वर्ष सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये रोख दंड, कलम 504 प्रमाणे 6 महिने सक्तमजुरी आणि 5 हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली. या खटल्याच्या निर्णयात सर्वात महत्वपूर्ण घटनाक्रम म्हणजे अत्यंत कडक प्रतिबंधात्मक निर्णय घेत न्यायाधीश एस.ई.बांगर यांनी सर्व शिक्षा एकानंतर एक भोगायच्या आहेत असे लिहिले आहे. त्यानुसार ही सर्व शिक्षा मिळून 23 वर्ष 6 महिने अशी होते. रोख दंडाची एकूण रक्कम 1 लाख 15 हजार रुपये होते. या खटल्यामध्ये घेतलेला हा प्रतिबंधात्मक निर्णय नांदेड न्यायालयात जवळपास 20 वर्षानंतर पुन्हा एकदा पाहायला मिळाला. या खटल्यात सरकार पक्षाची बाजू मांडतांना ऍड. एम.ए.बत्तुल्ला, (डांगे) यांनी आपल्या जबाबदारीला पुर्णपणे न्याय देत आरोपीला शिक्षेपर्यंत नेण्यासाठी घेतलेली मेहनत प्रशंसनिय आहे. या खटल्यात विमानतळचे पोलीस निरिक्षक अनिरुध्द काकडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक मोहन राठोड आणि पोलीस अंमलदार रामदास सुर्यवंशी यांनी पैरवी अधिकाऱ्याची भुमिका सक्षमपणे वठवली.
न्यायालयात आलेल्या प्रकरणांचा निकाल देतांना न्यायाधीश दोन महत्वपूर्ण शब्दांना कायद्याच्या दृष्टीकोणातून विचारात घेतात. त्यातील एक शब्द प्रतिबंधात्मक आणि दुसरा सुधारणात्मक असा आहे. या प्रकरणात निर्णय घेतांना एस.ई.बांगर यांनी प्रतिबंधात्मक निर्णय घेतलेला आहे आणि आरोपी भिमराव पोहरेला दिलेल्या शिक्षा एकानंतर एक भोगाव्या लागतील असे लिहिले आहे.
मयत आणि जखमींना न्यायालयाने दिली मदत
दंडाची रक्कम वसुल झाल्यानंतर त्यातील 50 हजार रुपये मयत अली शाह उमर शाह यांच्या वारसदारांना देण्यात यावे. तसेच जखमी शेख कदीर शेख वहीद यांना 25 हजार रुपये देण्यात यावे असे या निकाल पत्रात लिहिले आहे. सोबतच या निकालाची एक पत्र जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांना पाठवून पिडीतांना फौजदारी प्रक्रिया संहितेतील कलम 365 प्रमाणे नुकसान भरपाई द्यावी असेही आदेश दिले आहेत.
प्रतिबंधात्मक निर्णय देत न्या.एस.ई.बांगर यांनी जीवघेणा हल्ला आणि मृत्यू प्रकरणात आरोपीला ठोठावली 23 वर्ष 6 महिने शिक्षा