पत्रकाराला मारहाण करणाऱ्या माजी जि.प.अध्यक्षांच्या सुपूत्रावर गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-अनुसूचित जातीच्या 65 वर्षीय पत्रकाराला जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण करणाऱ्या सुनिल एंबडवार विरुध्द बिलोली पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. सुनिल एंबडवार हे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबाराव एंबडवार यांचे सुपूत्र आहेत.
बडूर ता.बिलोली येथील भिमराव गंगाराम बडूरकर हे दैनिक पुण्यनगरी या वर्तमानपत्रात वार्ताहर म्हणून काम करतात. बडूरकर हे गेली 40 वर्षीय पत्रकारीता क्षेत्रात काम करीत आहेत. बिलोली शहरात सुरू असलेल्या विद्यानिकेतन मागासवर्गीय मुलांचे वस्तीगृह बंद असल्याबाबतची बातमी त्यांनी पुण्यनगरीमध्ये प्रकाशीत केली. त्यानंतर इतर वर्तमानपत्रांनी सुध्दा या बंद वस्तीगृहाची दखल घेतली. त्यानंतर जिल्ह्यातील प्रस्तापित राजकीय पुढारी बाबाराव एंबडवार यांचे सुपूत्र सुनिल एंबडवार यांनी मला भेटून मी लिहिलेल्या बातमी बदल दम दिला.मी जिल्हा परिषदेची सर्व यंत्रणा हाताळू शकतो तेंव्हा अशा बातम्यांनी काय होईल असे सांगितले. वस्तीगृहाचा कारभार योग्य चालावा म्हणून मी स्वत: याबद्दल तक्रार दिली. विभागीय व जिल्हा स्तरावर तक्रार केल्यानंतर 16 डिसेंबर रोजी रात्री 8 वाजता चौकशी समिती बिलोलीला आली. त्यावेळी मी व माझे इतर पत्रकार मित्र रत्नाकर जाधव, शिवराज रायलवाड, साईनाथ शिरोळे आणि संजय जाधव वस्तीगृहाच्या चौकशी समितीला भेटून वृत्त मिळविण्यासाठी तेथे गेलो असता सुनिल बाबाराव एंबडवारने मला जातीवाचक शब्द उल्लेखीत करून तु येथे का आलास असे सांगितले. मला लाथाबुक्यांनी मारहाण केली. माझ्या इतर पत्रकार मित्रांनी मला त्याच्या तावडीतून सोडून बाहेर आणले. तरी राजकीय वरदहस्त असलेल्या सुनिल बाबाराव एंबडवारविरुध्द पत्रकार संरक्षण कायदा आणि ऍट्रॉसिटी ऍक्टनुसार गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली. बिलोली पोलीसांनी याप्रकरणी भारतीय दंड संहिता कलम 323, 504, 506 आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम 3(1)(आर)(एस)3(1)(डब्ल्यू) प्रमाणे 243/2022 दाखल केला आहे. हा गुन्हा ऍट्रॉसिटी कायद्याचा असल्यामुळे तो तपासासाठी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यात आला आहे.वृत्तलिहिपर्यंत या प्रकरणातील आरोपी सुनिल बाबाराव एंबडवारला अटक झालेली नव्हती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *