नांदेड(प्रतिनिधी)-साखळी चोरण्याच्या प्रकरणांमध्ये शिवाजीनगर गुन्हे शोध पथकाने एक युवक अणि एक विधीसंघर्षग्रस्त बालक अशा दोन जणांना पकडून 83 ग्रॅम सोन्याचे दागिणे, चोरीच्या दुचाकी गाड्या, चोरीचे मोबाईल असा एकूण 7 लाख 70 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. याप्रकरणामुळे एकूण 4 गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यातील दोन गुन्हे शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील, एक गुन्हा नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आणि हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहेत.
दि.22 डिसेंबर रोजी शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरिक्षक रवि वाहुळे, पोलीस उपनिरिक्षक मिलिंद सोनकांबळे, पोलीस अंमलदार शेख इब्राहिम, दिलीप राठोड, रविशंकर बामणे, देविसिंग सिंगल, शेख अजहरोद्दीन, दत्ता वडजे, विष्णु डफडे आदींनी विष्णुनगर भागातील रोहन अंबादास गायकवाड(26) आणि त्याच्यासोबत एक विधीसंघर्षग्रस्त बालक यांना ताब्यात घेतले. या दोघांनी नांदेड शहरात अनेक ठिकाणी साखळी चोरल्याचे गुन्हे कबुल केले. सोबत त्यांनी अनेक दुचाकी गाड्या चोरल्या आहेत आणि मोबाईल सुध्दा चोरले आहेत. शिवाजीनगर पोलीस पथकाने त्यांच्याकडून माहिती घेत-घेत एकूण 83 ग्रॅम सोन्याचे दागिणे किंमत 3 लाख 82 हजार रुपये, चोरलेल्या पाच दुचाकी गाड्या किंमत 2 लाख 32 हजार रुपये आणि चोरलेले 8 मोबाईल किंमत 1 लाख 56 हजार रुपये असा एकूण 7 लाख 70 हजार रुपयांचा चोरीचा ऐवज जप्त करुन उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
या चोरट्यांना पकडल्यामुळे शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चैन स्नेचिंगचा तीन तोळे सोन्याच्या गुन्हा क्रमांक 396/2022, दुसरा नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक 564/2022 तसेच शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दुचाकी चोरीचा गुन्हा क्रमंाक 341/2022 आणि पोलीस ठाणे आखाडा बाळापूर जि.हिंगोली येथील दुचाकी चोरीचा एक गुन्हा असे गुन्हे उघडकीस आले आहेत.
पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, डॉ.खंडेराव धरणे, उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रसेन देशमुख आदींनी शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक डॉ.नितीन काशीकर यांच्यासह गुन्हे शोध पथकाचे या उत्कृष्ट कामगिरीसाठी कौतुक केले आहे.
शिवाजीनगरच्या गुन्हे शोध पथकाने चोरीचे 83 तोळे सोने, 6 दुचाकी आणि 8 मोबाईल पकडले