
नांदेड(प्रतिनिधी)-मराठवाड्यातील शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते 6 वेळा आमदारकी, आणि एक वेळेस खासदारकी असे पद जनतेने दिल्यानंतर त्यांनी गाजवलेली राजकीय कारकिर्द आज त्यांच्या वयाच्या 102 व्या वर्षी शांत झाली. बहाद्दरपुरा ता.कंधार येथील भाई केशवरावजी धोंडगे यांनी आज अखेरचा श्र्वास घेतला.
कंधार तालुक्यातील छोट्याशा बहाद्दरपुरा गावात जन्मलेले भाई केशवरावजी धोंडगे यांनी राज्यभरच नव्हे तर देशात सुध्दा कंधारचे नाव पोहचविले. खटारा या शेतकरी कामगार पक्षाच्या निवडुक चिन्हावर त्यांनी लोहा तालुक्यातून सलग सहा वेळा आमदारकीवर आपले नाव कोरले. त्यानंतर एकदा त्यांना नांदेडचे खासदार पद सुध्दा जनतेने दिले होते. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असेल, त्यापुर्वीची हैद्राबाद मुक्तीसंग्रामाची चळवळ असेल या दोन्ही लढ्यांमध्ये त्यांनी घेतलेली मेहनत त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा आलेख उंचावरणारी ठरली. जनतेने भाईंवर दाखवलेले प्रेम त्यांना गल्ली ते दिल्लीपर्यंत नेणारे ठरले. कंधार तालुक्यातील गुराखी गड येथे त्यांनी केलेले कार्य आजही गाजते. विधानसभा असेल की, लोकसभा त्यांनी सांगितलेले शब्द आणि जनतेच्या मांडलेल्या व्यथा त्या काळच्या देशपातळीवरील नेत्यांना सुध्दा राजकारण काय असते ही शिकवण दिली. जयक्रांती नावाचा साप्ताहिक वर्तमानपत्र सुरू करून लेखक, प्र्र.के.अत्रे यांच्याविरुध्द त्यांनी केलेले लिखाण आजही अनेकांच्या स्मरणार्थ आहे.
कंधार नेते मुक्तेश्र्वर धोंडगे आणि पुरूषोत्तम धोंडगे यांचे ते वडील आहेत. त्यांच्या कुटूंबियांनी दिलेल्या माहितीनुसार 2 जानेवारी रोजी सकाळी 8 ते 2 वाजेपर्यंत भाई केशवरावजी धोंडगे यांचे पार्थिव शिवाजी हायस्कुल पानभोसी रोड कंधार येथे ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांची अंतयात्रा शहरातील मुख्य रस्त्यांनी क्रांतीभवन बहाद्दरपुरा येथे पोहचेल आणि तेथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
लढ्याचं नेतृत्व
डॉ.केशवराव धोंडगे यांच्या नेतृत्वाखालील आणीबाणी विरोधी लढा लढला गेला. नाशिक सेंट्रल कारागृहामध्ये 14 महिनै कारावास भोगत स्वाभिमानी बाणा दाखवला.1985 साली गुराखीगड स्थापण करुन जागतिक गुराखी साहित्य संमेलन आणि जागतिक गुराखी लोकनाट्य संमेलन भरवून अनोखा विक्रम केला.रेकॉर्डब्रेक जवळपास हजारो सत्याग्रह विविध नाव देवून यशस्वी केले.त्यात पिंडदान सत्याग्रह, बोंबल्या सत्याग्रह, शेणचारऊ सत्याग्रह, खईस कुत्री सत्याग्रह ठळक आहेत.
स्वातंत्र्य सेनानी डॉ.भाई केशवरावजी धोंडगे यांच्या निधनाने राज्याची न भरून निघणारी हानी-खा. चिखलीकर
ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी, माजी खासदार, माजी आमदार भाई केशवरावजी धोंडगे यांच्या निधनामुळे महाराष्ट्रातील सामाजिक ,आर्थिक, राजकीय, शैक्षणिक आणि कामगार चळवळीची न भरून निघणारी हानी झाली आहे. भाई केशवरावजी धोंडगे यांनी लोहा -कंधार विधानसभा मतदारसंघाचे अनेक वेळा नेतृत्व केले तर संसदेत खासदार म्हणूनही त्यांनी आपली भूमिका बजावली होती. गोरगरीब, शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी शिक्षण संस्था उभारून मोठी शैक्षणिक चळवळ निर्माण केली होती. आयुष्यभर एकाच विचारसरणीशी बांधिल राहिलेल्या भाई केशवरावजी धोंडगे यांनी आपल्या जीवनातील तत्व कायम पणे जपली होती. शंभरी पार करणाऱ्या भाई डॉ. धोंडगे यांनी शेतकरी कामगार चळवळीचे नेतृत्वही मोठे हिमतीने आणि सक्षमपणे केले होते. नांदेड आणि मराठवाड्यातील कामगार चळवळीचा एक आक्रमक चेहरा म्हणूनही त्यांची महाराष्ट्रभर ओळख होती. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या शैक्षणिक आणि राजकीय चळवळीचे प्रचंड नुकसान झाले आहे.ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो अशा शब्दात खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आपला शोक व्यक्त केला आहे.
महाराष्ट्राच्या इतिहासाचा साक्षीदार हरपला!- अशोक चव्हाण
स्वातंत्र्यसेनानी व ज्येष्ठ नेते डॉ. भाई केशवराव धोंडगे यांचे निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकीय व सामाजिक इतिहासाचे साक्षीदार असलेले संघर्षमय, प्रेरणादायी नेतृत्व हरपल्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.
केशवराव धोंडगे यांच्या निधनानंतर त्यांना श्रद्धांजली अर्पण करताना चव्हाण म्हणाले की, भाईंचे संपूर्ण आयुष्य शेतकरी, कष्टकरी, गोरगरिबांसाठी समर्पित होते. गरजू, वंचित, शोषितांसाठी त्यांनी विधीमंडळापासून रस्त्यापर्यंत आक्रमक संघर्ष केला. ते एक अभ्यासू व निर्भीड लोकप्रतिनिधी होते. फर्ड्या वक्तृत्वाने त्यांनी विधानसभा व लोकसभा गाजवली. त्यांची भाषणे टोकदार, घणाघाती व जबरदस्त प्रहार करणारी असायची. वेळप्रसंगी देशाच्या पंतप्रधानांनाही खडे बोल सुनावणारे परखड व कणखर भाई खऱ्या अर्थाने मन्याड खोऱ्याचा वाघ होते.डॉ. भाई केशवराव धोंडगे एक सर्वसमावेशक, विचारधारेशी कटीबद्ध, तत्वनिष्ठ, पुरोगामी, परिवर्तनवादी नेते होते. मराठवाड्यासह राज्याच्या अनेक प्रश्नांवर त्यांनी तळमळीने काम केले. शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीच्या स्थापनेसाठी त्यांनी पुढाकार घेतला. कर्मकांड, अंधश्रद्धा मोडीत काढण्यासाठी त्यांनी पुस्तके व जयक्रांतीच्या माध्यमातून विपूल लिखाण केले. भाई केशवराव धोंडगे व डॉ. शंकरराव चव्हाण यांचा वैचारिक संघर्ष होता. पण वैयक्तिक पातळीवर त्यांचे संबंध अतिशय चांगले होते. चव्हाण व धोंडगे परिवाराचे आजही सलोख्याचे संबंध आहेत. त्यांच्या निधनामुळे वडीलधारी, मार्गदर्शक नेतृत्व गमावल्याची भावना जाणवते, असेही अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.
कामगार चळवळीचे विशाल पर्व संपले- नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी
समाजातील, तळागाळातील शेतकरी, शेतमजूर, कामगार, गोरगरीब व उपेक्षितांच्या न्याय हक्कासाठी भाई केशवरावजी धोंडगे यांनी शेवटपर्यंत संघर्ष केला. राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व देत त्यांनी गोरगरिब विद्यार्थ्यांना शैक्षणिक सोयी सुविधांसाठी व दर्जेदार शिक्षण मिळवून देण्यासाठी मोलाचे योगदान दिले. अनेक संकटातही ते कधीच डगमगले नाहीत. महाराष्ट्र उभारणीसाठी त्यांनी दिलेले योगदान चिरकाल स्मरणात राहील. अशा शब्दात लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सावकार सुर्यवंशी यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
मन्याडचा वाघ हरपला -हरिहरराव भोसीकर
ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी माजी खासदार भाई केशवराव धोंडगे यांनी आयुष्यभर वंचित, उपेक्षित लोकांना न्याय देण्यासाठी काम केले. नाही रे म्हणणाऱ्यांसाठी नेहमीच त्यांनी आग्रहाची भुमिका घेतली. सर्वसामान्यांसाठी ते नेहमीच अग्रेसर होते. लोकसभा व विधानसभा त्यांनी सक्षमपणे गाजवून अनेक प्रश्न सोडविले. त्यांच्या निधनाने सामाजिक व शैक्षणिक निर्माण झालेली पोकळी कधीही न भरून निघणारी आहे. त्यांच्या परिवारास या दुःखातून सावरण्याची ईश्वर शक्ती देवो हा मन्याडचा वाघ हरपला असा शोकसंदेश राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांनी व्यक्त केली.