नांदेड(प्रतिनिधी)-5 जानेवारी रोजी सकाळी 6.40 ते 6.50 अशा फक्त 10 मिनिटात कचरा टाकण्यासाठी गेलेल्या महिलेची सोन्याची चैन चोरणाऱ्या विधीसंघर्षग्रस्त बालकाला वजिराबादच्या गुन्हे शोध पथकाने 24 तासात पकडून त्याने बळजबरी चोरलेली 50 हजार रुपये किंमतीची सोन्याची पोत जप्त केली आहे.
विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत दि.5 जानेवारी जवाहरनगर येथे कचरा कुंडीत कचरा टाकण्यासाठी एक महिला जात असतांना ज्ञानश्री हॉस्टेलजवळ मोटारसायकलवर आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांच्या गळ्यातील 50 हजार रुपये किंमतीची सोन्याची पोत बळजबरीने हिसकावून पळून गेले. विमानतळ पोलीस ठाण्यात या घटनेनुसार गुन्हा क्रमांक 6/2023 दाखल करण्यात आला होता. त्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक एन.आर.आनलदास हे करीत आहेत.
नांदेडच्या वजिराबाद पोलीस ठाण्यातील पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांच्यासह सहाय्यक पोलीस निरिक्षक संजय निलपत्रेवार, गजानन किडे, शरदचंद्र चावरे, संतोष बेल्लूरोड, व्यंकट गंगुलवार, बालाजी कदम, रमेश सुर्यवंशी आणि शेख इमरान यांनी विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या चैन स्नेचिंग प्रकरणाचा अभ्यास करत होते. त्यामुळे त्यांच्या लक्षात आले की, चोरीचा अभिलेख असलेल्या विधीसंघर्षग्रस्त बालक आणि त्याच्या साथीदाराने हा प्रकार घडविला आहे. सध्या तो विधीसंघर्षग्रस्त बालक कोठे आहे याची माहिती काढली आणि त्याला ताब्यात घेवून त्याच्याकडून महिलेच्या गळ्यातून बळजबरी चोरलेले मंगळसुत्र 19 हजार 360 रुपयांच्या आणि एक चोरीची दुचाकी गाडी 40 हजार रुपये किंमतीची असा एकूण 59 हजार 360 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. वजिराबादच्या गुन्हे शोध पथकाने पकडलेल्या विधीसंघर्षग्रस्त बालकाविरुध्द विमानतळ पोलीस ठाण्यात आणि भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
पोलीस निरिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, डॉ.खंडेराय धरणे, उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रसेन देशमुख यांनी वजिराबाद गुन्हे शोध पथकाचे या चांगल्या कामगिरीसाठी कौतुक केले आहे.
महिलेची चैन चोरणारा विधीसंघर्षग्रस्त बालक वजिराबाद गुन्हे शोध पथकाने 24 तासात पकडला