बावरीनगर दाभड येथे अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेनिमित्त पोलीस अंमलदारांना अधिकार प्रदान

नांदेड, (प्रतिनिधी)- बावरीनगर दाभड येथे 6 ते 7 जानेवारी 2023 पर्यंत बौद्ध बांधवाच्यावतीने 36 व्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेस 3 ते 4 लाख बौद्ध भाविक व दलित बांधव मोठ्या प्रमाणात राज्य व परप्रांतातून येतात. येथे येणाऱ्या वाहनांची वर्दळ लक्षात घेता वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये तसेच या कालावधीत कार्यक्रम शांततेत पार पाडावेत व त्यात कसल्याही प्रकारची बाधा येऊ नये व जिल्ह्यात शांतता रहावी यासाठी पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1959 चे कलम 36 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारान्वये 6 ते 7 जानेवारी 2023 च्या मध्यरात्री पर्यंत नांदेड जिल्ह्यातील अर्धापुर येथील पोलीस स्टेशन स्वाधिन अधिकारी यांना मुंबई पोलीस अधिनियम कलम 36 मधील पोट कलम “अ” ते “ई” प्रमाणे पुढील अधिकार प्रदान केले आहेत.

 

प्रदान करण्यात आलेले अधिकार : रस्त्यावरील व रस्त्याने जाणाऱ्या मिरवणुकीतील किंवा जमावातील लोकांनी कशारितीने चालावे व कोणत्या रितीने वागावे याविषयी निर्देश देणे. अशा कोणत्याही मिरवणुका कोणत्या मार्गानी आणि कोणत्या वेळात काढाव्यात किंवा काढू नयेत असे मार्ग व अशा वेळा विहित करणे. सर्व मिरवणुकीच्या व जमावाच्या प्रसंगी व उपासना व प्रार्थनास्थळाच्या सर्व जागेच्या आसपास कोणताही रस्ता किंवा सार्वजनिक जागा येथे गर्दी होणार असेल किंवा अडथळा होण्याचा शक्यता असेल अशा सर्व प्रसंगी अडथळा न होऊ देणे. सर्व रस्त्यावर किंवा रस्त्यामध्ये, सर्व धक्क्यावर व धक्क्यामध्ये आणि सार्वजनिक स्नानाच्या तसेच कपडे धुण्याच्या व उतरण्याच्या जागेच्या ठिकाणी व जागेमध्ये, इतर सार्वजनिक स्थळी, लोकांच्या जाण्या-येण्याच्या जागेमध्ये इतर कर्कष वाद्य वाजविण्याचे नियम करण्याबाबत व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सूचना देण्यासंबंधी. तसेच कोणत्याही सार्वजनिक जागेत किंवा जागेजवळ किंवा कोणत्याही सार्वजनिक करमणुकीच्या ठिकाणी ध्वनिक्षेपनाचा उपयोग करण्याचे नियम करणे त्यावर नियंत्रण ठेवण्याबाबत. मुंबई पोलीस अधिनियम 1959 चे कलम 33, 35, 37 ते 40, 42, 43 व 45 या अन्वये दिलेल्या कोणत्याही आदेशास अधिन असलेले व त्यास पुष्ठी देणारे आदेश देण्याबाबत.

हा आदेश लागू असेपर्यंत सदरच्या पोलीस स्टेशनचे परिसरात जाहीर सभा, मोर्चे, निदर्शने, पदयात्रा इत्यादी कार्यक्रम संबंधीत पोलीस फौजदार किंवा त्यांच्या वरिष्ठांकडून तारीख व वेळ, सभेची जागा, मिरवणुकीचा, मोर्चाचा मार्ग व त्यात दिल्या जाणाऱ्या घोषणा, पुर्वपरवानगी शिवाय आयोजन करु नये. संबंधीत पोलीस अधिकारी यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करावे. सदर जाहीर सभा, मिरवणुका, पदयात्रा यात समायोजित घोषणा सोडून किंवा ज्या घोषणांनी शांतता व सुव्यवस्थेला बाधा होऊ शकते अशा घोषणा देऊ नये. हा आदेश लग्नाच्या ठिकाणी, प्रेत यात्रेस लागू नाही. या आदेशाचे उल्लंघन केल्यास मुंबई कायदा 1959 चे कलम 134 प्रमाणे अपराधास पात्र ठरेल, असेही आदेश पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी निर्गमीत केले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *