नांदेड(प्रतिनिधी)-आई-वडील पुण्याला नोकरी करतात आणि 12 वर्षीय मुलगी आपल्या आजीकडे लिंबगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहते. या बालिकेवर अत्याचार करणाऱ्या 22 वर्षीय युवकाला अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश विशेष पोक्सो न्यायालय नांदेड येथील न्यायाधीश रविंद्र पांडे यांनी 20 वर्ष सक्तमजुरी आणि 12 हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.
पोलीस ठाणे लिंबगावच्या हद्दीत राहणाऱ्या एका 12 वर्षीय बालिकेने 29 जानेवारी 2020 रोजी दिलेल्या तक्रारीनुसार सायकांळी 4 वाजेच्यासुमारास त्या बालिकेची आजी दळण तयार करण्यासाठी गिरणीवर गेली आणि त्यावेळी एक युवक ज्याचे नाव सुबोध गंगाधर मवाडे (22) वर्ष असे आहे तो आला. त्याने त्या बालिकेला हात धरुन घरात ओडले, बालिका ओरडत होती तर तिचे तोंड दाबले आणि काय-काय केले हे सर्व तक्रारीत लिहिले आहे. मला मारेल या भितीने मी गप्प बसले. पुढे माझी आजी येईल म्हणून सुबोध मवाडे पळून गेला. मी घडलेला प्रकार आपल्या एका बहिणीला सांगितला. बहिणीने ते प्रकार आजीला सांगितला आणि आजीने तिच्या मुलाला सांगितला आणि त्यानंतर आम्ही पोलीस ठाणे लिंबगाव येथे तक्रार दिली. त्या तक्रारीवर तत्कालीन पोलीस निरिक्षक आर.जी.बोरसे, महिला पोलीस अंमलदार,बालिका आणि बालिकेची आजी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. लिंबगाव पोलीसंानी याप्रकरणी गुन्हा क्रमांक 18/2020 भारतीय दंड संहितेच्या कलम 376(3), 4(2), 5(एन) आणि 6 तसेच 8 बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 नुसार दाखल केला.
या प्रकरणाचा तपास पोलीस निरिक्षक आर.जी.बोरसे यांनी केला. त्यात त्यांनी 1 फेबु्रवारी बालिकेवर अत्याचार करणारा युवक सुबोध गंगाधर मवाडे यास अटक केली. त्याच्याविरुध्द सखोल तपासाअंती न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. न्यायालयात हा खटला विशेष पोक्सो खटला क्रमांक 42/2020 प्रमाणे चालला. या खटल्यात 10 साक्षीदारांनी आपले जबाब न्यायालयासमक्ष नोंदवले. सरकारी वकील ऍड.एम.ए.बत्तुल्ला (डांगे) यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य मानुन न्या.रविंद्र पांडे यांनी सुबोध मवाडेला पोक्सो कायदातील कलम 4(2) प्रमाणे 20 वर्ष सक्तमजुरी आणि 5 हजार रुपये रोख दंड तसेच कलम 6(1) प्रमाणे 20 वर्ष सक्तमजुरी आणि 5 हजार रुपये रोख दंड, कलम 7 प्रमाणे 3 वर्ष सक्तमजुरी आणि 2 हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली. दंडाची एकूण रक्कम 12 हजार रुपये झाली आहे. कलम 376 (3) प्रमाणे वेगळी शिक्षा देण्यात आली नाही. दिलेल्या सर्व शिक्षा आरोपीला एकत्रीत भोगायच्या आहेत. खटल्यात दंड जमा झाल्यानंतर ही दंडाची रक्कम पिडीत 12 वर्षीय बालिकेला देण्याचे आदेश न्यायाधीश रविंद्र पांडे यांनी दिले आहेत. या खटल्यात लिंबगावचे सहाय्यक पोलीस निरिक्षक चंद्रकांत पवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस अंमलदार निवृत्ती रामबैनवाड आणि सविता जाधव यांनी पैरवी अधिकाऱ्याची भुमिका पुर्ण केली.
12 वर्षीय बालिकेवर अत्याचार करणाऱ्या 22 वर्षीय युवकाला 20 वर्ष सक्तमजुरी