नांदेड(प्रतिनिधी)-मध्यरात्री रेल्वेमध्ये तीन जणांनी दरोडा टाकून पैसे लुटणाऱ्या तीन जणांना रेल्वेचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए.ए.मोताळे यांनी दीड वर्षाची सक्तमजुरी आणि प्रत्येकास दोन हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.
दि.15 एप्रिल 2021 रोजी कुणाल दिलीप चव्हाण हे अजिंठा एक्सप्रेस या गाडीने सिकींद्राबाद ते रोटेगाव असा प्रवास करत होते. एस.-13 या डब्यात त्यांची 68 क्रमांकाची शायीका होती. मध्यरात्री 12.20 वाजता ही गाडी नांदेड रेल्वे स्थानकावर आली. त्यावेळी काही जण आले आणि कुणाल चव्हाणला धमकावून चाकुचा धाक दाखवून लुट केली. सोबतच इतर प्रवाशांमधील एम.ब्रम्हय्या यांना सुध्दा चाकुचा धाक दाखवून त्यांचीही लुट केली. त्यावेळी प्रवाशांना मार सुध्दा लागला.
या बाबत नांदेडच्या रेल्वे पोलीसांनी गुन्हा क्रमांक 85/2021 भारतीय दंड संहितेच्या कलम 394 आणि 34 नुसार दाखल केला. पोलीसांनी या प्रकरणात जखमी झालेल्या आणि लुट झालेल्या प्रवाशांना अभिलेखावरील गुन्हेगारांचे फोटो दाखवले. त्यातील शेख उस्मान उर्फ गोरु शेख अलीम, शेख इमरान उर्फ अदु शेख रशिद आणि शुभम उर्फ शिवा जालींदर दवणे या तिघांना लुट झालेल्या आणि जखमी असलेल्या प्रवाशांनी ओळखले. त्यानंतर या गुन्ह्याचे तपासीक अंमलदार पोलीस निरिक्षक सुरेश उनवणे यांनी या तिघांना अटक केली. लुटलेल्या पैशांमधील काही पैसे रेल्वे पोलीसांनी जप्त केले. या प्रकरणी रेल्वे न्यायालय औरंगाबाद येथे खटला क्रमांक आरसीसी 111/2021 चालला. त्यात 9 साक्षीदारांनी आपले जबाब नोंदवले. हे आरोपी पकडले गेल्यानंतर 8 जुलै 2021 ते 23 डिसेंबर 2022 पर्यंत तुरूंगात होते. उपलब्ध पुराव्या आधारावर न्यायाधीश ए.ए.मोताळे यांनी शेख उस्मान उर्फ गोरु शेख अलीम(20), शेख इमरान उर्फ अदु शेख रशिद(20) आणि शुभम उर्फ शिवा जालींदर दवणे (22)या तिघांना दीड वर्ष सक्तमजुरी आणि प्रत्येकी 2 हजार रुपये दंड ठोठावला आहे. या खटल्यात सरकार पक्षाच्यावतीने ऍड.ए.व्ही.घुगे यांनी काम पाहिले. या प्रकरणात रेल्वे पोलीसांच्यावतीने पोलीस अंमलदार रमेश राठोड यांनी पैरवी अधिकाऱ्याची भुमिका पुर्ण केली.
रेल्वेत दरोडा टाकणाऱ्या तीन युवकांना सक्तमजुरी