नांदेड -राज्याच्या सर्व भागापेक्षा पश्चिम महाराष्ट्र हा सर्वात विकसित विभाग असून त्या तुलनेत मराठवाडा विदर्भ हे खूप मागे आहेत याबाबत अनेक वेळा चर्चा झाल्या चिंतन मनन झालं प्रत्येकाने मराठवाड्याच्या मागासलेपणाची वेगवेगळी कारणे दिली परंतु वर्षानुवर्ष सत्तेत राहणाऱ्यांनीही याची नैतिक जबाबदारी स्वीकारली नाही. नुकतंच एका शेती कार्य शाळेच्या निमित्ताने पुणे येथे गेलो असता बारामती कृषी विज्ञान केंद्राला जाण्याचा योग आला त्या वेळचा हा प्रसंग जाणीवपूर्वक नमूद करावासा म्हणून…….
आम्ही 30-35 शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी बारामती कृषी विज्ञान केंद्र ला भेट देण्यासाठी गेलो असता माझे शेतकरी चळवळीतील जुने सहकारी तथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माळेगाव कारखान्याचे विद्यमान संचालक राजेंद्र ढवण पाटील यांना नमस्कार करण्यासाठी मी फोन केला. एफ आर पी च्या न्यायालयीन लढाई प्रसंगी राजेंद्र ढवाण पाटील यांची मला खूप मदत झाली होती. मी बारामतीला आलो हे कळल्याने त्यांनी मला व सहकार्यांना माळेगाव कारखान्यावर चहासाठी निमंत्रण दिले. परंतु वेळ नसल्याने आम्ही ते टाळत होतो हे लक्षात आल्यावर माळेगाव कारखान्याचे व्हाईस चेअरमन सागर जाधव संचालक राजेंद्र ढवण पाटील हे गाडी घेऊन आले व सर्वांना म्हणाले ऊस दर नियंत्रण मंडळाचे माजी सदस्य ज्यांनी एफ आर पी ची कायदेशीर लढाई लढून राज्यातील साखर कारखानदारांना सळो की पळो करून सोडले (आम्हाला नाही कारण नेहमी frp पेक्षा जास्त भाव देतो ) शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचे दाम मिळवून दिले अशा आमच्या मित्राचा व आपल्या सर्वांचा सत्कार करण्याची संधी द्या अशी आग्रही विनंती करून त्यांनी आम्हा सर्वांना माळेगाव कारखान्यावर नेले.
माळेगाव सहकारी साखर कारखाना म्हणजे महाराष्ट्रातील पहिल्या पाच कारखान्यापैकी एक देशाचे माजी केंद्रीय मंत्री तथा ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब यांच्या निवासस्थानापासून अवघ्या 2-3 किलोमीटर अंतरावर असणारा हा कारखाना. अनेक वर्षापासून अजित दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली लोकशाही पद्धतीने चालणारा हा सहकारी साखर कारखाना मागच्या निवडणुकीत येथील सभासदांनी अजित दादा यांच्या पॅनल चा पराभव केला होता म्हणून यंदाच्या निवडणुकीत स्वाभिमानीचे नेते राजेंद्र ढवान पाटील यांनाही बिनविरोध संचालक म्हणून घेतले व ही निवडणूक बिनविरोध केली. कारखान्यावर माझा व माझ्या सर्व सहकाऱ्यांचा मानसन्मान सत्कार झाला यावेळी व्हाईस चेअरमन सागर जाधव माजी चेअरमन बन्सीलाल आटोळे, संचालक संजय नाना काटे, ऍड रमेश जाधव, फाळके तात्या यांनी सर्वांचे स्वागत केले. कारखान्याची माहिती देताना कार्यकारी संचालक श्री राजेंद्र जगताप म्हणाले गतवर्षी माळेगाव कारखान्याने गतवर्षी 15 लाखापेक्षा जास्त मॅट्रिक टन उसाचे गाळप केले 3250 चा अंतिम दर दिला. यावर्षी कारखान्याने पहिली उचल 2850 दिली. तरीही आमचे संचालक यावर समाधानी नाहीत शेतकरी नेते कारखान्याचे संचालक राजेंद्र ढवण पाटील हे आणखी शंभर रुपये तरी द्या म्हणून आग्रही आहेत व एवढ्यावरच न थांबता लेखी पत्र दिले आहे. आमच्या कारखान्यावर पूर्णपणे लोकशाही आहे प्रत्येक सभासदाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे त्यांच्या मताचा विचार केला जातो कारखान्याने आतापर्यंत अनेक लोकोपयोगी उपक्रम राबवले कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जातात. को जनरेशन,इथेनॉल,खत निर्मिती यासह उत्पादनेही घेतले जातात. ऊस उत्पादकांच्या हातात कारखान्याचे हित आहे, शेतकऱ्यांनी ऊस लावला तर कारखाना चालेल म्हणून ऊस उत्पादक केंद्रस्थानी ठेवून जास्तीत जास्त दर देण्याची संचालक मंडळाची भूमिका असते. संचालक असो की सभासद सर्वांना समान न्याय दिला जातो ऊस तोडणी प्रोग्राम देखील अत्यंत पारदर्शक राबवला जातो.
याउलट आपल्या भागातील कारखान्यावरील संचालक मंडळ किंवा त्यांचे हितचिंतक हे सातत्याने शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचेच काम करतात कुणाला कारखान्यावर बिनविरोध संचालक म्हणून घेतलं तर त्याच्या काही पिढ्या त्या साहेबाच्या उपकारात राहुनं शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचे काम करतात व कारखाना जो काही दर देईल तो कसा योग्य आहे हेच सांगत राहतात. ऊस उत्पादकांच्या हितापेक्षा ते कारखान्याच्या हिताला जास्त महत्त्व देतात ऊस उत्पादकाला केंद्रस्थानी ठेवून धोरणे आखली जात नाहीत त्यामुळे सगळा घोळ होतो.
पश्चिम महाराष्ट्रातील नेतृत्व हे राजकीय भूमिकेपेक्षा गुणवत्तेला क्वालिटीला महत्त्व देतात त्यांच्याकडे माणसांची पारख आहे सहकारात ते फारस राजकारण करत नाहीत त्या भागातील कोणत्याही संस्थेच्या संचालकांना व त्यांच्या भूमिकेला ही महत्व दिले जाते. विरोधकांच्याही चांगल्या गुणाचं चांगल्या कामाचं ते कौतुक करतात.आपल्या इकडे मराठवाडा विदर्भात मात्र परिस्थिती काही उलटी आहे म्हणून आपण सहकार क्षेत्रासह विकासाच्या बाबतीत पिछाडीवर आहोत माझ्यासारख्या कारखान्यांच्या विरोधी विचारांच्या व्यक्तिमत्वास इतक्या आदराने कोणी चहा देखील पाजण्याची मानसिकता ठेवत नाहीत म्हणून आता आपल्यालाही आपली मानसिकता बदलण्याची खरी गरज आहे.
मानसिकता बदलायची कोणाची ?
मराठवाड्याच्या मागासलेपणाला कारणीभूत आपली नकारात्मक मानसिकता आहे दोष कुण्या एकाचा नसून तो आपल्या सर्वांचा आहे त्यामुळे चांगल्या बदलाची सुरुवात कोणीतरी करावी जेणेकरून लोक त्याचं अनुकरण करतील याबाबत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपल्या ग्रामगीतेत म्हटलं की गावच्या पुढाऱ्यांनी चांगलं राहणं,चांगलं वागण जास्त महत्त्वाचं आहे कारण सामान्य जनता पुढाऱ्यांचं मोठ्या लोकांचं अनुकरण करते म्हणून पश्चिम महाराष्ट्राच्या सकारात्मक विकासाचे अनुकरण करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकण्यास हरकत नाही