नांदेड(प्रतिनिधी)-दरोडेखोरांनी देगलूर शहरातील एका घरात 23 जानेवारीच्या मध्यरात्री दरोडा टाकून 3 लाख 89 हजारांचा ऐवज लुटून नेला आणि त्या घरातील 60 वर्षीय महिलेचा खून पण केला. दरोडेखोर तीन होते अशी माहिती सीसीटीव्ही फुटेजवरून समोर येत आहे.
श्रीपतराव रामजी पाटील (90) वर्ष यांचे घर लालबहादुर शास्त्री नगर देगलूर येथे आहे. ते मुळ राहणार येडूर ता.देगलूर येथील आहेत. या प्रकरणाचे तक्रारदार श्रीपतराव पाटील हे आपल्या तिसऱ्या पत्नीसोबत अर्थात चंद्रकला श्रीपतराव पाटील (60) यांच्यासोबत राहतात. श्रीपतराव पाटील यांच्या पहिलीपासून एक मुलगी आणि दुसऱ्या पत्नीपासून 5 मुले आहेत. तिसरी पत्नी चंद्रकलाबाई हिला मुलबाळ झाले नाही पण त्यांच्या पहिल्या नवऱ्यापासून मिळालेली भरपूर संपत्ती आहे.
दि.23 जानेवारी रोजी श्रीपतराव पाटील आणि चंद्रकलाबाई रात्री 9 वाजता आपल्या घराचे मुख्य गेट बंद करून कुलूप लावून घरातच होते. चंद्रकलाबाई यांना टी.व्ही. पाहता-पाहता झोप लागली. श्रीपतराव पाटील त्यांच्या अगोदरच झोपले होते. रात्री 11.30 वाजेच्यासुमारास आपल्या गालावर काही वजन आहे. हे लक्षात आल्याने श्रीपतरावांना जाग आली. तेंव्हा एक व्यक्तीच्या गालावर पाय ठेवून उभा होता. दुसऱ्याने त्यांचे पाय लुंगीने बांधून टाकले. चंद्रकलाबाईजवळ झटापट्टीचा आवाज येत होता. पाहिले असता त्यांना त्यांच्या डोक्यावरही पाय ठेवलेला दिसला. आम्हाला मारु नका काय पाहिजे ते घेवून जा असे श्रीपत पाटील यांनी सांगितले. दरम्यान चंद्रकलाबाईच्या तोंडाला दरोडेखोरांनी रुमाल बांधलेला होता. चंद्रकलाबाई यांच्या गळ्यात असलेले 15 ग्रॅम वजनाची सोन्याची बोरमाळ, हातातील 50 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या पाटल्या व चांदीचे 70 तोळे वजनाचे वाळे असे चोरट्यांनी बळजबरीने काढून घेतले होते. दरोडेखोरांनी एकूण साडेबारा तोळे वजनाचे सोन्याचे दागिणे, किंमत 3 लाख 75 हजार रुपयांचे तसेच 70 तोळे वजनाचे चांदीचे वाळे ज्यांची किंमत 14 हजार रुपये आहे असा एकूण 3 लाख 89 हजार रुपयांचा ऐवज बळजबरीने चोरून नेला.
दरोडेखोर घरातून लुट करून पळून गेल्यानंतर श्रीपतराव पाटील यांनी आजूबाजूच्या लोकांना बोलावले. चंद्रकलाबाईला दवाखान्यात नेले असता ती पुर्वीच मरण पावली आहे हे कळले. स्वामी या व्यक्तीने घडलेला प्रकार दुरध्वनीवरून पोलीसांना सांगितला. देगलूर पोलीसांनी या संदर्भाने भारतीय दंड संहितेच्या कलम 302, 397, 354 नुसार गुन्हा क्रमांक 39/2023 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास देगलूरचे पोलीस निरिक्षक मोहन माछरे यांच्याकडे देण्यात आला आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार सीसीटीव्ही दिसणारे दरोडेखोर 20 ते 30 वयोगटातील तीन युवक आहेत. त्यांच्या शोधासाठी देगलूर पोलीसांनी विविध पथके वेगवेगळ्या ठिकाणी पाठवली आहेत.
60 वर्षीय महिलेचा खून करून 3 लाख 90 हजारांचा ऐवज लुटला ;देगलूरमध्ये मध्यरात्री घडलेली घटना