73 वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
नांदेड(प्रतिनिधी)-73 व्या भारतीय प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी जनतेला शुभकामना देत भारतीय प्रजासत्ताकाने सर्वसामान्य माणसाला दिलेले अधिकार हे जगातील सर्वोच्च अधिकार आहेत असे सांगितले. या अधिकारांचा वापर करा आणि भारतीय प्रजासत्ताकाला जास्तीत जास्त समृध्द कसे करता येईल यासाठी प्रयत्न करा असे आवाहन केले.
आज 73 व्या भारतीय प्रजासत्ताक दिनी पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले. याप्रसंगी व्यासपीठावर पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांची उपस्थिती होती. ध्वजारोहणानंतर परेड कमांडर देगलूरचे पोलीस उपअधिक्षक सचिन सांगळे यांनी सांगितले की, आजच्या परेडमध्ये 16 अधिकारी आणि 488 जवान सहभागी आहेत. त्यानंतर जिल्हाधिकारी राऊत यांनी परेडचे निरिक्षण केले. यामध्ये केंद्रीय राखीव पोलीस बल मुदखेड, जलद प्रतिसाद पथक नांदेड, महिला पोलीस अंमलदार, पुरूष पोलीस अंमलदार, गृहरक्षक दलाचे महिला व पुरूष जवान, एनसीसीचे विद्यार्थी, सगरोळी शाळेचे विद्यार्थी, बॉम्ब शोधक व नाशक पथक, श्वान पथक आदींनी मंचासमोरून जात तिरंग्याला अभिवादन केले.
आज पोलीस अंमलदारांना देण्यासाठी आलेल्या 20 नवीन गाड्यांना हिरवी झेंडी दाखवून जिल्हाधिकारी व मान्यवरांनी रवाना केले. वडेपुरी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी सायबर क्राईमवर उपस्थितांसमोर पटनाथ्य केले. सैनिकी शाळा सगरोळीच्या विद्यार्थ्यांनी विविध कवायती करून उपस्थितांची मने जिंकली.
सशस्त्र सैन्य दलातील समादेशक देगलूर सुधाकर राजेंद्र शिंदे यांनी अतिरेक्यांसोबत झालेल्या चकमकीत आपले बलीदान दिले होते.



जिल्हाधिकाऱ्यांनी सुधाकर शिंदे यांच्या पत्नी सुधा शिंदे यांचा महाराष्ट्र शासनाच्यावतीने सन्मान करतांना सांगितले की, आपल्या पतीने दिलेले बलिदान देश लक्षात ठेवील. याप्रसंगी सैन्य दलात काम करणारे सैनिक दत्ता मारोती पोतगले यांना आपातकालीन परिस्थितीत काम करतांना आलेले अपंगत्व इतरांना प्रेरणा देईल असे सांगत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी त्यांचाही महाराष्ट्र शासनाच्यावतीने सन्मान केला. नांदेड जिल्ह्यातील अनेक तपास करतांना उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांनाही सन्मानित करण्यात आले.याप्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयातील सेवक फेरोज खान यांच्या उत्कृष्ट सेवेसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचा सन्मान केला.


शिष्यवृत्ती परिक्षांमध्ये दैदिप्यमान काम गिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचाही सन्मान करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित असणाऱ्या ज्येष्ठ नागरीकांना भेटून जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या शुभकामना दिल्या. या कार्यक्रमात खा.प्रतापराव पाटील चिखलीकर, आ.बालाजी कल्याणकर, मनपा आयुक्त सुनिल लहाने यांच्यासह अनेक नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य उपस्थित होते.

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या सन्मानार्थ नागरीकांनी आप-आपल्या घरांच्या आणि प्रतिष्ठानांच्या गच्चीवर तिरंगा ध्वज फडकावला होता. अनेक शाळांनी प्रभातफेरी काढली होती. काही विद्यार्थ्यांनी वजिराबाद चौकात आपल्या हातात वाहन चालवतांना काय दक्षता घ्याव्यात याचे बॅनर घेवून जागृती करण्याचे काम केले.




