नांदेड(प्रतिनिधी)-कै.डॉ.शंकरराव चव्हाण जलसागरातून अर्थात देवाधीदेव महादेव विष्णुपूरी येथील काळेश्र्वर मंदिराच्या पायथ्याशी सेक्शन पंपने होणारा अवैध वाळू उपसा नांदेडच्या सामाजिक कार्यकर्त्या शितल भवरे यांनी शोधला. कोणाच्या आशिर्वादाने हा कारभार नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत चालतो, महसुल यंत्रणा काय करते असे अनेक प्रश्न या व्हिडीओमुळे समोर आले आहेत. “पायरीला गेले तडे पाय झाले जड अरे देवा तुझ्या देवळात चोरट्यांचा फड’ या पेक्षा दुसरे शब्द या वाळू चोरीला अयोग्य आहेत.
काल दि.28 जानेवारी रोजी सामाजिक कार्यकर्त्या शितल भवरे या विष्णुपूरी जलसागरात एका टोकऱ्यातून भ्रमणकरत असतांना त्यांनी काढलेला व्हिडीओ अत्यंत बोलका आहे. अवैध वाळू उपसा बद्दल वास्तव न्युज लाईव्हने सुध्दा यापुर्वी अनेक वृत्तांना प्रसिध्दी दिली आहे. शितल भवरे यांनी काढलेला व्हिडीओ बनवला असता तो भाग ज्या भागातील हा व्हिडीओ आहे तो विष्णुपूरी जलाशयात रोखलेले पाणी आहे. विष्णुपूरीच्या खाली सुध्दा दररोज वाळू उपसा होत असतो. त्या तराफ्यांवर जाळण्याची एक नाटकी कार्यवाही करण्यात येते आणि त्याला प्रसिध्दी देण्यासाठी सर्वांना पाठविली जाते. महसुल कायदा, गौण खनीज कायदा यानुसार सेक्शन पंप वापरून वाळू उपसा करायचाच नाही अशी नियमावली आहे. यासोबत वाळू उपसाबाबतच्या असंख्य नियमावली आहेत. त्या सर्व नियमावलींना पायदळी तुडवत वाळू माफिया कोणालाच भिक घालत नाहीत काय कारण असेल याचे? याचे उत्तर शोधले असता आप-आपल्या भाकरीवर तुप ओढण्याच्या घाईमध्ये सर्वच जण या अवैध वाळू उपसाकडे नेहमीच दुर्लक्ष करतात. काल परवाच एका तलाठी महोदयाला वाळू माफियासोबत रात्री महसुल कर्मचाऱ्यांसोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी निलंबित व्हावे लागले. पण त्या वाळू माफियावर काही एक कार्यवाही झाली नाही. उलट आता तर त्या तलाठी महाशयांना लवकरात लवकर कामावर कसे घेता येईल याचे प्रयत्न सुरू आहेत म्हणे. याचे कारण शोधले असता असे दिसते की, तलाठी महोदय आपल्या पेक्षा वरिष्ठ लोकांची दुकान उघडू शकतील म्हणून त्यांना पुन्हा कामावर घेण्याची घाई सुरू झाली आहे.
विष्णुपूरीच्या जलाशयातून सेक्शनपंपने वाळू उपसा होत असेल तर विष्णुपूरीच्या जलाशयात मरण पावणाऱ्यांची संख्या पाहता वाळू उपसामुळे त्या ठिकाणी होणारे खड्डे जलाशयातील मृत्यूचे कारण आहेत असेच म्हणावे लागेल. पुर्वी कधी काळी ईतिहासात विष्णुपूरीच्या जलाशयात काही भवरे तयार झाले आहेत आणि त्यात अडकून लोकांचा मृत्यू होता असे बोलले जात होते. आज सेक्शनपंपचा व्हिडीओ पाहिला असता अवैध आणि मोठ्या प्रमाणात होणाऱ्या या वाळू उपसामुळे त्या ठिकाणी नवीन खड्डे तयार होत असतील आणि त्या खड्ड्यात अडकून विष्णुपूरी जलाशयात मृत्यूची संख्या सुध्दा वाढत आहे.
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुगार माफियांचा प्रभाव सुध्दा मोठा आहे. त्यांच्याकडून काय-काय घेतले जाते ते लिहिण्याइतपत दम आमच्याही लेखणीत नाही. परंतू त्यांच्याकडून काही घेतल्यानंतर पुन्हा त्यांना काही दिवसांत तुमचा कारभार बंद असा फतवा काढला जातो ही माहिती मात्र नक्की आहे. गौण खनिजावर खरे नियंत्रण महसुल विभागाचे असते परंतू त्यात पोलीस येतातच. जगात असा कोणता विषय शिल्लक राहत नाही ज्यामध्ये पोलीसांची दखल नाही. तरी पण सेक्शनपंपने होणारा हा वाळू उपसा पाहिल्यानंतर महादेवाच्या पायऱ्यांना गेले तडे सुध्दा या वाळू उपसामुळेच झाले नसतील काय? त्या देवळाच्या पायऱ्यांमध्ये झालेले तडे पाहुन पाय जड होता आणि काय गत त्या महादेवाच्या मंदिराची की त्याच्याच दारात वाळू चोरट्यांचा फड वावरतो.