नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात एक उच्च शिक्षीत महिला आपली तक्रार देण्यासाठी दुपारी 3 वाजल्यापासून बसलेली आहे. तिची तक्रार घेण्याऐवजी तिला तोडगा काढण्याच्या सुचना देण्यात येत आहेत.
खात्रीलायक सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये विद्यावाचस्पती या पदवीसाठी शिक्षण घेणाऱ्या एका महिलेच्या दि.26 जून रोजी सायंकाळी तिच्या मार्गदर्शक शिक्षकानेच विनय भंग केला आहे. घडलेल्या प्रकाराची सर्व दक्षता घेत ती महिला आज दि.27 जून रोजी दुपारी 3 वाजता पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण येथे पोहचली. पण तिचा तक्रार दाखल करून घेण्याऐवजी तिला तोडगा काढण्याच्या सुचना देण्यात येत आहेत. समाजासाठी अत्यंत तळमळीने काम करणारे पोलीस निरिक्षक अशोकरावजी घोरबांड हे नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक आहेत. एका उच्च शिक्षीत महिलेसोबत झालेल्या विनयभंगाचा प्रकार गुन्हा दाखल करून घेण्याऐवजी त्यांना त्यातून तोडगा काढण्याचे मार्ग जास्त छान वाटले असतील. पण एखादी महिला सायंकाळ, सुर्यास्तानंतर पोलीस ठाण्यात बोलवायची नाही असे निर्देश आहेत. तरीपण रात्री 9.05 मिनिटापर्यंत तरी त्या उच्च शिक्षीत महिलेची तक्रार घेवून गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.
पोलीस विभागातील सर्व निर्देशांचे अत्यंत काटेकोर पालन नांदेड जिल्ह्याच्या नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातच होते. तरीपण या महिलेची तक्रार 7 तास घेण्यात आली नाही या मागचे गणित काय असेल यासाठी एखादा विद्यावास्पती व्यक्ती नेमणूक करण्याची गरज आहे. दोन दिवसापुर्वीच पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी यांनी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात भेट दिली होती पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी सायंकाळी 6 वाजता नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात पोहचले होते. त्यावेळी त्यांना सकाळी 8 वाजल्यापासून आपली तक्रार देण्यासाठी थांबलेला फिर्यादी भेटला होता. दुसऱ्या दिवशी पोलीस निरिक्षक अशोक घोरबांड यांना पोलीस उपमहानिरिक्षक कार्यालयात बोलावण्यात आले होते. पण ते त्या दिवशी पोलीस उपमहानिरिक्षक कार्यालयात गेलेच नाहीत अशी खात्रीलायक माहिती आहे. यावरून या जिल्ह्यात पद मोठे कोणाचे यावरही प्रश्न तयार होत आहे.
दुपारी 3 वाजल्यापासून उच्च शिक्षीत महिलेची तक्रार रात्री 9.5 वाजेपर्यंत नांदेड ग्रामीण पोलीसांनी नोंदवली नाही