जिल्ह्यातील 18 वय वर्षे पर्यंतच्या दहा लाख मुला-मुलींची होणार आरोग्य तपासणी

जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीत नियोजन

नांदेड (प्रतिनिधी)- शुन्य ते 18 वय वर्षे वयापर्यंतची बालके व किशोरवयीन मुला-मुलींच्या सर्वांगीण आरोग्य तपासणीसाठी जिल्हा प्रशासनातर्फे नियोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सुमारे 10 लाख मुला-मुलींची तपासणी होणार असून आरोग्य विभागासह, शिक्षण, वैद्यकिय महाविद्यालय, महिला व बालकल्याण, आयुर्वेदिक महाविद्यालय, मनपा, इंडियन मेडिकल असोसिएशन, पेडियाट्रिक्स असोसिएशन व इतर संबंधित विभागांची आज आढावा बैठक घेऊन नियोजन करण्यात आले. या बैठकीस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. निना बोराडे, बालरोग विभाग प्रमुख डॉ. सलीम तांबे, डॉ. शिवशक्ती पवार, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, डॉ. मनिष देशपांडे, डॉ. राजेश बुदे, डॉ. लोमटे, डॉ. दिपेश शर्मा आदी उपस्थित होते.

या मोहिमेसाठी सुमारे 300 वैद्यकीय तपासणी पथक तयार करण्यात आले असून उपलब्ध मनुष्यबळ व जिल्ह्यातील आरोग्य सेवा-सुविधा यांचा यात अंर्तभाव करण्यात आला आहे. जिल्ह्यातील 317 उपकेंद्रे, 68 प्राथमिक आरोग्य केंद्र, 12 ग्रामीण रुग्णालय, 6 उपजिल्हा रुग्णालय, 3 जिल्हा रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय, 15 प्राथमिक आरोग्य केंद्र याचबरोबर इंडियन मेडिकल असोसिएशन, पेडियाट्रिक्स असोसिएशन व इतर संस्थांचाही यात महत्त्वाचा सहभाग असणार आहे.

शासकीय व निमशासकीय शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, खाजगी शाळा, आश्रमशाळा, दिव्यांग शाळा, अंगणवाड्या आदी ठिकाणावर विद्यार्थ्यांची तपासणी केली जाणार आहे. यात वजन, उंची, गरजेनुसार विद्यार्थ्यांचा रक्तदाब, नवजात बालकांमधील जन्मजात व्यंग, रक्तक्षय, डोळ्यांचे आजार, गलगंड, हृदयरोग, कुष्ठरोग, दंत विकार, कॅन्सर, अस्थमा, एपिलेप्सी, जन्मजात मोतिबिंदू, बहरेपणा, दुभंगलेले ओठ, डाऊन सिंड्रोम डिफेक्ट, न्युरल ट्युब डिफेक्ट अशा आजाराच्या संशयित रुग्णांना ओळखून त्वरित उपचारासाठी संदर्भीत केले जाणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली.

तीनस्तरावर ही आरोग्य तपासणी केली जाणार असून यात ज्या मुलांना बाहेरच्या उपचारांची गरज अत्त्यावश्यक असेल अशा मुला-मुलींवर मेडिकल असोसिएशनचे तज्ज्ञ आपली सेवा उपलब्ध करून देणार आहेत. सर्व तपासणीमध्ये कुणाला उच्च स्तरीय उपचार शस्त्रक्रियेची आवश्यकता असेल तर अशा पालकांना करारबद्ध करण्यात आलेल्या खाजगी रुग्णालयांमध्ये संदर्भीत केले जाणार आहे.

 

“भविष्यात उग्र स्वरूप अथवा घातक ठरणाऱ्या आजारांवर वेळीच निदान करून उपचार करणे आवश्यक असते. असंख्यवेळा लहान मुले आपल्याला नेमके काय होते याबाबत कोणाशी बोलत नाहीत. त्यांच्या पालकांचेही बालकांच्या ज्या काही आरोग्य समस्या असतील त्याकडे वेळेवर लक्ष वेधले जाईल असे होत नाही. हे लक्षात घेता शासनाने निर्देश दिल्याप्रमाणे जिल्ह्यातील 18 वय वर्षे गटापर्यंतच्या सर्व मुलांची आरोग्य तपासणी जिल्ह्यात पूर्ण केली जाईल. ही प्राथमिक तपासणी जिल्ह्यात 7 हजार 727 शाळा व इतर ठिकाणी करून यातील तात्काळ उपचाराची गरज असलेल्या मुलांवर पुढील तपासण्या करून त्वरीत उपचार करून देऊ.” 

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

“अत्यंत महत्त्वपूर्ण व आवश्यक अशा या मोहिमेत इंडियन मेडिकल असोसिएशनला सहभाग घेण्याची मिळालेली संधी म्हणजे आम्ही आमचा सन्मान समजतो. शासकीय रुग्णालयांमध्ये या तपासणी मोहिमेतील बालकांना पुढील अत्यावश्यक तातडीने जे काही उपचार करावे लागले तर त्यासाठी आम्ही आमचा वेळ या कामांसाठी निश्चित देऊ.” 

– डॉ. मनिष देशपांडे, अध्यक्ष इंडियन मेडिकल असोसिएशन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *